Political Reactions | आश्वासन पूर्ततेची कसोटी

न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवड झाल्यानंतरही झोहरान ममदानी यांच्या संबंधात डाव्या आणि उजव्या गोटात तीव्र उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
Political Reactions
आश्वासन पूर्ततेची कसोटी(Pudhari File Photo)
Published on
Updated on
Summary

न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवड झाल्यानंतरही झोहरान ममदानी यांच्या संबंधात डाव्या आणि उजव्या गोटात तीव्र उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेत महापौर हे केवळ शोभेचे पद नसून त्याला शहराविषयीचे निर्णय घेण्याचे मोठे अधिकार असतात. जानेवारीत ते सूत्रे हाती घेतील. ट्रम्प यांनी निधी रोखण्याच्या दिलेल्या धमकीशी ते कसा सामना करणार, याकडे जगाचे लक्ष आहे.

अनिल टाकळकर

भांडवलशाहीची राजधानी मानल्या जाणार्‍या न्यूयॉर्कसारख्या जगातील अत्यंत महत्त्वाच्या शहरात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टोकाचा विरोध असतानाही झोहरान ममदानी घवघवीत मताधिक्याने महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. जानेवारीच्या प्रारंभी पदाची सूत्रे हा 34 वर्षे वयाचा या शहराचा पहिला दक्षिण अशियाई मुस्लीम महापौर हाती घेणार आहे. या शहराच्या सुमारे 86 लाख लोकांमध्ये अवघे 30 टक्के गौरवर्णीय असल्याने ममदानी निवडून येण्यास मदतच झाली. अमेरिकेचे एकूणच राजकारण राजकीय विचारसरणीच्या मध्यबिंदूच्या उजवीकडे झुकलेले आहे. झोहरान यांचा अजेंडा थोडासा डावीकडे झुकलेला आहे. म्हणूनच ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांना ते अतिडावे आणि कम्युनिस्ट वाटतात. त्यातूनच येथील उद्योगपतींनी त्यांचे पैसे संपण्याची वाट न बघता ममदानी निवडून येताच न्यूयॉर्कबाहेर स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. याउलट या विजयाने डाव्यांच्या आशा पल्लवित झालेल्या दिसतात. ममदानी यांना खुद्द डेमोकॅ्रटिक पक्षातही सुरुवातीला मोठा विरोध होता. धनाढ्य शक्तींनी त्यांच्या विरोधात रान उठविले असताना सर्वसामान्य मतदारांनी त्यांच्या मागे आपले बळ उभे केले.

सुमारे 90 हजारांवर कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात हिरिरीने उतरले. स्थलांतरित, मुस्लीम, दक्षिण अशियाई, अफ्रिकन आणि लॅटिन समुदायापर्यंत बहुभाषिक माध्यमातून संवाद साधून पारंपरिक राजकारणातील दानशूर उद्योगपतींवर अवलंबून राहण्याची प्रणाली या तरुणाने मोडीत काढली. देशात स्थलांतरितांविरोधात वातावरण तापलेले असताना तसेच इस्लामोफोबिया वाढलेला असताना हा मूळ भारतीय वंशाचा स्थलांतरित यशस्वी होतो, हे खचितच दखल घेण्याजोगे आहे. न्यूयॉर्क मधील बहुसंख्य अनिवासी भारतीय हिंदुत्ववादी असल्याने त्यांनी या उमेदवाराला कितपत मते दिली असतील, याविषयी शंका आहे; पण त्यांना बर्‍याच ज्यूंनी मात्र मते दिली. कारण, ममदानी इस्रायलच्या धोरणाविरोधात असले, तरी ज्यूंच्या विरोधात नव्हते.

न्यूयॉर्क हे कॉस्मॉलिटिन शहर जगाची एक छोटी प्रतिकृती मानली जाते. इथे 700 वर भाषा बोलल्या जातात. अब्जाधीशांची संख्या 123 असून त्यांची एकत्रित संपत्ती 759 अब्ज डॉलर्स इतकी आहे. विविध वंशांच्या, धर्मांच्या लोकांनी या शहरात वैविध्य आणले. इथे सतत नवनव्या संधी निर्माण होत गेल्या. विविध उद्योग बहरले. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ विविध देशांमधून येत राहिले. शहराचे चैतन्य टिकविण्यासाठी बाहेरून येणारे स्थलांतरित किती महत्त्वाची भूमिका बजावतात, हे इथे राहिल्यावर समजते. बड्याबड्या अब्जाधीशांची येथील उपस्थिती, येथील फॅशन नगरी, विविध कलांचा आविष्कार, हॉलीवूडवर असलेला या शहराचा प्रभाव, माध्यमे इत्यादी अनेक बाबी या नेहमीच कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय राहिला आहे; पण येथील सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. हे लक्षात घेऊन त्याचा अजेंडा ममदानी यांनी तयार केला आणि प्रचारात मतदारांची मने आणि मते जिंकली. त्यामुळे हा विजय केवळ एका व्यक्तीचा नाही. तो नव्या पिढीचा, प्रगत विचारांच्या आणि लोकाभिमुख राजकारणाच्या विजयाचे प्रतीक आहे.

Political Reactions
Pudhari Editorial : कूटनीती भारताची, हतबल पाकिस्तान

यापुढील वाटचाल मात्र ममदानी यांची कसोटी पाहणारी म्हणावी लागेल. कारण, ट्रम्प यांनी या शहराला केंद्र (फेडरल) सरकारकडून मिळणारे अनुदान रोखण्याची धमकी दिली आहे. या शहराचे वार्षिक बजेट 115 अब्ज डॉलर्सचे असून केंद्राकडून 9.6 अब्ज डॉलर्स म्हणजे बजेटच्या 6.4 टक्के रक्कम मिळते. अर्थात, कायद्याने आवश्यक असलेली अत्यल्प रक्कम वगळता बाकीची आर्थिक मदत ते थांबवू शकतात. ममदानी यांनी 200 वकिलांची फौज उभी करण्याचा प्रयत्न चालविला असला, तरी याप्रकरणी न्यायालयातील विलंब हा त्यांच्या अडचणीत भर टाकणाराच ठरेल. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिकची सत्ता असलेल्या शहरांच्या निधीत अब्जावधी डॉलर्सची कपात केली, त्या ठिकाणची बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील मोहीम अधिक कडक करण्यासाठी नॅशनल गार्ड पाठविले. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरलसह राजकीय विरोधकांवर खटले भरण्याचे आदेश न्याय विभागाला दिले. या पार्श्वभूमीवर ममदानी यांच्याशी ट्रम्प यांचा व्यवहार कसा असणार, यावर बरेच काही अवलंबून आहे.

अर्थात, ट्रम्प यांचा जन्म आणि कर्मभूमी या शहराची असल्याने त्याची हेळसांड होणे, त्यांना रुचणार नाही. या शहराचे एक उद्योगपती जॉन कॅटसिमाटिडीस यांनी ट्रम्प यांना या शहरासाठी आवश्यक निधी न रोखण्याचा आणि नॅशनल गार्ड न पाठविण्याचा सल्ला दिला आहे. यात एक रंजक भाग हा की, ट्रम्प जाहीररीत्या झोहरान ममदानी यांच्यावर टीका करीत असले, तरी खासगीत ते चतूर, प्रतिभावान राजकारणी आणि उत्तम संवादक म्हणून त्यांचे कौतुक करीत असल्याचे सांगण्यात येते. एलॉन मस्क यांनी मममदानी हे डेमोक्रॅटिक पक्षाचे भवितव्य आहे, असे वरवर कौतुकाचे वाटणारे; पण या पक्षाला घातक ठरू शकेल, असे ट्विट मध्यंतरी केले होते. ममदानी हा या पक्षाचा चेहरा बनावा, असे ट्रम्प यांनाही वाटते. म्हणजे विचारसरणीच्या मध्यबिंदूच्या आसपास असणार्‍यांना आपल्याकडे खेचू शकू, अशी त्यांना खात्री वाटते.

निवडणुकीत दिलेली आश्वासने ममदानी कशी प्रत्यक्षात आणणार, याकडेही अमेरिकेचे लक्ष आहे. घरभाडे स्थिर ठेवणे, गरिबांसाठी सुलभ गृहनिर्माण, मोफत बससेवा, मोफत बालसंगोपन इत्यादींसाठी कसा निधी उभा करणार, याविषयी संदिग्धता आहे. कराचा बोजा वाढला, व्यवसायविरोधी धोरणे राबविली आणि पोलिस दल दुर्बल झाले, तर न्यूयॉर्कची स्थिती आणि आर्थिक गती धोक्यात येऊ शकते. रिअल इस्टेट, उद्योग क्षेत्र आणि डेमोक्रॅटिक पक्षातील मध्यममार्गी गट त्यांच्या धोरणांना अडथळा आणू शकतात. भांडवलविरोधी अशी प्रतिमा निर्माण झाल्यास गुंतवणूक आणि व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केवळ ट्रम्प विरोध हा ममदानी यांना उपयोगी पडणार नाही. ट्रम्प यांनी निधी रोखण्याचा दिलेला इशारा हे गंभीर संकट आहे; मात्र याही स्थितीत राज्य सरकारशी सहकार्याबाबत ते बोलणी करू शकतात. नवीन महसूल स्रोत निर्माण करण्याची वाट ते चोखाळू शकतात, तसेच काही प्रमाणात न्यायालयीन संरक्षणाचा आधार घेऊन शहराचे आर्थिक संतुलन ते राखू शकतात. हे आव्हान ते कसे पेलतात, यावर या शहराचे आणि खुद्द त्यांचेही राजकीय भवितव्य ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news