Mental health awareness | कधी थांबणार या आत्महत्या?

Mental health awareness  |
Mental health awareness | कधी थांबणार या आत्महत्या?(Pudhari Photo)
Published on
Updated on

मृणालिनी नानिवडेकर

आयआयटीसारख्या संस्थेतील साहिल वाकोडे याच्या आत्महत्येमुळे शिक्षणव्यवस्थेने आत्महत्यांमागची कारणे समजून घेऊन प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

साहिल रवींद्र वाकोडे या आयआयटीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवले. देशभरातले २५ ते २७ लाख तरुण ज्या परीक्षेसाठी जीवाचे रान करतात, ती परीक्षा पास करून आयआयटी मुंबई या महत्त्वाच्या कॅम्पसमध्ये साहिलने प्रवेश मिळवला होता. हाताशी आलेल्या मुलाचे कलेवर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्याचा दुर्दैवी प्रसंग साहिलच्या आई-वडिलांवर आला. मुलाचे कलेवर खांद्यावरून नेण्याची वेळ कोणत्याही पालकावर येऊ नये. मानवी जीवनात असा दु:खद प्रसंग नसेल. केवळ एक वाकोडेच नव्हे, तर आयआयटीत शिकायला मिळावे यासाठी परिश्रम करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी तेवढे गुण मिळवून यशस्वी झालेल्यांपैकी दीडशेहून अधिक मुलांनी कॅम्पसमध्येच जीवन संपवले आहे.

धीरज सिंग नावाचे आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आयआयटीत प्रवेश मिळालेल्या दलित आणि आदिवासी मुलांना आधार देणारी संस्था चालवतात. डिजिटल माध्यमातून उभारला गेलेला हा प्लॅटफॉर्म आहे. धीरज सिंग यांनी गेल्या वीस वर्षांत आयआयटी कॅम्पसमध्ये झालेल्या आत्महत्यांची यादी तयार केली. या यादीचा आधार आहे, माहिती अधिकारातून मिळालेली माहिती तसेच लोकसभेत काही प्रश्नांना दिली गेलेली उत्तरे. या माहितीतून अत्यंत अस्वस्थ करणारे तपशील समोर येतात. आयआयटी खरगपूर येथे २९, आयआयटी मद्रास येथे २६, आयआयटी कानपूर येथे २१, आयआयटी दिल्ली येथे १७, आयआयटी मुंबई येथे १४, आयआयटी गुवाहाटी येथेही १४, आयआयटी हैदराबाद येथे ९, आयआयटी रुरकी येथे ८, आयआयटी पाटणात ७ आणि आयआयटी वाराणसीत ६ विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आयुष्य संपवले. आयआयटी भुवनेश्वर येथे ही संख्या ५ आहे, धनबाद येथे ४, गांधीनगरमध्ये ३, रोपार येथे २ तर नव्यानेच उभारल्या गेलेल्या मंडी, जोधपूर, तिरुपती, धारवाड, गोवा आणि इंदूर या आयआयटीमध्येही प्रत्येकी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्यांचे जसे पीक आले होते, तसेच काहीसे आयआयटीतल्या विद्यार्थ्यांबाबत झालेले दिसते. ही परिस्थिती चिंताजनक आहे. खरे तर वारंवार होणाऱ्या आत्महत्या टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. भारतातील शैक्षणिक वर्तुळाने मुळापासून विचार करणे आवश्यक आहे. साहिल वाकोडे याचे जाणे शेवटचे ठरावे. या प्रश्नाची चिकित्सा करताना हे ध्येय मनात ठेवले पाहिजे. वाकोडे याचे आई-वडील आपले दुःख उराशी बाळगत गावी निघून गेले. त्यांना काही प्रश्न व्यवस्थेला विचारायचे असतील. त्या मूक प्रश्नांची उत्तरे देत सुधारणा करणे ही साहिलसारख्या तरुणांना खरी श्रद्धांजली ठरेल.

मानसोपचार तज्ज्ञ हरीश शेट्टी यांनी एखाद्या मृत्यूनंतर जशी शव चिकित्सा केली जाते, तशी त्या अभागी जीवाच्या मानसिक स्थितीची मीमांसा करण्याचा उपाय सुचवला आहे. विद्यार्थ्यांना काय खुपते याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल महाविद्यालयांमध्ये जे युवक शिकत असतात, ते भारताचे भविष्य आहेत. इंग्रजीत याला ह्यूमन कॅपिटल म्हटले जाते. हे अभियंते किंवा डॉक्टर्स तयार व्हावेत यासाठी करदात्यांचाही हातभार लागत असतो. आयआयटीमधील शुल्क नाममात्र असते. हे प्रवेश पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर असल्याने तेथे पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना ही निवड मानाची तर वाटतेच; पण आज मध्यम किंवा निम्न आर्थिक वर्गात असलेल्या भारतातील पालकांच्या खिशाला ते परवडणारे असते. उच्चभ्रू मुलांबरोबर समाजाच्या साध्या किंवा पददलित वर्गातील ही मुले जेव्हा शिकू लागतात, तेव्हा मागासपणाच्या काही खुणा त्यांच्या प्रगतीच्या आड तर येत नाहीत ना, याकडे लक्ष द्यायला हवे असते. पहिले वर्ष त्रासदायक ठरते. खरे तर या संस्थांमध्ये प्रवेशाची जी पद्धत आहे, तीच मुळात सदोष आणि कुचकामी आहे. नीट परीक्षा पद्धतीतील आणि त्या संचालनातील त्रुटी यावेळी समोर आल्या. शिकवणी वर्गांच्या मदतीने पेपर फोडला जात असेल तर सज्जन विद्यार्थ्यांनी काय करायचे? ते पेपर उपलब्ध करून न देणाऱ्या शिकवणी वर्गात गेले याची किंमत मोजायची? शिक्षण क्षेत्र हे भ्रष्टाचाराचे आगर झाले आहे. तो मोठा गंभीर विषय. आयआयटीत २५-३० लाखांमधून निवडल्या गेलेल्या १७ ते १८ हजार विद्यार्थ्यांमध्ये आपण पोहोचलो हे समाधान मुलांना मिळत असणार. गुणातील तफावतीमुळे कमी गुण मिळालेले मागास इथे का, असा प्रश्न पडत असणार. मागासांच्या विकासासाठी आरक्षण असल्यामुळे पददलितांना शिक्षणाची जी संधी मिळते आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे हे उच्चभ्रूंना कळत नसणार. मग गट पडतात. शैक्षणिक संस्थांमध्ये जातिनिहाय गट तयार होतात. हे गट इतके खोलवर रुजलेेत की, पोटजातीनुसारही विद्यार्थ्यांची वर्गवारी तयार होत जाते. मेधावी तरुण अशा प्रकारे आपल्याच समाज गटाचा स्वतःसाठी आधार शोधतात. त्यांचे समुपदेशन करण्यासाठी आता व्यवस्था लागल्या आहेत. दर पंधरा मुलांमागे एक प्राध्यापक अशी रचना करून त्या प्राध्यापकाने मित्र होऊन वागावे, दर आठवड्यात भेटावे अशीही रचना.

चाय-समोसा मीटिंग अशा नावाने होणाऱ्या या अनौपचारिक बैठकांमध्ये प्राध्यापकांनी त्या मुलाचे भावनिक पालकत्व स्वीकारावे अशी कल्पना आहे. आयआयटी मुंबईमध्ये अशा बैठका होतात असे म्हणतात. त्या त्या मुलाचा हात पकडून त्याला जीवनाच्या लढाईसाठी प्राध्यापक तयार करतात याचा देखील कुठेतरी आता अभ्यास व्हायला हवा. साहिल वाकोडे याने परवानगी नसताना चॅटजीपीटी वापरले असा आरोप आहे. त्याला टोकले आणि समजावून सांगितले म्हणून तो अस्वस्थ झाला, असेही म्हणतात. खरे काय ते पोलिस तपासातून पुढे येईल. मात्र कॉपी करू नको आणि नियमानुसार वाग, हे सांगण्याचा संबंधित प्राध्यापकाचा हक्क नाही काय, असा सवाल करत सत्यनारायण डुल्ला नावाच्या या प्राध्यापकावर कारवाई व्हावी का, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. पोलिस तक्रारीत साहिलच्या वडिलांनी आयआयटीचे संचालक शिरीष केदारे आणि प्रा. सत्यनारायण डुल्ला यांचे नाव नोंदवल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. डुल्ला हे त्याच्याशी संबंध असलेले मेंटर. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा तर दाखल होणार नाही ना, अशी भीती आहे. विद्यार्थ्यांनी योग्य मार्गांचा अवलंब करावा हे समजून सांगणे हे प्राध्यापकांचे कर्तव्य असते अशी पत्रके निघाली आहेत. ठिकठिकाणी युवकांची आंदोलने सुरू आहेत.

आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे हे शैक्षणिक प्रमुख असले तरी कोणताही विद्यार्थी त्यांच्या कार्यालयात त्यांच्याशी संपर्क साधू शके. आयआयटीमध्ये समुपदेशनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करावे यासाठी केदारे यांनी पुढाकार घेऊन त्यात लक्षही घातले, असे म्हणतात. विद्यार्थ्यांच्या जमावाला ते शांतपणे सामोरे गेले आणि तुमचे समाधान होत असेल तर मी आज राजीनामा द्यायला तयार आहे, असे विधानही करून मोकळे झाले. मुद्दा हा आहे की, केदारे यांचा राजीनामा आणि डुल्ला यांच्यावर कारवाई केली तर सगळे व्यवस्थित होणार आहे काय? शैक्षणिक संस्थाने हे दुर्दैवाने राजकीय अड्डे झाले आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याबाबत दुमत नाही. आयआयटीसारख्या संस्थांमध्येही जातनिहाय भेदभावपूर्ण वर्तन होणे चूक. तसा आरोपही कुणाला करता येणार नाही याची काळजी घ्यावी. उद्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आयुष्य नको होणे हे अत्यंत वाईट आहे. भारतातील शैक्षणिक वातावरण मलीन होते आहे. तसाही युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारत शिक्षण क्षेत्रात मागे आहे. त्यातच ही अस्वस्थता. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबणे आवश्यक आहे. त्यावरची उपाययोजना ही राजकीय लढ्यांमध्ये परिवर्तित न होता ती काही निष्कर्षापर्यंत पोहोचावी आणि तरुणांचे मृत्यू थांबवावेत एवढीच अपेक्षा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news