

दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश टपाल विभागाच्या भूमिकेबद्दल लोकांना जागरूक करणे हा आहे. दरवर्षी 150 हून अधिक देश जागतिक पोस्ट दिन साजरा करतात. युनिव्हर्सल पोस्टल युनियनची सुरुवात दि. 9 ऑक्टोबर 1874 रोजी स्वित्झर्लंडमध्ये झाली. दि. 18 फेब—ुवारी 1911 रोजी फ्रेंच पायलट हेन्री पॅकेटने भारतातून निघालेल्या विमानाने पहिले अधिकृत टपाल नेले. त्यांच्या एका सॅकमध्ये सुमारे 6,000 पत्रे होती.
अवंती कारखानीस
आजच्या काळात भारतात गावोगावी फिरणारे पोस्टमन पाहून नव्या पिढीला फारसे अप्रूप वाटत नसले, तरी पूर्वीच्या काळी ‘पोस्टमन’ असा आवाज ऐकू आल्यानंतर त्या कुटुंबातील लोकांच्या चेहर्यावर दिसणारे भाव विलक्षण असायचे. दूरसंचार क्षेत्रात क्रांती झाल्यामुळे इंटरनेट, ई-मेलमुळे पोस्ट कार्यालयाचे टपाल वाटपाचे काम तुलनेने खूपच कमी झाले. तार खाते बंद करण्यात आले. कुरियर सेवांचे पेव फुटल्यानंतर टपाल सेवेला उतरती कळा लागली; परंतु पोस्ट खात्यामार्फत देण्यात येणार्या बँकिंग सुविधा अलीकडील काळात लोकप्रिय झाल्या.
भारतातील पहिले पोस्ट ऑफिस 1774 मध्ये कोलकाता येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केले होते. पोस्ट ऑफिसने प्रति 100 मैलांवर दोन आणे आकारले. कोलकाता येथील लँडमार्क जनरल पोस्ट ऑफिस 1864 मध्ये बांधले गेले. 1880 मध्ये भारतात मनीऑर्डर प्रणाली सुरू झाली. भारतात स्पीड पोस्टची सुरुवात 1986 मध्ये झाली. दि. 18 फेब—ुवारी 1911 रोजी जगातील पहिले अधिकृत एअरमेल उड्डाण भारतात झाले. स्वतंत्र भारतात पहिले अधिकृत टपाल तिकीट दि. 21 नोव्हेंबर 1947 रोजी जारी करण्यात आले. नवीन टपाल तिकिटावर भारतीय ध्वजासह ‘जय हिंद’ या घोषणेचे चित्रण केले. स्वातंत्र्यावेळी संपूर्ण भारतात 23,344 टपाल कार्यालये होती. भारतात आज जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे. डिजिटलायझेशनच्या युगात ऑनलाईन टपाल व्यवहारांवरही लोकांचा विश्वास वाढला आहे.
भारतीय टपाल सेवेचा केंद्रबिंदू काय असेल, तर पिन क्रमांक! भारतामध्ये ही संकल्पना दि. 15 ऑगस्ट 1972 मध्ये सुरू करण्यात आली. आजघडीला देशामध्ये नऊ पिन विभाग आहेत. यामध्ये पहिले आठ विभाग हे देशाच्या वेगवेगळ्या भागांसाठी आहेत, तर नववा विभाग हा आर्मी पोस्टल सर्व्हिससाठी आहे. यामधील पहिला आकडा हा या विभागाला दर्शवत असतो. पहिले दोन आकडे मिळून सबरीजन किंवा पोस्टाच्या सर्कलचे प्रतिनिधित्व करतात आणि पहिले तीन आकडे एकत्रित सॉर्टिंग डिस्ट्रिक्ट दर्शवत असतात, तर शेवटचे तीन आकडे डिलिव्हरी पोस्ट ऑफिस दर्शवण्याचे काम करतात. यामध्ये दोन उत्तर, दोन दक्षिण, दोन पश्चिम, दोन पूर्व असे विभागांचे वर्गीकरण आहे. उदाहरणार्थ पहिले दोन आकडे दिल्लीसाठी 11 आहेत, तर महाराष्ट्रासाठी 40 ते 44 आहेत.
दशकभरापूर्वी पोस्टाचे पूर्ण बँकेत रूपांतर करण्यात आले. इंडिया पोस्ट पेमेन्ट बँकेचा म्हणजेच आयपीपीबीचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आणि देशात एका नव्या युगाची सुरुवात झाली. पोस्ट कार्यालये देशाच्या कानाकोपर्यात आहेत. या कार्यालयांमधील कर्मचारी आज घरोघरी जाऊन अनेक आर्थिक कामे पूर्ण करतील. पोस्टाच्या बँकांचे उद्दिष्ट भारतातील प्रत्येक घरापर्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह बँकिंग सुविधा पोहोचवणे आहे. भारतीय पोस्ट पेमेंटस् बँकेचे 100 टक्के मालकी हक्क भारत सरकारकडे आहेत. या बँकेची सुरुवात दि. 30 जानेवारी 2017 रोजी रांची (झारखंड) आणि रायपूर (छत्तीसगड) येथे प्रायोगिक स्वरूपात करण्यात आली होती.