

डॉ. राहुल रनाळकर
नाशिकमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मेगाभरती झाली. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे इनकमिंग पार पडले. या निवडणुकीत खरा प्रश्न बंडखोरी रोखण्याचा आहे.
मेगा पक्ष प्रवेशांसाठी ओळखल्या जाणार्या भाजपमध्ये नाशिकमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मेगाभरती झाली. नाशिकची धुरा ज्यांच्याकडे आहे, असे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे इनकमिंग पार पडले. मनसेचे राज्य सरचिटणीस दिनकर पाटील, काँग्रेसचे निष्ठावंत शाहू खैरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर अॅड. यतीन वाघ, सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले आणि मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, एक दिवस आधी ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा जल्लोष करणारे दिनकर पाटील, पांडे, वाघ हे दुसर्याच दिवशी भाजपमध्ये गेले. मनसेमध्ये प्राण फुंकणारे दिनकर पाटील हे पक्षासाठी नाशिकचे सर्वेसर्वा झाले होते.
महाविकास आघाडीची मोट बांधण्यात त्यांचे योगदान होते. त्यामुळे मनसेचा बुरूज बर्याच अंशी ढासळल्याचे चित्र आहे; तर सातपूरमध्ये वर्चस्व असलेले पाटील भाजपमध्ये आल्याने सर्वच वरिष्ठांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सिडकोमध्ये यापूर्वीच सुधाकर बडगुजर भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे सिडकोमध्ये भाजपचे पुढचे मार्ग मोकळे झालेले दिसून येतात. नाशिक पूर्वमध्ये गणेश गीते यांच्यासारखा युवा नेता भाजपने पुन्हा खेचून घेतला आहे. एकूणच जिथे जिथे भाजपला धक्का बसू शकतो, असे प्रतिस्पर्धी पक्षांतील दिग्गज नेते भाजपने निवडून गळाला लावले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली भाजपमधील ही मेगाभरती पक्षासाठी महापालिका निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते. या भाऊगर्दीत निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही खुद्द महाजन यांनी दिली आहे.
या मेगाभरतीमुळे नाशिकने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. 122 नगरसेवकांची ही लढत केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित नाही. ही निवडणूक सत्ताधारी महायुती आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची, तर पक्षांतर्गत इच्छुकांसाठी अस्तित्वाची ठरणार आहे. भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा देऊन राजकीय रणशिंग आधीच फुंकले आहे. मात्र, या नार्यामुळे भाजपसमोर आज सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे, ते म्हणजे इच्छुकांची प्रचंड फौज आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य बंडखोरी.
शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत महायुती करायची झाली, तर भाजपला मोठी तडजोड करावी लागू शकते. राष्ट्रवादीला किमान 10, तर शिवसेनेला 35 जागा देण्याची गणिते भाजपकडून मांडली जात आहेत. प्रत्यक्षात शिवसेनेची मागणी 45 आणि राष्ट्रवादीची 40 जागांपर्यंत पोहोचली आहे. या मागण्यांमुळे भाजपच्या ‘शंभर प्लस’च्या दाव्याला थेट सुरुंग लागतो. त्यामुळेच महायुती होण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. महायुती झाली, तर सर्वात मोठा फटका बसेल तो म्हणजे पक्षातील निष्ठावंत इच्छुकांना. एका जागेसाठी भाजपकडे 40 ते 50 इच्छुक असल्याचे चित्र आहे.
एकीकडे विरोधक मोट बांधण्यात आघाडीवर आहेत, तर त्यांच्या निवडक नेत्यांना गळाला लावण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जवळपास 40-40 जागांचे वाटप निश्चित झाले आहे. उर्वरित जागांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, वंचित आघाडी आणि रासप यांचा समावेश असणार आहे. नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपकडून झालेल्या चुका महापालिकेत पुनरावृत्त झाल्यास त्याचा थेट फायदा विरोधकांना होऊ शकतो, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. गिरीश महाजन, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, दादा भुसे, अजय बोरस्ते, समीर भुजबळ, दत्ता गायकवाड, वसंत गीते अशा मोजक्या चेहर्यांभोवती सध्या नाशिकचे राजकारण फिरताना दिसते. हे नेते ठरवतील ती दिशा, अशी स्थिती आहे. मात्र, या निवडणुकीत खरा प्रश्न चेहर्यांचा नसून, संघटन, इच्छुकांचे व्यवस्थापन आणि बंडखोरी रोखण्याचा आहे.