Jantar Mantar protest | सामर्थ्य दिसेल चळवळीचे?

mumbai vartapatra
mumbai vartapatra
Published on
Updated on

मृणालिनी नानीवाडेकर

जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही फरक पडू शकेल. तरुण मतदारांचे प्रमाण, विरोधकांची तयारी आणि सत्ताधाऱ्यांची रणनीती यांचा परस्परसंबंध आगामी सत्तासमीकरणांत दिसून येईल.

जंतर-मंतरवरच्या तरुणांच्या बंडाला महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला, असे म्हणतात. अभिजित दीपके यांचे मूळ महाराष्ट्रातले असल्याने असेल किंवा नसेल; पण तेथे महाराष्ट्र सर्वत्र दिसत होता. आंदोलनाची तीव्रता, त्यामागचा असंतोष लक्षात घेता राज्यात या आंदोलनाचे राजकीय पडसाद जाणवतील का? ‘सीजेपी’ पुढचे राजकारण ठरवण्यासाठी बैठक घेते आहे, देशव्यापी दौरा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत हे ‘जेन झी’शी संवाद साधणार आहेत. प्रचंड राजकीय आवर्तनातून समाजमन जाते आहे. लोकसभेचे निकाल विधानसभेत पार बदलताहेत. देश पातळीवर स्पष्ट बहुमत नसलेल्या भाजपचे दिवस भरले, अशी चर्चा रंगते आहे. बिहारमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन स्वत:च्या २० वर्षांच्या मतदारसंघात विजयाची हमी देऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात जिथे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी युतीला प्रचंड यश मिळाले, तिथे साडेतीन वर्षांनी काही वेगळे निर्णय लागू शकतील? त्याचे उत्तर शोधण्यासाठी काही आकडे पाहणे उचित ठरेल.

महाराष्ट्रात ३० ऑगस्ट २०२४ रोजी विधानसभेसाठी मतदारयाद्या घोषित झाल्या, त्यावेळी ९.५३ कोटी मतदार नोंदवले गेले होते. यातील ३० ते ४९ या वयोगटात सर्वाधिक म्हणजे सुमारे दोन कोटी मतदार होते. २० ते २९ या वयोगटात त्या खालोखाल १.८ कोटी मतदार होते. म्हणजे महाराष्ट्राचे चित्र हे ३० ते ६० या वयोगटातील मंडळी ठरवतील, हे निश्चित आहे. आगामी निवडणुकांत तीन वर्षांनी सुमारे एक कोटी तरुण मतदार दाखल होतील, असे सांगितले जाते. या विधानाला शास्त्रीय अर्थ नाही. १८ ते १९ या वयोगटातले महाराष्ट्रातले मतदार केवळ १८.६ लाख आहेत. त्यात खरेच नव्या १ कोटीची भर पडली, तरी महाराष्ट्र हा प्रौढ मतदारांचा प्रदेश असेल. नवे १ कोटी मतदार खरेच नोंदले गेले, तर ३० वर्षांखालील मतदारांची संख्या २.८ कोटी इतकी असेल. संभाव्य मतदारसंख्या १०.५३ कोटी (३० ऑगस्टची संख्या आहे ९.५३ कोटी). त्यात २.८ कोटी म्हणजे २५ टक्‍क्‍यांच्या आसपास. म्हणजेच एकचतुर्थांश. दीपके यांच्यामुळे जंतर-मंतरवर मराठी तरुणाई मोठ्या प्रमाणात गेली, तरी महाराष्ट्र हा तरुणांचा प्रदेश नाही, तो मध्यमवर्गीयांचा भूभाग असेल.

महाराष्ट्रातील सुमारे २६ टक्के मतदार ‘जेन झी’ या वयोगटात मोडतात. ते सगळेच अस्वस्थ असतील तर? देशाचे राजकारण जंतर-मंतरवरील १५ दिवसांनी बदलले असेल, तर त्याचा लाभ घेण्याच्या स्थितीत महाराष्ट्रातला विरोधी पक्ष आहे का? लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि मित्रपक्षांचा आधार घ्यावा लागला. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि त्याचे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्रितपणे प्रचंड बहुमत मिळवले. विरोधी पक्ष नाराज झाले. लोकसभेचे निकाल धुवून निघाले. या बहुमतामुळे विरोधी पक्ष बरेच नाराज झाले. असे कसे झाले? आता करायचे तरी काय? जनतेला आम्ही पसंत का पडत नाही, अशी विरोधी पक्षात भावना असताना मतदानयंत्र, भारतीय जनता पक्षाचे निवडणूक तंत्र याबद्दल मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली.

खरे तर यापलीकडे जाऊन जनतेच्या मनात प्रचंड खदखद आहे, काहीतरी खुपते आहे, हे आता जंतर-मंतरवरील आंदोलनाने स्पष्ट झाले आहे. तरुण अस्वस्थ आहेत. संभाव्य बेरोजगारी तरुणांना अस्वस्थ करते आहे, तर महागाई पालकांना पिडते आहे. भाजपचे समर्थक मतदारही ‘सारे काही ठीक सुरू नाही’ या मतापर्यंत पोहोचलेले, अशी सामूहिक अस्वस्थता मोदींच्या कार्यकाळात भारताने प्रथमच पाहिली असावी. अर्थात, मुद्दा आहे तो या असंतोषाचा उपयोग विरोधी पक्ष जनतेचा मूड बदलण्यासाठी करू शकतात का?

जंतर-मंतर अस्वस्थ असताना मुंबईत आणि महाराष्ट्रात त्याची आवर्तने अचूकरीत्या उमटली. ठाकरे बंधू सक्रिय झाले, मोर्चासाठी पुन्हा एकदा एकत्र आले. भाजपच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ला काही बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मदत करणार, अशी चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनीही युवकांच्या बाजूने उभे राहणे पसंत केले. शरद पवार स्वतः जंतर-मंतरला जाऊन आले. काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सरकारबदलाबाबत कमालीचे आशावादी आहेत. कुठलेही राजकीय वजन नसलेल्या सपकाळांना आता सत्ता बदलेल, असे जे काय वाटते ते खरे करण्यासाठी विरोधी पक्षांना मेहनत घ्यावी लागेल. ‘आता उठवू सारे रान’सारखी अवस्था महाराष्ट्रात निर्माण होण्यासाठीची मेहनत करायला विरोधी पक्ष तयार आहेत का? एकचतुर्थांश तरुण समवेत ठेवायचे आणि उरलेल्या तीनचतुर्थांश जनतेत अंगार पेटवायचा हे वाटते तितके कठीण नाही, असे जंतर-मंतर आंदोलनावरून म्हणता येईल; पण ते तेवढे सोपेही नसेल.

युवकांच्या भावनांचा उद्रेक लक्षात घेता शिवाजी पार्कवरील सभेला उत्‍स्फूर्त गर्दी झाली. निवडणुकीपुरते एकत्र येणारे ठाकरे बंधू मंचावर समवेत नांदले. आदित्य ठाकरे यांची कथनाची शैली, संवाद, त्यांचे व्यक्तिमत्व, यामुळे त्या पिढीत त्यांच्यासारखा नेता नाही. अमित ठाकरे अमित ठाकरे नवे आहेत. काय बोलायचे ते आता सुचत नाही, असे म्हणून प्रामाणिकपणे वागतात. महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावल्यागत फिरणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्याही क्षमतेचा नेता भाजपकडे सध्या तरी दिसत नाही. श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र आता राज्यव्यापी दौरे करत आहेत. त्यांची प्रतिमा काम करणारा तरुण, अशी झालेली आहे. असे घराण्यातील राजकारणामुळे पुढे आलेले तरुण जनतेला आवडतील का? सत्ताधारी युतीकडे तरुण नेते नाहीत. मात्र, तरीही विरोधकांना तीन-चार वर्षांनंतर महाराष्ट्रात सत्तापालट करता येणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

खरे तर निवडणुकीतले जय-पराजय हे जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणावर, एवढे ठरवण्यापुरते मर्यादित असतात; पण राजकारणातला प्रचंड पैसा लक्षात घेता येथे आशेने लोक जमतात. जिंकणे ही प्रत्येकाची गरज झाली आहे. त्यासाठी कशा पद्धतीने समीकरणे रचली जातात ते बघणे महत्त्वाचे असते. एकेकाळी महाराष्ट्राचे युवा नेते म्हणून तरुण वर्गात प्रचंड लोकप्रिय असलेल्या राज ठाकरे यांनी या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी मेहनत घेतलेली दिसते. उद्धव ठाकरेही ती घेत आहेत. मात्र, प्रत्यक्षात या प्रयत्नांना फळ मिळेल का, याकडे लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा संख्याशास्त्रीय अभ्यास केला, तर ‘जो युवक हितकी बात करेगा, वहीं यहा पे राज करेगा,’ असे म्हणण्याइतकी परिस्थिती आहेही. मात्र, राजकारणातील तरुणांची सक्रियता म्हणावी तशी दिसत नाही. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने युवक आघाडीची कार्यकारणी अद्याप नेमलेली नाही. युवा प्रदेशाध्यक्ष नेमून काही महिने उलटले, तरी त्याबद्दल एकमत होत नसेल तर तरुणांपर्यंत पोहोचणार तरी कसे? खरे तर, देशातील समस्यांमुळे प्रौढही आता सरकारला दुषणे देत आहेत. ‘लाडकी बहीण’सारख्या लोकप्रिय गोष्टी चित्र बदलतात. युवकांसाठी अशाप्रकारे कोणती योजना आखली जावी, त्याचे लाभ काय होतील, याचाही विचार सत्तापक्ष करत असतील. युवक अशा आश्वासनांना बधतो का, हे बघणेही महत्त्वाचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news