World Lizard Day | साष्‌-टांग नमस्कार!

World Lizard Day |
World Lizard Day | साष्‌-टांग नमस्कार!
Published on
Updated on

डॉ. महेश केळुसकर

सन्माननीय होर्डिंग साहेब आणि भादरणीय महोदय,

बालके सरडू बाळकडून साष्‌-टांग नमस्कार!

खरे म्हणजे, आज तुमचा जागतिक दिवस असताना उगाचच आमच्या नावे ‘जागतिक सरडा दिन’ (वर्ल्ड लिजार्ड डे) म्हणून पब्लिसिटी झालेली आहे, ती पाहून... ऐकून कसेसेच, न्यूनगंडात्मक व ओशाळवाणे वाटत आहे. साहेब, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविध प्रजातींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी काम करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो, हे आपणास माहीत आहेच‌. जगात सरड्याच्या तीन हजार आठशे जाती आहेत. प्रत्येक सरड्याचे रंग वेगळे आणि प्रत्येकाचे वर्तन वेगळे. तथापि, खरे म्हणजे हा तुमचा मान असताना आमच्यासारख्या किरकोळ सरड्यांचा आजच्या दिवशी उगाचच गौरव करणे म्हणजे लग्नाच्या गोष्टींची नाटकं करणाऱ्याला पद्मश्री द्यायचे सोडून एखाद्या अविवाहिताला पद्मभूषण देणे होय.

महोदय, थंड रक्ताचे प्राणी म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो. तथापि, याबाबतीत आपल्यापुढे आम्ही म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ होय! मुंबई-पुणे-गोवा हायवे, मिसिंग लिंक पॅकेज, पेपरफुटी, रक्तपेढ्यांचे घोटाळे आणि बुवाबाजीची प्रकरणे ज्या थंडपणे आपण हाताळता तो थंडपणा रक्तातच असल्याशिवाय आमच्यासारख्यांच्या हे आवाक्यापलीकडचे आहे. आपण थंडपणाने एकमेकांचे गळे कापता, तेही जागतिक दर्जाचेच प्रकरण आहे. खरं तर, हे विषयांतर आम्हाला करायचे नव्‍हते; पण १४ तारखेला नेमका जागतिक सरडे दिन आम्हाला आठवला आणि रंग बदलणाऱ्या आमच्या सारख्‍या दीन सरड्यांची आठवण झाल्यावाचून राहिली नाही. सरडे रंग बदलतात. कारण, सरडे (विशेषतः चॅमेलियन) त्यांचे शरीर आणि परिसर यांच्यातील तापमान नियंत्रित करण्यासाठी, शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि भावना (जसे की राग किंवा भीती) व्यक्त करण्यासाठी रंग बदलतात. हे वैज्ञानिक विश्‍लेषण आमच्यासारख्‍या पामराला ऐकून माहिती आहे; पण आमचे सरडे रंग बदलतात, त्याची कारणमीमांसा अनेकदा सकाळच्या वाजणाऱ्या भोंग्याने केली असली, तरी ती अद्याप सर्वमान्य झाली नाही आणि मग रंग बदलणारे सरडे भारताच्या पश्‍चिम घाटापेक्षा भारताच्या पश्‍चिमेपासून अगदी दक्षिणेपर्यंत अगदी सगळीकडेच त्यांचा यथायोग्य वावर पाहायला मिळतो. रंग बदलले की, या सरड्यांचे मानसिक संतुलनही ठीक होते. त्यांना जे जे पाहिजे ते कुबेराच्या झोळीतले सारे धनही मिळते, असे म्हणतात; पण ही बरं चर्चाच आहे हं! खरे जे आहे ते जो तो जाणे...

‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत’ अशी एक जुनाट म्हण आहे; पण आपल्यासारख्यांची धाव पाहता आणखी शंभर वर्षे तरी आलटून-पालटून, आपल्या घराण्यातील कोणी ना कोणी एक तरी मेंबर सत्तेच्या कुंपणावर बसलेला आणि वेळ येताच इकडून तिकडे उडी मारणारा म्हणून इतिहासात अमर होईल, यात शंका नाही.

आम्ही सरडे रंग बदलतो, ही गोष्ट खरी आहे; पण ते आमच्या स्वतःच्या संरक्षणाकरिता; पण तुम्ही जे रंग बदलता ते जनतेच्या विकासाकरिता! आजचा महाराष्ट्र जिकडे-तिकडे विकासाने अक्षरशः सजून आणि सुजून आलेला आहे, साहेब. जे जे तुम्ही पेरलं ते आता रुजून येतं आहे. या विकासाला आता बंधन नाही, कुंपण नाही. आता प्रत्येक दिवस तुमचा आहे, साहेब! असलाच तर आमचा फक्त आजचा एकच दिवस; पण तोही तुमच्या नावे करून द्यायला आम्ही तयार आहोत. अर्थात, असणारच... या निमित्ताने एक काव्‍यरंगसुद्धा आम्हाला आठवतो, तोही तुमच्या माहितीस्तव येथे सांगतो.

आधीपासूनच| सरड्याची जात| राजकारणात| आहेच की||

तीन दिवसांत| रंग बदलून| करी हनिमून| तिसऱ्याशी||

थंड रक्ताचे हे| सरडे थेरडे| मारती कोरडे| ‘जेन झी’स||

रिक्षावाल्यांसाठी| मराठीचे धडे| त त प सरडे| सभापती||

ऐन तारुण्यात| बीकेजी हायवे| वर्ष सतरावे| खड्डेमयी||

जीव वाचविण्या| स्वतःची शेपटी| लपवुनी पॅंटी| दिल्लीवारी||

कुंपणापर्यंत| सरड्यांची धाव| खोक्यांवरी नाव| कायमचे||

मिसलिंक आहे| जनतेशी नाळ| शिकाऱ्यांची माळ| सुरक्षेत||

आज एक पक्ष| उद्या दुजे भक्ष्य| तोच स्वर्ग मोक्ष| विकासाला||

शेतकरी आणि| कामगार दीन| सरडे महान| देशभक्त||

घरादारावरी| मोरपंख लावा| आणि दूर ठेवा| सरड्यांना||

अशा या सरडा दिनाच्या कथा आणि मनात येणाऱ्या व्‍यथा न्याहाळताना नव्‍या विकासपुरुषांचा विशेष हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. आजगणिक पश्‍चिम घाटामध्‍ये अगणित सरड्याच्या जाती नवनव्‍या नावाने पुढे येऊ लागल्या आहेत. या जातींचा अभ्‍यास करताना रंग बदलणारे सरडे विशेष लक्षात राहणारे आहेत. खरं तर, आमच्या सरड्यांबाबत संशोधन करावे तेवढे थोडे आहे. त्यांचे शोधनिबंध आजही अपुरेच आहेत. दररोज येती महापुरे तेथे लव्‍हाळे वाचती... असे कुणी म्हटले असले, तरी रंग बदलणाऱ्या सरड्यांचे अगणिक रंग शोधणे अनेकांना जमले नाही. विचारांची शक्ती, आचारांची युक्ती तत्परतेने बदलणारे सरडे आणि त्यांचे रंगात सारे रंग मिसळणारे नवे रसायन नव्‍या शोध निबंधाचा विषय आहे.

या साऱ्या कथानकांनी सरड्याची धाव कुंपणापर्यंत या अद्‌भुत म्हणीचे कुंपण आज विरल्यासारखे वाटू लागले आहे. आधीपासूनच सरड्यांची जात राजकारणात आहेच की, तीन दिवसांत तीन रंग बदलणाऱ्या आणि मराठीचे धडे अचूक देणाऱ्या हिंदीच्या अजीर्ण शब्दांनी हैराण झालेल्या लोकसमूहाला मराठीचे अमृत पाजून महान कार्य करणाऱ्या या थोरा-मोठ्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. एरव्‍ही सरड्यांच्या लहान-मोठ्या साडेतीन हजार जाती सांगितल्या जातात; पण आमच्या सरड्यांच्या जातींचे मोजमाप करणेच केवळ अवघड.

खरं तर, सरडा ही जात एक सदस्य कुळातील; पण त्याची असंख्‍य उपकुळे विभागलेली असल्याने त्यांचा शोध घेणे केवळ अवघड. प्रत्येकाची लांबी, रुंदी आणि विचारांची शक्ती वेगवेगळी; पण जात मात्र सरड्याचीच. आज सरड्याची जात नवी, तीन दिवसांत रंग बदलून करील हनिमून तिसऱ्याशी... हा घरोबा करण्‍याची महान कौशल्याची गोष्‍ट हे रंग बदलणारे सरडेच करू शकतात. या त्यांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीला जागतिक एखादा ऑस्कर सादर करायला हरकत नाही. एवढे हे महान कर्तव्‍य करतील. 'थंड रक्ताचे हे सरडे थेरडे, मारती कोरडे ‘जेन झी’स' असा हा काळ. त्यामुळे इथल्या जाती आणि प्रजाती असतील वेगळ्या, दिसतील अनोख्‍या, तरी त्यांच्या कलात्मक भूमिकांनी रंगलेला हा रंगमहाल प्रत्येकजण अनुभवून कृतकृत्य होतो आहे.

या नव्‍या सरड्याच्या जाती म्हणती, शोधू मतदार नव्‍याने... खोक्यांवर नाव कोरू कायमचे, तरीही सरडे महान देशभक्त, घरादारावरी मोरपंख लावा आणि दूर ठेवा नवविचारी सरड्यांना..!

आपला कृपाभिलाषी,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news