कोर्स कोणताही असो, कॉलेज बेस्ट निवडा!

Whatever the course, choose the best college
कोर्स कोणताही असो, कॉलेज बेस्ट निवडा! Pudhari File Photo
Published on
Updated on

यशाचे मापदंड ठरविण्यासाठी काही निकष निश्चित केलेले आहेत. यश मिळविण्याची प्रक्रिया ही तुम्ही निश्चित केलेल्या ध्येयसिद्धीच्या आरंभापासूनच सुरू होते. असे म्हटले जाते की, ‘Well begun is half done.’ म्हणूनच तुमच्या करिअरचा अभ्यासक्रम कोणताही असू दे, तो जिथे शिकायचा आहे, ते कॉलेज बेस्ट असले पाहिजे. येथेच तुमचे निम्मे यश दडले आहे.

बारावीनंतर पुढे काय, हा प्रश्न त्यांनाच पडतो ज्यांनी बारावीनंतर पुढे काय करायचे, हे बारावीची परीक्षा देईपर्यंत ठरवले नसते किंवा बारावीचे परसेंटेज बघून ठरवू, अशी ज्यांची धारणा असते किंवा कोणत्या क्षेत्रात संधी जास्त आहेत, याचा शोध ज्यांचा संपलेला नसतो. गुणांची टक्केवारी कितीही असू दे, ज्यांना भविष्यात काय करायचे आहे, हे ठरलेले आहे ते विद्यार्थी बारावीनंतर काय, या विवंचनेत चाचपडत बसत नाहीत. ज्याला आयएएस बनायचे आहे, त्याला बारावीत फक्त 35 टक्के गुण पडले, तरी तो यूपीएससी परीक्षा देण्याची जिद्द सोडत नाही. कारण, त्याला माहीत असते की, पदवी परीक्षेत निव्वळ पास क्लास मिळाला, तरी तो काही बुद्धिमत्तेचा अंतिम पुरावा नाही. यंदा अभियांत्रिकी प्रामुख्याने बायोटेक, बायोइंजिनिअरिंग आणि हेल्थ इन्फॉर्मेटिक्स यासारख्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची जास्त पसंती आहे. कारण, या क्षेत्रांत रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. यानंतर संगणक विज्ञान आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग व्यतिरिक्त अन्य अभियांत्रिकी शाखांमध्येही विद्यार्थी रस घेऊ लागले आहेत, असे याबाबतचा अहवाल सांगतो.

राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने मागील वर्षी मंजुरी दिलेल्या महाराष्ट्रातील आठ नव्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांपैकी अंबरनाथच्या मेडिकल कॉलेजने पहिल्याच वर्षी सर्वाधिक 646 पर्सेन्टाईल ‘कटऑफ’ नोंदवला आहे. या आठही कॉलेजांत राज्य सीईटी कक्षाकडून भरल्या जाणार्‍या सर्वच्या सर्व 680 जागा एकाच फेरीत भरल्या गेल्या आणि त्यासाठी जनरल कॅटेगरीतील प्रवेशाचा पर्सेन्टाईल कटऑफ होता 646, तर सर्वात कमी मागास जिल्हा गडचिरोलीच्या कॉलेजचा कटऑफ होता 628 पर्सेन्टाईल. यावरून असे लक्षात येते की, सरकारी वैद्यकीय महाविद्यालये राज्यात कुठेही असू देत, एमबीबीएस बनण्याची तीव— स्पर्धा वैद्यक क्षेत्रात आहे, हे स्पष्ट होते.

भारतीय विद्यार्थ्यांना देश-विदेशात बहुतांश विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गलेलठ्ठ पॅकेजच्या संधी उपलब्ध झाल्याने अभियांत्रिकी आणि वैद्यक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे बारावीनंतर पुढे काय, हा प्रश्न बारावीनंतर पडूच नये, तर बारावीनंतरचं ‘माझं बारावीपूर्वीच ठरलंय’ ही भूमिका प्रत्येक विद्यार्थ्याची हवी. बारावीत किंवा नंतर वर्षभरात तुम्ही निवडत असलेल्या विद्या शाखेची लांबी, रुंदी आणि खोली तुम्हाला पदव्युत्तर शिक्षण घ्यायला गेल्यावर समजेल; पण ते सगळ्यांना शक्य नाही. सध्या सर्वच अभियांत्रिकी शाखांना वाव आहे. प्रत्येक शाखेतील पदवीधर काही अशा गोष्टी करू शकतात जे इतर पदवीधर करू शकणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे, शाखा कुठलीही का असेना, अभियांत्रिकी असो अथवा वैद्यकीय; उत्तम महाविद्यालय निवडा! तिथे तुमच्यासोबत देशभरातील बरीच हुशार आणि मेहनती मुले असतील. ते त्या शिक्षणातून काय घेतात, अभ्यास कसा करतात याचे निरीक्षण करा आणि मेहनत घ्या. तुम्हाला यश आणि पैसाही निश्चितच मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news