Women's Safety issue
Women's Safety issue | महिला सुरक्षेचा प्रश्न(Pudhari File Photo)

Women's Safety issue | महिला सुरक्षेचा प्रश्न

Published on

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ असे सुप्रसिद्ध वचन आहे. स्वराज्यातील व परराज्यातील स्त्रियांचा आदर हा केलाच पाहिजे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दंडक होता. शिवचरित्राचे अभ्यासक लालजी पेंडसे म्हणतात की, शिवराय हे उपेक्षित, गोरगरीब, कष्टकरी वर्ग तसेच सर्व जातीधर्मातील महिलांबाबत सहृदयी होते. महिला कायम उपेक्षितच असतात याची त्यांना जाण होती. मोगली फौजेतील रायबाघीण शिवरायांच्या विरोधात उमरखिंडीत लढली. त्यात तिचा पराभव झाला. ती पकडली गेली, तेव्हा महाराजांनी आदरसत्कार करून तिला तिच्या छावणीत सुखरूप पोहोचवले. दक्षिण दिग्विजयावरून स्वराज्यात परतत असताना, कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढल्या. त्यावेळी सावित्रीबाईंचा अवमान करणार्‍या स्वकीय सरदारांना शिवरायांनी शिक्षा केली. अशा या शिवरायांचा वारसा मानणार्‍या महाराष्ट्राला सध्या झाले आहे तरी काय, असा प्रश्न पडतो. स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने राज्याला हादरवून सोडले आहे. याप्रकरणी संशयित प्रशांत बनकर याला पोलिसांनी तातडीने अटक केली आणि मुख्य संशयित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदानेही पोलिसांना शरण आला. बनकर आणि बदाने या दोघांकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळास कंटाळून गुरुवारी रात्री, म्हणजे ऐन भाऊबीजेच्या दिवशीच तिने आत्महत्या केली. महिला डॉक्टरने जीव देण्यापूर्वी आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात तिने आयुष्याचा शेवट घडवून आणण्याचे कारण आणि त्यासाठी जबाबदार असणार्‍यांची नावे लिहिली आहेत. माझ्या मरणाचे कारण पोलिस निरीक्षक बदाने असून, त्याने माझ्यावर चारवेळा अत्याचार केल्याचे तिने लिहिले. याशिवाय बनकरने मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचाही उल्लेख त्यात आहे.

बीड जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मोठ्या कष्टाने डॉक्टर होते. आपल्या गावातून दुसर्‍या ठिकाणी जाऊन नोकरी करते. फलटण शहरात पेईंग गेस्ट म्हणून राहत असताना, वैद्यकीय सेवेतील सर्व ताणतणाव सहन करते आणि कर्तृत्व सिद्ध करते. परंतु वैद्यकीय तपासणीसंदर्भातील वादातून तिचीच चौकशी सुरू होते. शवचिकित्सेचे किंवा वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट आपल्याला सोयीस्कर अशा पद्धतीचे असावेत, यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो. हे सर्व भयंकर आहे. याबद्दल वरिष्ठांकडे वारंवार गार्‍हाणी नोंदवूनही दखल घेतली गेली नाही. पीडितेने यासंदर्भात वेळीच अन्य कुणाला सांगितले असते, तर तिचे प्राण वाचले असते, असे सातार्‍याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी म्हटले आहे. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. कारण नातेवाईक वा मित्र यांना माहिती दिली असती, तर काही हालचाल तरी होऊ शकली असती आणि पीडितेचे प्राण कदाचित वाचू शकले असते.

आता राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालक भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नेमली असून, त्यांच्या मदतीसाठी सातारा जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षकांनी केलेल्या तक्रारीनुसार, आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरची चौकशी सुरू होती. समितीसमोर झालेल्या सुनावणीवेळी या पीडितेने आपल्यावर दडपण आणले जात असल्याची तक्रार केली होती. विशेष म्हणजे, याबाबत फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. धुमाळ यांनी, आपल्याला याबाबत काहीच माहीत नसल्याचे म्हटले आहे. मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी पीडितेने तक्रार केल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. हे सर्व लक्षात घेऊन चौकशी समितीला सत्य शोधावे लागेल.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी, भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार सचिन पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. हे सर्वजण वैद्यकीय अधिकार्‍यांवर दबाव टाकून चुकीची कामे करायला लावतात, असाही आरोप दानवे यांनी केला. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता, आरोप करणे म्हणजे प्रकरणाचे गांभीर्य कमी करणे होय. महिला अत्याचार वा आत्महत्या प्रकरणात पक्षीय राजकारण हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. आत्महत्या केलेल्या भगिनीला न्याय देणार आणि कोणत्याही राजकीय आरोपांना वा दबावाला बळी न पडता, निष्पक्ष तपास करणार असल्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथेच दिले आहे. त्याचप्रमाणे कोणतेही कारण नसताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव पुढे करून, निष्कारण बदनामी करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या प्रकरणाची चौकशी सीआयडी किंवा एसआयटीतर्फे करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये एका शिकाऊ महिला डॉक्टरची अत्याचार करून हत्या झाली तेव्हा संपूर्ण देशात प्रक्षोभ निर्माण झाला. देशभरातील डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन, एक दिवसाचा बंदही पुकारला. या प्रकरणात प. बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने जनमताचा रेटा आल्यानंतर योग्य ती पावले उचलली. पण, अशा घटना आणि महिलांवरील अत्याचार थांबायला तयार नाहीत. देशभर कुठे ना कुठे या लेकी-बाळांचे शोषण सुरूच आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा केंद्र सरकारने दिली असून, अधिकाधिक मुली शिकून उंबरठ्याबाहेर पडू लागल्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या चमकत आहेत. महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना अमलात आणली असून, ती अत्यंत लोकप्रिय झाली. परंतु दुसरीकडे वास्तव चिंताजनक आहे. या लाडक्या बहिणी जर सुरक्षित नसल्या, त्यांना दिमाखाने जगणे अशक्य होत असेल, तर या सगळ्याला काय अर्थ आहे? या स्थितीत महिला सुरक्षेबाबत प्रशासनाच्या आणि व्यवस्थेच्या प्रत्येक स्तरावर झिरो टॉलरन्सचे धोरण कठोरपणे अमलात आणणे आवश्यक आहे. सावित्रीच्या लेकींसाठी तीच खरी ओवाळणी ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news