

आपल्या रोजच्या समस्यांकडे शासनाचे आणि विशेषत: संबंधित शासकीय यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जनता विविध प्रकारे आंदोलन करत असते. कोणत्याही जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर तुम्ही कधीही जाल, तर उपोषणकर्त्यांचे तंबू तुम्हाला सहज पाहायला मिळतील. कधी अधिकार्यांना घेराओ घालणे, पन्नासेक लोकांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करणे, साखळी उपोषणे करणे नेहमीचेच आहे. अगदी साधे आंदोलन असेल, तर कपाळाला किंवा शर्टवर काळी पट्टी बांधून काम करणे असे प्रकार होत असतात.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका आजकाल अभिनव पद्धतीच्या आंदोलनांसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आहे. मुख्य रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांसाठी येथील युवकांनी शासनाकडे पैसे नाहीत म्हणून भीक मागून आंदोलन करून 10-10 रुपये जमा केले होते आणि जमा झालेल्या रकमेतून खड्ड्यांवर मुरूम टाकून काही प्रमाणात लोकांची सुटका केली होती. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका हा निजामाच्या विरुद्ध झालेल्या सशस्त्र लढाईमध्ये एक धगधगती रणभूमी होती. सर्वात अधिक स्वातंत्र्यसैनिकांची संख्या असलेला तालुका म्हणूनही या परिसराची ओळख आहे. साहजिकच येथील जनता लढाऊ बाण्याची आहे.
एखादी व्यक्ती मरण पावली, तर त्याच्या घरातील लोकांकडून तेराव्या किंवा चौदाव्या दिवशी गोड जेवण घातले जाते. अंत्यविधीला उपस्थित असणारे आणि नजीकचे नातेवाईक असणारे लोक गोड जेवण कार्यक्रमाला निमंत्रित असतात. या तालुक्यातील येलदरी ते जिंतूर हा साधारण 15 किलोमीटरचा रस्ता अक्षरश: चाळण झालेला आहे. या रस्त्यावर भीषण अपघात होऊन कित्येक लोक मृत्यू पावलेले आहेत आणि असंख्य लोक जायबंदी झाले आहेत. लोकांच्या पाठींना मणक्याचे आजारही झालेले आहेत. या जीवघेण्या रस्त्यासाठी आंदोलन करणार्या युवकांनी या पंधरा किलोमीटर रस्त्यावरवरील खड्डे मोजले असता त्यांची संख्या पंधराशे एक अशी भरली. पंधराशे एक संख्या झाल्याबरोबर या युवकांनी चक्क ‘खड्डे जेवण निमंत्रण पत्रिका’ छापली असून या आनंदात या रस्त्यावरून ये-जा करणार्या प्रवाशांना विशिष्ट दिवशी आम्ही अल्पोपहार देणार आहोत, यासाठी जरूर या, असे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. येणार्या लोकांना या रस्त्यावर जास्तीत जास्त खड्डे कसे पडतील, यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंतीपण केली आहे. अल्पोपहाराची वेळ दुपारी दोन ते चार असून माणकेश्वर या गावाजवळील सर्वात मोठा खड्डा हे या कार्यक्रमाचे स्थळ आहे. आहे की नाही अभिनंदन करण्याची अभिनव पद्धत! इतकी आंदोलनाची वेळ येते, तरीही यंत्रणा ढिम्म असतात आणि याची दखल घेतील याची खात्री नसते. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या पद्धतीने त्या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक आपली वाहने सर्कसमध्ये चालवल्यासारखी चालवत ‘जिणे जगावे लाजिरवाणे’ अशा पद्धतीने जगत असतात. शासकीय यंत्रणा तातडीने जाग्या होऊन या रस्त्याच्या अवस्थेची दखल घेतील आणि भविष्यात अशी आंदोलने करण्याचे काम पडू देणार नाहीत, यासाठी आपण केवळ प्रार्थना करू शकतो.