

केवळ पगार वेळेत मिळाला नाही म्हणून आपल्या सहकार्यांना जिवंत पेटवून देणार्या हिंजवडीतील घटनेनंतर पुणेकर हादरले. ‘नेमेची येतो मग पावसाळा..’ या उक्तीप्रमाणे अशा घटना घडतच असतात, या भावनेने ढिम्म सरकारी यंत्रणेने कागदपत्रे रंगविण्यास सुरुवात केलेली आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरटीओने कारवाईचे सोपस्कार सुरू केले; मात्र अशी घटना पुन्हा होणार नाही, याची शाश्वती काय, या विचाराने पुण्यातील आंतराष्ट्रीय ख्यातीच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील अभियंते अद्यापी दहशतीमध्ये आहेत.
कॅबचालकाकडून घडलेला हा प्रकार टोकाचा होता. अन्यथा हिंजवडीतील आयटीयन्सना अशा घटना नव्या नाहीत. प्रवाशांशी वाद घालणे, दमदाटी करणे, युवतींच्या छेडछाडीपासून बलात्काराच्या घटना या ठिकाणी घडत आहेत, घडलेल्या आहेत. हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे आयटीयन्स-वाहनचालकांमध्ये उडणारे खटके पावलागणिक पाहायला मिळतात. या समस्येला कंटाळून सुमारे 35 हून अधिक कंपन्यांनी तेथून काढता पाय घेतला आहे. वाहतूक कोंडी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड तणावाच्या परिस्थितीवर नुकत्याच घडलेल्या जळीतकांडाने आयटीयन्सच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हिंजवडी मेट्रोचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. बस अथवा इतर नागरी वाहतूक सुविधा सक्षम नसल्याने आयटीयन्सची सर्व मदार कॅब अर्थात खासगी वाहतूक सेवेवर आहे. आयटी हबमध्ये सुमारे 150 नामांकित आयटी कंपन्यांसह अनेक छोट्या कंपन्या आहेत. दोन लाखांहून अधिक अभियंते आणि कर्मचारी येथे कार्यरत आहेत. त्यातील 60 ते 70 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कॅबवर अवलंबून आहेत. कोरोना महामारीनंतर काही कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’, तर काही कंपन्या आठवड्यातून तीन दिवस सुरू आहेत. यापूर्वी बहुतांश आयटी कंपन्या स्वत:च्या मालकीच्या वाहनांमधून या कर्मचार्यांना सेवा देत होत्या; मात्र वाहनांचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च, चालकांची अनिश्चितता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेच्या जबाबदारीमुळे बहुतांश कंपन्यांनी या जबाबदारीतून अंग काढून घेतले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेतील वाहन हे कंपनीच्या मालकीचे होते. आपल्या चालकाची इतक्या टोकाची मानसिकता निर्माण होईपर्यंत कंपनीच्या लक्षात येऊ नये? कोणत्याही कारणाने वाहनाला आग लागल्यानंतर लॉक सिस्टीम काम करू नये? त्याबाबतची माहिती-प्रशिक्षण कर्मचार्यांना असू नये? आयटी पार्कमध्ये सेवा देणार्या वाहनांची अवस्था खरंच चांगली आहे? वाहने तपासण्याची संबंधित कंपन्यांची आणि सरकारी यंत्रणा काय आहे, ती यंत्रणा प्रामाणिपणे काम करीत आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने नकारात्मक मिळत आहेत.
यंत्रणा कामाला लागल्याच्या मथळ्यांनी बातम्या प्रसिद्ध झाल्या खर्या; मात्र कुणाचा मुलगा, कुणाचा पती, कुणाचा बाप जिवंत जळूनही सरकारी यंत्रणेच्या भावनांना पाझर फुटलेला नाही. केवळ कारवाईचा फार्स आणि आकड्यांची भलावण करण्यापलीकडे सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतेही ठोस धोरण आखले गेलेले नाही. ज्या आयटी पार्कने पुण्याची ख्याती जगभरात पोहोचवली तेथील काही कंपन्या वाहतूक कोंडीचा धसका घेऊन पॅकअप करतात, त्याच आयटीतील कर्मचार्यांना जिवंत जाळले जाते, तरीही विधानसभेच्या महाराष्ट्राच्या अधिवेशनात पुण्यातील एका आमदाराशिवाय एकालाही हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही. सर्व अधिकार्यांची मिळून एकही बैठक होऊन ठोस तोडगा काढून आयटीयन्सला दिलासा देण्याचा साधा प्रयत्नही होत नाही, यासारखे दुर्दैव दुसरे नाही. हिंजवडीतील या जळीतकांडानंतर भविष्यात प्रश्न उपस्थित झालाच, तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कागदावर नोंदविल्या गेलेल्या कारवाईच्या जोरदार मोहिमेचे जोरकस अवलोकन सत्ताधार्यांकडून केले जाईल; मात्र तोपर्यंत हिंजवडीत किती आयटी कंपन्या शिल्लक राहिलेल्या असतील, हे सांगता येणार नाही. त्यामुळे वेळेतच जागे होण्याची गरज आहे. अलीकडच्या काळातील बिघडते वातावरण पाहता सर्वांनी सतर्क राहून अशा प्रकारच्या घटनांवर पायबंद घालण्याची गरज आहे.