

मृणालिनी नानिवडेकर
आभाळाच्या अवकृपेने महाराष्ट्रातील शेती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अभूतपूर्व संकटात सापडली आहे. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांवर दुष्काळाचे सावट असताना घटते अन्नधान्य उत्पादन, पाणीटंचाई आणि वाढते स्थलांतर यामुळे राज्यापुढे गंभीर सामाजिक-आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे.
महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले आहे. ३५८ पैकी ३१० तालुके दुष्काळी घोषित केले आहेत. सुपर अल निनोचे वर्ष आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर हजार टँकर पाणीपुरवठ्याच्या मोहिमेवर लागले आहेत. शिवारे ओस पडल्याने शहरे जवळ करायचा दिवस आता दूर नाही, या मानसिकतेत गावकरी आहेत. ‘अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा’ असे म्हणत ‘कृपाळूवा परम पुरुषा, करुणा तुज कैसी न ये’ ही व्यंकटेश स्तोत्रातली विचारणा गावागावांतला शेतकरी करतो आहे. कार्तिकी एकादशीला पंढरपूरला ९ ते १० लाख भाविक जातात. यावेळी दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने जेमतेम ६ लाखांनी वारीला हजेरी लावली म्हणतात. पोटापाण्यासाठी शहरे गाठावी लागतील, असा गावांचा सूर आहे, अन् या गावाकऱ्यांचे ओझे वाटावे, अशी शहरांची स्थिती आहे. लोंढे आले की ताण वाढतो. झोपडपट्ट्या फुगतात. अगतिक झालेले चोऱ्यामाऱ्या करून पोट भरतील, अशी भीती व्यक्त केली जाते. एकूण काय तर दिवस मोठे कठीण येणार आहेत. डिसेंबर-जानेवारीपर्यंत कसेबसे रेटता येईल, नंतर खरोखर जनतेला आणि जनतेचे वाली असलेल्या सरकारला दररोज युद्धाचा सामना करावा लागेल.
बारमाही पाणीपुरवठा नसलेली महाराष्ट्रातली शेती यावर्षी घोर संकटात सापडली आहे. महाराष्ट्राचे प्रति माणशी प्रति महिना कृषी क्षेत्रातले उत्पादन ११ हजार ४९२ रुपये आहे. राष्ट्रीय सरासरी १० हजार २१८ रुपये असल्याने आपले तसे बरे चालले आहे, असे म्हणायला वाव असे. महाराष्ट्राच्या उत्पन्नात ११ टक्के वाटा शेतीचा, तसा जेमतेम. सेवा क्षेत्राचा ६४ % तर औद्योगिक उत्पादनाचा २४ %. त्यामुळे महाराष्ट्र तसे रूढ अर्थाने कृषिप्रधान राज्य म्हणता येणार नाही. मात्र या ११ टक्के उत्पन्नावर महाराष्ट्रातील ५० टक्के जनता अवलंबून असल्यामुळे कृषी क्षेत्रातील साधे संकट अर्थकारणासाठी आणि राज्याच्या एकूण व्यवस्थेसाठी भयावह होऊ शकते.
यावर्षी आभाळच रुसले आहे. पावसावर पोसल्या जाणाऱ्या राज्यातल्या शेतीचा प्रमुख हंगाम खरीप. तो गेला, जमीन भेगाळली, कोरडी ठाक झाल्याने दुसराही निराशेच्या गर्तेत फेकणारा निघाला. दोन्ही हंगाम हाताबाहेर गेले आहेत. पिण्यालाही पाणी नाही, अशी स्थिती आहे. मराठवाड्यातील काही शहरांना दहा दिवसांतून तर कुठे आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होतो आहे. लातूर हे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या विलासराव देशमुख यांचे गाव. मुख्यमंत्र्यांच्या नजरेखाली ते सिंचित व्हावे ही अपेक्षा. पण, या गावातही काही वर्षांपूर्वी रेल्वेने पाणी पाठवावे लागले होते. आताही परिस्थिती तशीच भीषण असेल, असे मानले जाते आहे. असे पाणी पाठवणे योग्य होते की नव्हते, असा एक नवाच राजकीय मुद्दा महाराष्ट्रात तयार झालेला आहे. तशी या भागातील जवळपास सगळीच शहरे पाण्यासाठी तहानलेली. १९०१ पासूनची अर्धी वर्षे दुष्काळात गेली अशी सरकारी नोंद. ते वास्तव बदलण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. पाणी साठवणे ही लोकचळवळ होऊ शकली नाही. मराठवाड्यातील क्षेत्र पावसामुळे सतत संकटात. बेरोजगारीमुळे रित्या हातांनी आंदोलनासाठी हात उगारणे हे या भागाचे वास्तव.
उर्वरित महाराष्ट्राची स्थितीही फारशी बरी नाही. आत्महत्येंचे पेव फुटले आहे. माणसे जगायला भिडण्याऐवजी भिऊ लागली आहेत. महाराष्ट्रातल्या ५२ टक्के शेती भागात कायमस्वरूपी सिंचन व्यवस्थाच नाही. महाराष्ट्रातील बहुतांश शेती कोरडवाहू. आता नदीजोड प्रकल्प आखले जात आहेत. मुंबईची तहान भागवायला कोयनेतून पाणी आणले जाणार आहे. हे होईल तेव्हा होवो, सध्या मात्र बिकट अवस्था आहे. बारा महिने दुष्काळ, तो झाला भयावह विक्राळ, अशी स्थिती आहे. त्याच्या झळा आताच जाणवू लागल्या आहे.
कृषी विभागाने तयार केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार झोप उडण्याची स्थिती आहे. अन्नधान्य उत्पादनावर अत्यंत विपरीत परिणाम झाले आहेत. अन्नधान्याचे उत्पादन ३२ लाख टनांनी किंवा आकडेवारीत सांगायचे तर मागच्या वर्षीपेक्षा तब्बल ४४ टक्क्यांनी घटले. डाळ उत्पादनात फार मोठा फटका बसला असून ५७ % घट नोंदवली गेली आहे. ९.६ लाख टनाची तूट उत्पादनात जाणवते आहे. खरीप हंगाम पावसावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातला अर्थातच सर्वात मोठा हंगाम. या हंगामातील अंदाजाची प्रारंभिक आकडेवारी ऑक्टोबर अखेरीला मंत्रालयात तयार झाली. ४७ % अन्नधान्य तूट आणि ५५% तेलबियांमध्ये घट हा सर्वात मोठा फटका मानला जात असून १९७२ च्या दुष्काळातही परिस्थिती अशी नव्हती. जाणकार सांगतात ७२ मध्ये पिण्याला तरी पाणी होते, यावर्षी तेही नसेल.
साखरेचे महाराष्ट्राला वेड. एकदा का उसाची पेरणी केली आणि दोन-तीनदा पाणी दिले की पिकाकडे पहावेच लागत नाही. अशा आकर्षक पिकाने पाणी पिऊन महाराष्ट्राची जमीन वाळवंट केली आहे. राज्याला या पिकाचे वेड लागले आहे. मराठवाड्यात पाण्याचा कायम दुष्काळ, पण तेथे देखील गेल्या काही वर्षांत उसाच्या लागवडीत तब्बल २७ % वाढ झाली आहे. इथेनॉलसारख्या गोष्टींमध्येही ऊस वापरला जात असल्यामुळे आणि या पिकाला सरकारी आशीर्वाद असल्यामुळे जो तो उसाची लागवड करण्यासाठी धावपळ करत असतो. कापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील दुसरी नगदी पिके. कापसाच्या उत्पादनात ४२ टक्के घट झाली आहे तर सोयाबीनमध्येही ५६ % तूट आहे. खरे तर अपुऱ्या पाण्यात डाळींची उत्पादने उत्तम प्रकारे घेतली जातात. महाराष्ट्राने जशी फळबागेत क्रांती केली तसेच डाळीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होऊ शकत होता, मात्र यावर्षी हे पीकही रुसले आहे. खरीप गेले, रबीचेही काही वेगळे चित्र नाही. खरे तर जमिनीतली ओलच पूर्णपणे नाहीशी झाल्यामुळे आता खरिपाच्या पिकाकडेही शेतकरी आशेने बघू शकत नाही. यावर्षी ऑगस्टमध्येच पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे जमिनीतला ओलावा कमी झाला.
रबीच्या केवळ १४.७४ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्याचे आकडेवारी दाखवते. १९७२-७३ मध्ये दुष्काळाने महाराष्ट्राला वेढले असतानाही हे प्रमाण ४४.६९ लाख होते. गेल्या ४०-५० वर्षांत अर्थातच शेतीचे स्वरूप बदलले. बरीच जमीन शहरीकरणाखाली आली. तरीही साधारणतः ५० ते ६० लाख हेक्टरवर रब्बीचे पीक महाराष्ट्रात घेतले जाते. यावेळी हे प्रमाण जेमतेम १४ % च्या आसपास आहे. सरकारने दुष्काळाची एकूण जाणीव ठेवत यावर्षी प्रारंभापासूनच आखणी केली हे मान्य; परंतु सरकारला या सर्व उपाययोजना किती गंभीरपणे प्रत्यक्षात आणता येतील याकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मनोरंजनाचे कार्यक्रम कमी खर्चिक होतील काय? नागपुरात सुरू होणाऱ्या अधिवेशनात दुष्काळाचे प्रश्न गोंधळ न घालता चर्चेला आणले जातील काय? जिल्हा परिषदा आणि जिल्हा बँकेत पाय ओढण्याचे राजकारण पुरे झाले. शाश्वत शेतीचा पर्याय स्वीकारत जलयुक्त शिवारांचे स्वप्न खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणण्याचा धडा दुष्काळ शिकवेल काय? हा सध्याचा प्रश्न आहे. अस्मानी संकटात सुलतानी मदत नितांत गरजेची आहे.