

शशिकांत सावंत
कोकणात मुंबईसह आठ महापालिकांची निवडणूक होत आहे. जागा वाटपाचे घोडे अडलेले आहे. पुन्हा एकदा सत्तारूढ महायुतीतील पक्ष कोकणात आमने-सामने आलेले दिसतील. बहुप्रतीक्षित महापालिका निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. 15 जानेवारीला मतदान असल्याने केवळ 30 दिवस मिळणार आहेत. महायुतीच्या नेत्यांनी ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ असे प्रयोग सादर केले, तरी इच्छुकांच्या प्रचंड भाऊगर्दीत जागा वाटपाचे घोडे अडलेलेच आहे. तेव्हा पुन्हा एकदा सत्तारूढ महायुतीतील पक्ष कोकणात तरी आमने-सामने आलेले पाहायला मिळतील.
कोकणात मुंबईसह आठ महापालिकांची निवडणूक होत आहे. मुंबईनंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर अशा या महापालिकांचा रणसंग्राम सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा असणार आहे. मुंबई महापालिकेचे बजेट हे एका छोट्या राज्याच्या बजेटएवढे असल्याने यावर सर्वांचाच डोळा आहे. येथे शिवसेना-भाजप युती एका बाजूला, तर दुसर्या बाजूला उद्धव व राज हा ‘ठाकरे ब्रँड’ असणार आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे तिरंगी लढत अटळ आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली या शिंदे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ताकद वाढल्याने भाजपनेही स्वबळाचा नारा दिला आहे. ठाणे जिल्ह्यात सत्तारूढ पक्षांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी महायुती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत. या सार्या पार्श्वभूमीचा अभ्यास करता शिवसेनेची सत्ता असलेल्या कल्याण-डोंबिवली, ठाणे येथे शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढेल, तर भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर, पनवेल, नवी मुंबई येथे भाजप स्वतंत्र लढणार, हे जवळपास निश्चित आहे. भिवंडी, उल्हासनगर येथे महायुती होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे महत्त्वाच्या महापालिकांत तरी कोकणात सत्तारूढ पक्ष आमने-सामने येतील, अशी शक्यता आहे.
मुंबईसह ज्या महापालिकांत निवडणूक होत आहे, तेथील मतदारांचा आकडाही मोठा आहे. 2 कोटींपेक्षा जास्त मतदार येथे आपले सत्ताधारी ठरवणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी हा मोठा प्रतिष्ठेचा विषय आहे. भाजप हा कोकणातही हळूहळू मोठा पक्ष होत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवर भाजपचा प्रभाव वाढला आहे. रत्नागिरी हा एकमेव जिल्हा आहे, ज्यावर शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव आजही आहे;
मात्र एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या जिल्ह्यातून निवडून येतात, तो जिल्हा ठाणे आहे. त्यामुळे त्यांना ठाणे महत्त्वाचा आहे. ठाण्यात भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा द्याव्यात, असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव भाजप नेत्यांना तेवढासा मान्य नाही. भाजपचे मंत्री गणेश नाईक यांचा बालेकिल्ला नवी मुंबई आहे, तर मीरा भाईंदर हा पूर्वीपासूनच भाजपच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे येथे शिवसेनेला जास्त जागा देण्यास भाजप तयार नाही.
गत महापालिका सभागृहांत मुंबईत शिवसेना 84, तर भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, मनसे 7, समाजवादी पार्टी 6, एमआयएम 2 असे चित्र होते. ठाण्यामध्ये 131 नगरसेवकांपैकी शिवसेना 67, राष्ट्रवादी 34, भाजप 23, तर इतर 7 असे चित्र होते. शिवसेना येथे सरस होती. कल्याण-डोंबिवलीत एकूण 122 पैकी शिवसेना 53, भाजप 43, मनसे 9, काँग्रेस 4, अपक्ष 11, राष्ट्रवादी काँगेस 2 असे चित्र होते. येथेही भाजप-शिवसेना तोडीस तोड होते. मीरा भाईंदरमध्ये भाजप 61, शिवसेना 22, काँगेस 10 असे चित्र होते. येथे भाजप सरस ठरला होता.
भिवंडी-निजामपूरमध्ये काँग्रेस 47, भाजप 19, शिवसेना 12, आघाडी 4 आणि अपक्ष 8 त्यामुळे येथे महाविकास आघाडीचा बोलबाला होता. उल्हासनगरात भाजप 22, शिवसेना 25, ओमी कलानी 15, असे चित्र होते. येथेही शिवसेना-भाजप तोडीस तोड होते. पनवेलमध्ये भाजप 51, शेकाप 23 त्यामुळे येथेही भाजपचा बोलबाला होता. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे 105 जागांवर वर्चस्व होते. नवी मुंबईत शिवसेना 37, भाजप 59, काँगेस 10 असे चित्र होते.
राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपवासी झाल्याने भाजपची संख्या 59 वर गेली होती. त्यामुळे येथेही भाजपचे वर्चस्व पाहायला मिळाले होते. सत्ता समीकरणात भाजप उजवा ठरत असल्याने सत्तेबाबत ते अधिक आशावादी आहेत. त्यामुळे महायुतीत भाजपला अधिकच्या जागा हव्या आहेत आणि हाच महायुतीसमोर आव्हानाचा विषय आहे.