

सर्व प्रकारच्या खेळांमध्ये जागतिक पातळीवर आपल्या देशाचा डंका वाजत आहे, याचा अभिमान व्यक्त केल्यावाचून राहवत नाही. पुरुषांच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपल्या देशाचा डी. गुकेश याने अजिंक्यपद मिळवून वर्ल्डकप आपल्याला मिळवून दिला. भारतीय बुद्धिबळपटूच्या या यशाने संपूर्ण देश आनंदीत झाला आणि सर्वत्र गुकेशचे अभिनंदन करण्यात आले.
अशीच आनंद देणारी बातमी महिला बुद्धिबळपटूंनी आणली आहे. पश्चिम आशिया आणि पूर्व युरोप यांच्या सीमेवर असलेल्या जॉर्जिया या देशामध्ये महिलांच्या बुद्धिबळ वर्ल्डकपचे सामने सुरू आहेत. या वर्ल्डकपची शेवटची म्हणजेच अंतिम फेरी 26 ते 28 जुलैदरम्यान खेळवली जाणार आहे. 26 व 27 रोजी दोन महिला बुद्धिबळपटू परस्परांसोबत खेळतील आणि हा खेळ बरोबरीत राहिला, तर 28 तारखेला विश्वचषकाचा अंतिम सामना होईल. अंतिम सामना कोणत्याही दोन खेळाडूंमध्ये झाला, तरी हा विश्वचषक भारतात आल्यात जमा आहे. विश्वचषक भारताला मिळणार, हे निश्चित आहे, याचे कारण म्हणजे अंतिम फेरीची लढत आपल्याच देशातील दोन महिलांमध्ये होणार आहे. या दोघी महिला म्हणजे, कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख होत. हा विश्वचषक आपला होईल तेव्हा यावर्षी पुरुष आणि महिला असे दोन्ही बुद्धिबळाचे विश्वचषक आपल्या देशामध्ये असतील. प्रत्येक भारतीय मनाला सुखावणारी ही गोष्ट आहे.
उल्लेखनीय आणखी एक बाब आपल्या महाराष्ट्रीयन म्हणजेच मराठी लोकांचा अभिमान वाढवणारी आहे. बुद्धिबळपटू दिव्या देशमुख ही मूळ नागपूरची रहिवासी आहे. अंतिम फेरीमध्ये कोनेरू हम्पी जिंकणार की दिव्या जिंकणार, यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे विश्वचषक आपल्या देशात येणार आहे. केवळ लष्करी सामर्थ्यातच नव्हे, तर बौद्धिक सामर्थ्य यातही आपला देश आघाडीवर आहे, याचा आनंद व्यक्त केल्यावाचून राहवत नाही.
विश्वचषकाची बुद्धिबळ स्पर्धा खूपच रंगतदार झाली. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोनेरू हम्पी हिने चीनच्या टिंगजी हिला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी दिव्या देशमुख हिने टॅन या चीनच्या खेळाडूला पराभूत करून फायनल मध्ये प्रवेश केला होता. याचा निष्कर्ष हाच की, आता अंतिम फेरीची लढत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यामध्येच होणार आहे. भारताच्या दोन व चीनच्या दोन अशा चार खेळाडू महिला विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या होत्या. त्यामुळे भारत-चीन अशीच ही लढत ओळखली जात होती; पण आपल्या दोन्ही महिला खेळाडूंनी चीनच्या खेळाडूंना पराभूत करीत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले, तर मंडळी, विजय आपल्या देशाचा आहे, हे निश्चित आहे. आता फक्त उभय महिला बुद्धिबळपटूंपैकी जिंकणार कोण, एवढीच उत्सुकता कायम आहे. चला तर, तयार होऊयात देशाचा विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी!