World Suicide Prevention Day | आयुष्याला होकार देऊया!

World Suicide Prevention Day |
World Suicide Prevention Day | आयुष्याला होकार देऊया!
Published on
Updated on

प्रा. साक्षी गावडे

आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची समस्या नसून, समाजाने संवेदनशीलतेने समजून घेण्याची आणि संवादातून प्रतिबंध करण्याची गंभीर सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. त्यानिमित्त...

आत्महत्येची बातमी कानावर आली की, मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. एवढं टोकाचं पाऊल का उचललं असेल? नेमकं काय घडलं असेल? काही मार्गच उरला नसेल का? पण, त्या व्यक्तीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तिची घालमेल कुणाच्या लक्षात आली होती का? आणि आली असेल, तर आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकलो होतो का? हा प्रश्न आज विचारण्याची गरज आहे. कारण, आत्महत्या ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची समस्या राहिलेली नाही, ती सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या २०२३ च्या आकडेवारीनुसार भारतात एका वर्षात १ लाख ७१ हजार ४१८ आत्महत्यांची नोंद झाली. देशातील आत्महत्येचा दर प्रति एक लाख लोकसंख्येमागे १२.३ इतका होता. यामध्ये ७२.८ टक्के पुरुष, तर २७.२ टक्के महिला होत्या. या वर्षात देशात १३ हजार ८९२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली. या आकड्यांकडे केवळ संख्या म्हणून पाहून चालणार नाही. कारण, प्रत्येक आकड्यामागे एक माणूस आहे, एक कुटुंब आहे, काही नाती आहेत, काही स्वप्ने आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कधीतरी आशेने जगणारे एक मन आहे. यातील पुरुषांचे ७२.८ टक्के हे प्रमाण लक्षवेधी आहे. स्त्री असो की पुरुष, मनातला त्रास व्यक्त करणे आणि गरज पडल्यास मदत मागणे ही कमजोरी नसून स्वतःची काळजी घेण्याची परिपक्वता आहे, ही भावना समाजात रुजवावी लागेल.

आत्महत्येमागे एकच कारण शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. परीक्षेत अपयश, कर्ज, प्रेमभंग, व्यवसायात नुकसान किंवा घरात वाद... एखादी घटना ही शेवटची ठिणगी असू शकते; परंतु तिच्यामागे बराच काळ साचलेला ताण, निराशा, असहायतेची भावना, एकटेपणा, नातेसंबंधातील तणाव, आर्थिक अडचणी, आजारपण, व्यसन, अपयशाची भीती, सततची तुलना किंवा 'माझ्या समस्येतून आता कोणताच मार्ग नाही' अशी मानसिक अवस्था असू शकते. त्यामुळे केवळ 'काय घडले' एवढेच पाहून चालणार नाही, तर 'त्या व्यक्तीच्या मनात बराच काळ काय घडत होते' हेही समजून घेतले पाहिजे.

आज मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, शेकडो संपर्क आहेत, तरीही मन मोकळे करण्यासाठी हक्काचा माणूस मिळेलच असे नाही. बाहेरून माणूस हसत असतो, नेहमीप्रमाणे वावरत असतो; पण त्याच्या मनात सर्व काही ठीक आहे, असे गृहीत धरता येत नाही. आपण मुलांना यश मिळवायला शिकवतो; पण अपयश स्वीकारायला किती शिकवतो? गुण कसे वाढवायचे, हे सांगतो; पण अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, तर कसे सावरायचे, हे शिकवतो का? स्पर्धेत पुढे कसे जायचे, हे सांगतो; पण मागे पडल्यानंतर पुन्हा उभे कसे राहायचे, हे शिकवतो का? करिअर, पैसा, प्रतिष्ठा आणि यश यांची तयारी करताना भावनिक जीवनासाठीही मुलांची तयारी झाली पाहिजे. निराशा सहन करण्याची क्षमता, समस्या सोडवण्याचे कौशल्य, भावना व्यक्त करण्याची सवय, मदत मागण्याची तयारी आणि प्रतिकूल परिस्थितीत पुन्हा उभे राहण्याची मानसिक ताकद हीसुद्धा शिक्षणाचीच उद्दिष्टे मानली पाहिजेत. यासाठी सर्वांत पहिली गरज आहे ती आसपासच्या माणसांकडे थोडे अधिक लक्ष देण्याची.

एखादी व्यक्ती अचानक लोकांपासून दूर राहू लागली, सतत निराशा किंवा हताशपणा व्यक्त करू लागली, 'आता काही अर्थ उरला नाही', 'माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो', 'मी नसलेलाच बरा' अशा आशयाची भाषा करू लागली, वारंवार मृत्यूविषयी बोलू लागली, जवळच्या वस्तू अचानक इतरांना देऊ लागली किंवा थेट स्वतःला संपवण्याचे विचार व्यक्त करू लागली, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. अशावेळी आपण काय बोलतो यापेक्षा कसे ऐकतो, हे अधिक महत्त्वाचे ठरते. 'एवढ्याशा गोष्टीचा काय विचार करतोस', 'तुझ्याकडे काय कमी आहे', 'मनातून काढून टाक', 'पॉझिटिव्ह विचार कर' अशी वाक्ये धीर देणारी वाटतात; पण समोरच्या व्यक्तीची वेदना त्यामुळे कमी होईलच असे नाही. काही वेळा तिला सल्ला, तुलना आणि उपदेशही नको असतो. फक्त आपले बोलणे कुणीतरी शांतपणे आणि कोणताही निर्णय न देता ऐकावे असे वाटत असते. 'तुला खूप त्रास होत आहे, हे मला जाणवतंय. तू बोल, मी ऐकतोय. आपण यातून मार्ग शोधूया' एवढे साधे शब्ददेखील त्या क्षणी महत्त्वाचे ठरू शकतात.

एखादी व्यक्ती स्वतःचे आयुष्य संपवण्याविषयी बोलत असेल, तर विषय टाळणे किंवा तिचे बोलणे गुपित ठेवण्याचे आश्वासन देणे योग्य नाही. संवेदनशीलपणे तिच्याशी संवाद साधणे, तिला एकटे न सोडणे, जवळच्या विश्वासू व्यक्तीला माहिती देणे आणि शक्य तितक्या लवकर मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ किंवा प्रशिक्षित मानसिक आरोग्य व्यावसायिकाची मदत मिळवून देणे आवश्यक आहे. गरज भासल्यास भारत सरकारची २४ तास उपलब्ध असणारी Tele-MANAS सेवा १४४१६ किंवा १-८००-८९१-४४१६ या क्रमांकावर उपलब्ध आहे. मानसिक आरोग्यासाठी मदत मागणे ही कमजोरी नसून संकटातून बाहेर पडण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे; पण आत्महत्या प्रतिबंधाची जबाबदारी फक्त संकटात असलेल्या व्यक्तीवर किंवा तिच्या कुटुंबावर टाकून आपण मोकळे होऊ शकत नाही. घरामध्ये मुलांच्या गुणपत्रिकेबरोबर त्यांच्या मनाचीही चौकशी झाली पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अभ्यासाबरोबर सामाजिक आणि भावनिक जीवनकौशल्ये विकसित झाली पाहिजेत. शिक्षकांना विद्यार्थ्यांमधील गंभीर भावनिक बदल ओळखता आल्या पाहिजेत. कार्यस्थळी केवळ कामगिरीचा आढावा न घेता कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. ग्रामीण भागापर्यंत मानसिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत.

जागतिक आरोग्य संघटनेनेही आत्महत्या प्रतिबंधासाठी काही महत्त्वाच्या दिशांकडे लक्ष वेधले आहे. आत्महत्येसाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या घातक साधनांपर्यंतचा सहज प्रवेश कमी करणे, किशोरवयीन मुलांमध्ये सामाजिक आणि भावनिक जीवनकौशल्ये विकसित करणे आणि जोखमीतील व्यक्तींची लवकर ओळख करून त्यांना योग्य उपचार व सातत्यपूर्ण आधार उपलब्ध करून देणे यांचा त्यात समावेश आहे. भारतानेही राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरणाच्या माध्यमातून २०३० पर्यंत आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दहा टक्के घट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे; मात्र कोणतेही धोरण तेव्हाच अधिक प्रभावी ठरेल, जेव्हा त्याला कुटुंब आणि समाजाच्या संवेदनशीलतेची जोड मिळेल.

२०२४ ते २०२६ या कालावधीसाठी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची संकल्पना आहे, 'चेंजिंग द नरेटिव्ह ऑन सुसाईड' म्हणजेच 'आत्महत्येबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलणे'. त्यासाठी दिलेला कृती संदेश आहे 'स्टार्ट द कनव्हर्सेशन' अर्थात संवाद सुरू करा. आत्महत्येबद्दल बोलणे टाळण्याऐवजी योग्य आणि संवेदनशील पद्धतीने बोलले पाहिजे. मानसिक त्रास ही लपवण्याची गोष्ट नसून त्यावर मदत मिळू शकते, हा विश्वास निर्माण केला पाहिजे. मानसिक आरोग्याबद्दलचा कलंक कमी झाला पाहिजे आणि 'मला मदतीची गरज आहे' हे वाक्य उच्चारणे समाजाने अधिक सहज केले पाहिजे. एखाद्या माणसाच्या आयुष्यातील समस्या आपण एका क्षणात सोडवू शकणार नाही; पण त्या समस्यांना सामोरे जाताना त्याला एकटे पडू न देणे आपल्या हातात नक्कीच आहे. कधी कधी मनापासून विचारलेलं 'तू ठीक आहेस ना' आणि उत्तर ऐकण्यासाठी दिलेली काही मिनिटंही एखाद्या माणसाला पुन्हा एकदा आयुष्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी आधार देऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news