

डॉ. सदानंद मोरे, संत साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक
विठ्ठलाच्या भक्तीने प्रेरित वारी ही केवळ पंढरपूरची यात्रा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाला जोडणारी अखंड परंपरा आहे. संतविचार, समता, लोकशिक्षण आणि सामूहिक साधनेचा संदेश देणारी ही वारी महाराष्ट्राच्या संस्कारांचा जिवंत आत्मा आहे.
श्रीविठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन लाखो पावले पंढरीकडे निघतात ती म्हणजे वारी. हा केवळ धार्मिक किंवा भक्ती सोहळा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे. शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा महाराष्ट्राला एकसंध ठेवणारी, संतविचारांचा प्रसार करणारी आणि समाजाला नैतिकतेची दिशा देणारी आहे. वारी एक जीवनपद्धती आहे, सामूहिक साधना आहे, लोकशिक्षणाची प्रभावी यंत्रणा आहे आणि संतांनी घडविलेल्या महाराष्ट्राच्या संस्कारांचा अविभाज्य भाग आहे.
वारी म्हटले की, डोळ्यांसमोर टाळ-मृदंगांच्या गजरात, मुखी विठ्ठलनाम आणि हृदयात भक्तिभाव घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे चित्र उभे राहते. ‘वारकरी’ या शब्दाचा अर्थ वारी करणारा असा आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या अत्यंत नियमितपणे ही परंपरा अखंड सुरू आहे. वारकरी पंढरपूरला जातो तो केवळ देवदर्शनासाठी नव्हे, तर आत्मिक समाधानासाठी, संतविचारांच्या अनुभवासाठी आणि भक्तीच्या सामूहिक उत्सवात सहभागी होण्यासाठी. या परंपरेचा केंद्रबिंदू आहे विठ्ठल. विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते. पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठलरूपात जणू श्रीकृष्ण पंढरपूरला आले, अशी परंपरा सांगते. त्यावेळी पुंडलिक हे आई-वडिलांच्या सेवेत मग्न होते. देव स्वतः समोर उभा असतानाही त्यांनी प्रथम माता-पित्यांची सेवा पूर्ण केली आणि विठ्ठलाला उभे राहण्यासाठी वीट दिली. ही घटना केवळ भक्तीची नव्हे, तर कर्तव्यनिष्ठेची सर्वोच्च शिकवण आहे. पुंडलिकांमुळेच वारकरी संप्रदायाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे त्यांना वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांनी स्वतःच्या मोक्षाची याचना केली नाही. भक्तांचा उद्धार कर, अशी विनंती विठ्ठलाकडे केली. यातून वारकरी परंपरेचा मूलभूत विचार स्पष्ट होतो, तो म्हणजे स्वतःपुरता नव्हे, तर सर्वांच्या कल्याणाचा विचार!
वारीची सुरुवात नेमकी कधी झाली, याचा ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही; मात्र ही परंपरा प्राचीन असल्याचे संत साहित्यातील उल्लेखांवरून स्पष्ट होते. वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा वैयक्तिक परमार्थ नसून, सामूहिक परमार्थ आहे. योगमार्ग, ज्ञानमार्ग किंवा इतर अनेक आध्यात्मिक मार्ग वैयक्तिक स्वरूपाचे असतात; मात्र वारी ही समूहाने केली जाते. भजन सामूहिक असते, कीर्तन सामूहिक असते, दिंडी सामूहिक असते. त्यामुळे वारी ही लोकांना जोडणारी, एकत्र आणणारी आध्यात्मिक प्रक्रिया आहे. दिंडी हा वारीचा आत्मा आहे. गावोगावचे वारकरी एकत्र येतात. टाळ-मृदंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा गजर करत पायी पंढरपूरकडे वाटचाल करतात. या प्रवासात नामस्मरण, अभंग गायन, भारूड, भजन, कीर्तन, फुगड्या, खेळ अशा विविध माध्यमांतून भक्तीचा उत्सव साजरा होतो. त्यामुळे वारी ही केवळ परमार्थ नसून, भक्तीचा आनंदोत्सव ठरते. ईश्वराने दिलेल्या मानवी जन्माचे सार्थक करण्याचा हा आनंदसोहळा आहे.
विशेष म्हणजे, वारकरी पंढरपूरला जाऊन काही मागत नाही. नवस करत नाही. विठ्ठलाचे दर्शन हेच त्याचे समाधान असते. त्याला फक्त देवाची कृपा हवी असते. देव आणि भक्त यांच्यातील हा अत्यंत निरपेक्ष संवाद म्हणजे वारी. वारकरी संप्रदायात संगीताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भजन म्हणजे संगीत. अभंग म्हणजे संगीत. भारूड म्हणजे संगीत. वारीत गाणे, नाचणे आणि खेळणे यांना तितकेच महत्त्व आहे. हा केवळ प्रवचनांचा संप्रदाय नाही, तर लोककलांमधून अध्यात्म जगणारा संप्रदाय आहे. या परंपरेला संघटित स्वरूप देण्याचे मोठे कार्य संत नामदेवांनी केले. विविध दिंड्यांचे एकत्रीकरण करून त्यांनी ‘फड’ ही संकल्पना निर्माण केली. एका फडात अनेक दिंड्या सहभागी होत. पंढरपूरमध्ये या फडांमुळे वारकरी संघटित झाले. वर्षभर चालणाऱ्या भजन-कीर्तनाच्या परंपरेला त्यांनी शिस्तबद्ध रूप दिले. कीर्तन पद्धतीलाही त्यांनी आकार दिला.
वारकरी संप्रदायाला तात्त्विक अधिष्ठान मिळाले ते संत ज्ञानेश्वरांमुळे. प्रत्येक धर्माला एक प्रमाणग्रंथ आवश्यक असतो. वारकरी संप्रदायासाठी तो ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’. ज्ञानेश्वरांनंतर सर्व संतांनी अभंग रचना केल्या. त्या दिंड्यांमध्ये गायल्या जाऊ लागल्या. त्यामुळे वारकरी परंपरेला समृद्ध साहित्य मिळाले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर उत्तर भारतातून परकीय आक्रमणे झाली. अशा काळात महाराष्ट्रात धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवण्याचे मोठे कार्य वारकरी संप्रदायाने केले. नंतर मराठ्यांचे राज्य आले. त्यानंतर इंग्रजांचे राज्य आले. या साऱ्या राजकीय उलथापालथीत वारी कधीच थांबली नाही. उलट समाजाला एकत्र ठेवण्याचे कार्य ती सातत्याने करत राहिली. विशेष म्हणजे, वारकरी संप्रदायात धर्मांतराचे एकही उदाहरण दिसत नाही. यामागे संत साहित्याची आणि विठ्ठल भक्तीची ताकद होती. मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास करून त्यांची संशोधित गाथा प्रकाशित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत भानुदास, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी मराठीत अध्यात्म मांडले. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्राची मानसिकता घडवली. आजही संतांचे अभंग लाखो लोकांच्या मुखी आहेत. संत साहित्य हेच महाराष्ट्राच्या संस्कारांचे मुख्य स्रोत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. संतांनी निर्माण केलेल्या नैतिकतेच्या आणि सामाजिक ऐक्याच्या पायावरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे राहिले. वारकरी संप्रदायाने समाजात आत्मविश्वास, संघटन आणि स्वाभिमानाची भावना जागृत केली. महाराष्ट्राला एका भाषेत, एका सांस्कृतिक धाग्यात बांधण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले. पंढरपूर ही सर्व महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी बनली. गावागावांतील लोक वर्षातून दोनदा येथे एकत्र येऊ लागले. त्यामुळे भाषिक आणि सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ झाली.
वारकरी परंपरेत पालखीचे आगमन नंतर झाले. सुरुवातीला केवळ दिंड्या असत. वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तिची स्वअनुशासनाची परंपरा. लाखो लोक सहभागी होऊनही वारीला कधी गालबोट लागले नाही. कारण, वारकरी स्वतःला संतांचे पाईक मानतो. संतांच्या विचाराला धक्का पोहोचेल, असे कोणतेही वर्तन तो करत नाही. ही आचारसंहिता कुणी लादलेली नाही. ती संस्कारातून आलेली आहे. वारीची खरी ओळख तिच्या अध्यात्मिक स्वरूपात आहे. ती भौतिक उपयुक्ततेच्या कसोटीवर मोजण्याची गोष्ट नाही. ती अनुभवण्याची गोष्ट आहे.
वारकरी संप्रदाय हा गाजावाजा करणारा धर्म नाही. तो भागवत धर्माचीच एक उत्क्रांत परंपरा आहे. विठ्ठल आणि वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राला एकत्र ठेवणारा सांस्कृतिक धागा म्हणजे वारी. महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे वारी. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी. कारण, ती केवळ पंढरपूरची वाट नसून माणसाला स्वतःकडे आणि समाजाकडे नेणारा अध्यात्माचा, समतेचा, संस्कारांचा आणि लोकजीवनाला जोडणारा अखंड प्रवास आहे.