लवंगी मिरची : आवाज आणि पेमेंट!

लवंगी मिरची : आवाज आणि पेमेंट!

'मित्रा, दोन मिनीट थांब. डिस्टर्ब करू नकोस, मोबाईलवरून पेमेंट करतोय आवाजात. काही घोळ व्हायला नको. हॅलो, यूपीआय, किराणा दुकानातून दुधाच्या दोन पिशव्या आणल्या आहेत, त्याला 140 रुपये पेमेंट करून टाक. हां, बोल आता, काय म्हणणे आहे तुझे?'
'अरे, काय हे? बोलून पेमेंट केलेस तू? ही काय नवीन भानगड आली आहे? म्हणजे ते स्कॅन करून आपण सर्रास भाजीपाला, किराणा, कपडे आणि काहीपण खरेदी करत आहोत. पण हे बोलून पेमेंट करण्याचे काय नवीन तंत्र आहे?'

'हे बघ मित्रा, आपल्या देशात डिजिटल पेमेंट संदर्भात क्रांती होत आहे. कधीकाळी प्रत्येक ठिकाणी नोटा किंवा पैसे मोजले जायचे. आता सगळे पेमेंट जवळपास ऑनलाईन होत आहे. त्या नोटा हाताळणे नको, त्या खराब होणे नको आणि त्या फाटणे नको. खरं म्हणजे आज खिशात एक रुपयाही न घेता अगदी पूर्ण भारतभर आपण फिरू शकतो कारण आपली बँकच आपल्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याच्याद्वारे फटाफट पेमेंट करणे सहज शक्य झाले आहे. नुसते खरेदीचे पेमेंटच नाही, तर बँकांचे व्यवहारपण ऑनलाईन होत आहेत. अवघ्या काही सेकंदांत इकडचे लाखो रुपये तिकडे पाठवले जाऊ शकतात. आता या आवाजाच्या तंत्रज्ञानाने त्यात आणखी आपण पुढे मजल मारली आहे. म्हणजे पुढे चालून, म्हणजे नजीकच्या काळात तू एटीएमसमोर उभा राहून नुसता आदेश देऊनही पैसे काढू शकतील, अशी परिस्थिती येणार आहे.'

'अरे, काय सांगतोस काय? पण मग मी काय म्हणतो की, बर्‍याच लोकांना वेगवेगळे आवाज काढता येतात. आवाजाची कॉपी करण्यात पारंगत असलेल्या लोकांची आपल्याकडे कमी नाही. अगदी अमिताभ बच्चनपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत कुणाच्याही आवाजाची ते हुबेहूब नक्कल करत असतात. अशा लोकांनी या मोठ्या लोकांच्या आवाजाची नक्कल करून त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढले तर काय होईल? किंवा माझ्याच आवाजाची नक्कल करून दुसर्‍या कोणी माझ्या अकाऊंटमधून पैसे गायब केले तर काय होईल?'
'हे बघ, तुला वाटतं तेवढं ते सोपं नाही. सायबर सिक्युरिटी नावाचा जो प्रकार आहे, त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली असते. तुझ्या आवाजाची नक्कल करणार्‍या आवाजाला समोरील यंत्र प्रतिसादच देणार नाही. तिथे फक्त तुझा आणि तुझाच आवाज लागणार आहे. जसा आपण बायोमेट्री म्हणजे बोटांचे ठसे घेऊन हजेरी नोंदवतो, तशाच पद्धतीने तुझ्या आवाजाने तुझेच पैसे निघणार आहेत, दुसर्‍याचे पैसे निघणार नाहीत. अजिबात काळजी करू नकोस.'

'पण काहीही म्हण मित्रा, मला भारतीय लोकांचे फार कौतुक वाटते. कुठल्याही बदलाला ते फार पटकन स्वीकारतात. पूर्वी आपण प्रत्येक गोष्टीसाठी नोटा मोजायचो, ते सर्व जवळपास बंद होऊन आपण डिजिटल पेमेंट करायला शिकलो आहोत. आधी लो म्हणजे कमी कॅश, मग नो कॅश आणि आता जवळपास सर्व व्यवहार कॅशलेस होत आहेत. अवघ्या पाच वर्षांमध्ये आपण घेतलेली ही झेप जगालासुद्धा थक्क करून गेली आहे. कॅशलेस व्यवहारामध्ये आज भारत सर्वाधिक वापर करणार्‍यांची संख्या असलेला देश झाला आहे. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे, आवाजावरून पेमेंट करता आले तर त्याला क्रांतीच म्हणावे लागेल. सध्या सर्रास ऑनलाईन पेमेंटचा वापर केला जातो. त्यामुळे दूरवर असेल्या नातेवाइकांना गरजेनुसार पेमेंट करणे फारच सोपे झाले आहे, हे नक्की!'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news