

एखाद्या वस्तीमध्ये समजा तुमचा फ्लॅट आहे आणि त्याला तीस वर्षे झाली आहेत. फ्लॅट इतका जुना झाला म्हणजे येथील रहिवाशांना सगळ्यात जास्त ओढ लागलेली असते ती पुनर्विकासाची, ज्याला सोप्या मराठीमध्ये रीडेव्हलपमेंट असे म्हणतात. रीडेव्हलपमेंट याचा अर्थ जुनी झालेली इमारत पूर्णपणे पाडून त्याच जागेवर नवी इमारत बांधणे ठेवावे होय. तुमच्या स्वतःच्या जुन्या वास्तूशी तुमचा जर काही भावबंध निर्माण झाला असेल तर तो रीडेव्हलपमेंटच्या मार्गातून पुन्हा एकदा तोडला जाऊ शकतो कारण यावेळी इमारत तोडली जाते. ही तोडमोड करणारी जी लॉबी असते ती या प्रकरणांमध्ये अक्षरश: करोडो रुपये कमवत असते.
बिल्डर लोक किंवा त्यांची माणसे आसपासच्या परिसरामध्ये जुन्या इमारती कोणत्या आहेत याची नेहमी पाहणी करत असावेत, असे वाटते. जुन्या म्हणजे साधारण 30-35 वर्षांपूर्वीच्या इमारतींमध्ये गैरसोईचे फ्लॅट बांधलेले असतात. तेथील रहिवाशांना एखादा बिल्डर अप्रोच झाला की त्यांची बोलणी सुरू होतात. समजा तुमचा फ्लॅट 700 स्क्वेअर फिटचा असेल तर नवीन बिल्डिंगमध्ये तुम्हाला अंदाजे 1100 स्क्वेअर फिटचा फ्लॅट मिळतो. आपल्या जुन्या फ्लॅटला नवीन करण्याचे स्वप्न पाहणारा फ्लॅट मालक मात्र खूश झालेला असतो. याची अनेक कारणे असतात.
महत्त्वाचे कारण म्हणजे जुना फ्लॅट जाऊन त्या जागेवर प्रशस्त असा मोठा फ्लॅट त्याला मिळणार असतो. नवीन फ्लॅटचे बांधकाम पूर्ण होण्यास अंदाजे दोन ते अडीच वर्षे लागू शकतात. या काळामध्ये तुम्ही इतरत्र कुठेतरी किरायाने राहणे आवश्यक आहे. तुमचा हा जो काय काळ असेल तुमच्या किरायाच्या फ्लॅटचा किराया बिल्डर देत असतो. याचा साधा सोपा अर्थ म्हणजे सर्व रहिवाशांनी मिळून आपल्या बिल्डिंगचा पुनर्विकास करण्याचे अधिकार त्या बिल्डरला द्यावेत. तिथून आपला बाडबीस्तारा गुंडाळून किरायाच्या फ्लॅटमध्ये दोन ते अडीच वर्षे राहण्यास जावे आणि त्यानंतर ते बांधकाम पूर्ण झाले की पुन्हा आपल्या जागेमध्ये परत यावे की नाही गंमत? एखाद्या बिल्डिंगमध्ये समजा 25 फ्लॅट आहेत तर हमखास एखादा फ्लॅट मालक असा असतो की त्याला या पुनर्विकासामध्ये इंटरेस्ट नसतो.
तो जीवाच्या आकांताने करार पत्रकावर सही करायला तयार होत नाही. मग बिल्डर लोक त्याला विविध आमिषे दाखवून आणि शेजारीपाजारी त्याला समजावून सांगून प्रवाहात आणतात आणि एकदाची ती बिल्डिंग तोडली जाते. पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये गतवर्षी दिवाळीला घडलेला किस्सा नेहमी सांगितला जातो. इतक्या प्रचंड प्रमाणावर जुन्या इमारती तोडून नवीन इमारती होत आहेत त्यामुळे रीडेव्हलपमेंट हा तिथे कळीचा शब्द झाला आहे. दरवर्षी दिवाळीला किल्ला करणार्या मुलांना असे विचारले की, का रे यावर्षी किल्ला केला नाही का? तर त्या मुलांनी त्याचे उत्तर दिले की, किल्ला यावर्षी रीडेव्हलपमेंटला गेला आहे.