

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आता बंडाने उग्र स्वरूप धारण केले आहे. बलुचिस्तानच्या अनेक मोक्याच्या भागावर बलोच लिबरेशन आर्मीने आपला ताबा मिळविला आहे. बलुचिस्तानातील या बंडाळीने सिंध आणि खैबर पख्तुनख्वा या दोन्ही प्रांतांतही स्वतंत्र होण्याची ऊर्मी उसळून आली आहे. हे कमी आहे म्हणून की काय, गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्येही असंतोष भडकत चालला आहे. तसे झाले तर नजीकच्या काळात बलुचिस्तानपाठोपाठ या दोन्ही प्रांतांतही आणि गिलगिट, बाल्टिस्तानातही बंडाळीचा वणवा भडकण्याची शक्यता आहे आणि त्या पाठोपाठ पाकिस्तानच्या चिरफाळ्या उडण्याचीच चिन्हे आहेत.
भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानी लष्कराचे पुरते वस्त्रहरण झाले आणि अखेर पाकिस्तानला गुडघे टेकून शस्त्रसंधीसाठी विनवणी करावी लागली. आधीच महाप्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या पाकिस्तानची आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांची पुरेपूर कोंडी झालेली असतानाच ठिकठिकाणच्या प्रांतांत उद्रेक सुरू झाल्याने पाकिस्तानच्या भौगोलिक स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
1947 साली अखंड भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याचवेळी फाळणी झाली. पाकिस्तानला गेलेल्या सिंध प्रांताची भाषा आणि संस्कृती ही इतर प्रांतापेक्षाही पूर्ण वेगळी. तेव्हापासूनच सिंधमध्ये असंतोष खदखदत होता आणि आता सिंध प्रांताच्या एकूण अर्थव्यवस्थेवर आणि जीवनमानावरच घाला घालण्याचा डाव पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी रचल्याचे पुढे आले आहे. चोलिस्तान योजनेने सिंध प्रांताला दारिद्य्राच्या खाईत ढकलण्याचे राज्यकर्त्यांचे कारस्थान स्पष्ट झाल्याने आता सिंधी जनता पेटून उठली आहे आणि स्वतंत्र सिंधची मागणी बुलंद झाली आहे.
सिंध प्रांताची मुख्य भाषा सिंधी. भारतातून आलेल्या निर्वासित मुस्लिमांची सिंध प्रांतात मोठी वस्ती झाली. त्यांची भाषा उर्दू. 1967 साली सिंध प्रांतात उर्दूची भाषा लादण्यात आली. त्यावेळी स्वतंत्र सिंधू देश चळवळीची ठिणगी पडली. ज्यू वंशीयांनी आपले इस्रायल राष्ट्र स्थापन केले. त्याच धर्तीवर स्वतंत्र सिंधची मनीषा सिंधवासीयांत होती. जगभरात पसरलेल्या सिंधी भाषिकांत अजूनही ही भावना आहे. 1967 साली या भावनेचा स्फोट झाला. हिंदू आणि मुस्लिम सिंधी भाषिक स्वतंत्र सिंधसाठी एकत्र येऊ लागले.
1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले. बांगला देशचा जन्म झाला. त्या प्रेरणेतून जी. एम. सय्यद यांनी 1972 मध्ये जिये सिंध तहरिक ही स्वातंत्र्यवादी संघटना स्थापन केली. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्याची जाहीर मागणी करणारे सय्यद हे पहिले नेते. पाकिस्तान सरकारने त्यांना पकडले आणि त्यांना तीस वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 1995 मध्ये या सिंध स्वातंत्र्यसेनानीचे तुरुंगातच निधन झाले.
सिंध स्वातंत्र्यवादी आणि त्यांचे समर्थक अथवा सहानुभूतीवर त्यांना गेल्या 60 वर्षांत नृशंस छळ आणि अत्याचारांना तोंड द्यावे लागले आहे. सिंधमध्ये मानवाधिकार हक्कांना तिलांजली देण्यात आली आहे. चळवळीत असल्याच्या संशयावरून अनेकांचे अचानक अपहरण केले गेले आहे आणि नंतर त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
सिंध प्रांतात असंतोषाचा कडेलोट होत गेला. त्यातूनच 17 जानेवारी 2018 रोजी सान नावाच्या एका गावात बंदीहुकूम तोडून तिथे सिंधचे संस्थापक जी. एम. सय्यद यांची एकशेसतरावी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. एवढेच नव्हे तर स्वतंत्र सिंधचा नारा देत प्रचंड मिरवणूकही काढण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या प्रतिमांचे फलक या भव्य मिरवणुकीत अग्रभागी झळकत होते. या फलकावर ‘सिंध प्रांताला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा होत्या. एकप्रकारे सिंधवासीयांनी जागतिक नेत्यांकडेच आपले गार्हाणे या मिरवणुकीतून मांडले.
तिथे सिंधचे संस्थापक जी. एम. सय्यद यांच्या सव्वाशेव्या जयंती वर्षात आंदोलनाला आता स्फोटक वळण लागले. पंजाबमधील चोलिस्तान कालवे प्रकल्प सिंधच्या मुळावर आल्याने आता आंदोलनाचे स्वरूप हिंसक लढ्यात झाले आहे.
पाकिस्तानातील राजवटीत प्रथमपासूनच पंजाब प्रांतीयांचे वर्चस्व आहे. भुत्तोंचा अपवाद वगळता सर्व राज्यकर्ते पंजाबातील. लष्करात पंजाब्यांचे प्राबल्य. यातच आता भर पडली आहे ती सिंध प्रांताच्या हितावर निखारे ठेवण्याची योजना. ती म्हणजे चोलिस्तान कालवे प्रकल्प. सिंधू नदी ही पाकिस्तानची दायिनी. त्यातही खरे तर सिंध प्रांताची जीवनदायिनी. सिंधूच्या पाण्यावर सिंधची सारी शेती आणि व्यापार, उद्योग, रोजगार अवलंबून. आता त्यालाच नख लावण्याचा आणि सिंधला कंगाल करण्याचा डाव पाक राज्यकर्त्यांनी आखल्याने सिंधमध्ये वणवा पेटला आहे.
पंजाबमध्ये चोलिस्तान हा वाळवंटी भाग आहे. आपल्या राजस्थान राज्याच्या सीमेला लागून या प्रांतामध्ये सिंधू नदीमधून 176 कि.मी. लांबीचा कालवे प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या मुख्य कालव्यावर आणखी तीन कालवे असतील. त्यातून चोलिस्तानच्या सार्या भागाला पाणी मिळेल, अशी ही 67 अब्ज रुपये खर्चाची योजना आहे.
ही योजना साकारली तर सिंध प्रांताचे पाणी तुटले जाईल आणि शेतीची नापिकी होईल. सिंध प्रांतालाच नागविण्याचे हे कृष्ण कारस्थान असल्याने आता सिंध प्रांतात स्वातंत्र्याचे वादळी वारे सुरू झाले आहे.
चोलिस्तान कारस्थानाविरोधात सिंध प्रांतात हिंसक दंगली सुरू झाल्या आहेत. नौशहरिया फिरोजी जिल्ह्यात गृहमंत्री जियाऊर हसन लजन यांच्या घरावरच सिंधी जनतेने हल्ला केला. घर पेटवले. गोळीबार केला. त्यात दोन ठार झाले. आंदोलक आणि पोलिस यांच्यात जोरदार धुमश्चक्री उसळली. अनेक पोलिस जखमी झाले. सिंध प्रांतातील वणव्याची ही लाट आता प्रांतभर पसरत आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टी हा बिलावल भुत्तो यांचा पक्ष सिंधमध्ये सत्तेवर आहे व केंद्रामध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याबरोबर त्यांची युती आहे. तथापि चोलिस्तान विरोधातील आंदोलनाला त्यांच्या पक्षाचाही पाठिंबा आहे. त्यामुळे या लढ्यात भिन्न भिन्न विचाराचे लोक एकत्र आले असून सार्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि पंजाब्यांची मानसिकता लक्षात घेता राज्यकर्ते प्रकल्प मागे घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे या आंदोलनातून व्यापक स्वातंत्र्य लढा उभारला जाण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत.
खैबर पख्तुनख्वा म्हणजे पूर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत. प्रामुख्याने हा पठाणांचा आणि टोळ्यांचा प्रदेश आहे. फाळणीच्या वेळी हा प्रांत पाकिस्तानात सामील व्हायला तयार नव्हता. सरहद्द गांधी खान बादशहा खान यांची इच्छा भारतात सहभागी होण्याची होती. पण काँग्रेसच्या बोटचेप्या धोरणामुळे ते घडले नाही आणि हा प्रांत पाकिस्तानच्या दावणीला बांधला गेला. पण तेव्हापासून या प्रांतात स्वातंत्र्याची सुप्त इच्छा दडून राहिली होती. ती आता उघड झाली आहे.
तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ही इस्लामी दहशतवादी संघटना असून या संघटनेने पाकिस्तानी लष्कराला सळो की पळो केले आहे. या संघटनेला शरिया कानून लागू करायचा आहे व त्यासाठी ही संघटना लढा देत आहे. अफगाणिस्तानात तालिबान राजवट स्थिर झाल्यानंतर आता या संघटनेला ताकद आली आहे.
खैबर पोलिस दलाने तर लष्करालाच आव्हान दिले आहे आणि दोन्ही दलांत सतत धुमश्चक्री चालू आहे. लष्करप्रमुख आले तरी आम्ही भीक घालणार नाही, असे उद्गार पख्तुनी पोलिसांनी काढले आहेत. त्यातून पाकिस्तानातील यादवीची लागण दिसून येते.
गिलगिट आणि बाल्टिस्तान हे पाकव्याप्त काश्मीरच्या उत्तर भागातील विभाग. पाकिस्तानपेक्षा त्यांची संस्कृती आणि भाषा पूर्णपणे वेगळी आहे.
हा प्रदेश निसर्गरम्य आहे आणि पर्यटन विकासाला उपयुक्त आहे. तथापि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे आपल्यावर केवळ अन्यायच केला, अशी तीव्र भावना या प्रदेशात आता बळावत चालली आहे. इथल्या स्वातंत्र्यवाद्यांनी आपल्या विभागाचे नाव ‘बलवारीस्तान’ असे ठेवले आहे. त्याचा अर्थ ‘उत्तुंग प्रांत’. त्यावरून त्यांची स्वातंत्र्याची तीव्र भावना स्पष्ट होते.
बलुचिस्तानसह ठिकठिकाणी उठाव आणि उद्रेक होत असल्याने पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कर, त्याचप्रमाणे आयएसआय ही पाकिस्तानची कुप्रसिद्ध हेर यंत्रणा खिंडीत सापडली आहे. या बिकट परिस्थितीतून बाहेर पडायला मार्ग राहिलेला नाही आणि कोणी तारणकर्ताही नजरेत नाही. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात पुन्हा बांगला देशची पुनरावृत्ती झाली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.
पाकिस्तान वेगवेगळ्या कर्जाच्या महाविळख्यात किंबहुना महाचक्रव्यूहात अडकला आहे आणि त्यातून त्याची सुटका होणे कर्मकठीण आहे. पाकिस्तानवर एकूण कर्ज आहे 256 अब्ज डॉलर्स. म्हणजे सुमारे 21 लाख 60 हजार कोटी रुपये. त्यापैकी चीनने विविध प्रकल्पांसाठी दिलेले कर्ज आहे 28 कोटी 7 अब्ज डॉलर्स म्हणजे 2 लाख 42 हजार कोटी रुपये. सौदी अरेबियाचे 77 हजार कोटी रु. कर्ज आहे. एकूण कर्जात चीनचा वाटा 11 टक्के तर सौदी अरेबियाचा वाटा 7 टक्के आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक संस्था व देशांचा पाकिस्तान ऋणको आहे. पाकिस्तानात जन्माला येणार्या प्रत्येक मुलावर 86 हजार 500 रुपयांचा कर्जाचा बोजा येतो, हे भीषण वास्तव आहे. कर्जाच्या अवाढव्य बोजाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन पाकिस्तानात महागाईचा वणवा भडकला आहे. पाकिस्तानच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 67 टक्के एवढे कर्ज पाकिस्तानच्या डोक्यावर आहे. घेतलेल्या कर्जातील मोठा वाटा लष्करावर खर्च होतो. विकासाच्या नावाने ठणठण गोपाळ आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सरहद्दीवरील ऐतिहासिक खैबर खिंडीने जेवढ्या लढाया पाहिल्या असतील, तेवढ्या अन्य कोणा स्थळाने अनुभवल्या नसतील. खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी पेशावरपासून 11 कि.मी. अंतरावर ही बलाढ्य खिंड आहे. दीड हजार फूट उंचीच्या डोंगरातून अतिशय अरुंद मार्ग असलेल्या या खिंडीने भल्याभल्यांना वाकवले आहे. या भागात ऐतिहासिक काळापासून आफ्रिदी टोळ्यांचे वर्चस्व आहे आणि खिंडीमध्ये असलेल्या शेकडो गुहांतून परकीयांवर झडप घालायला या टोळ्या नेहमी सज्ज असतात. अलेक्झांडर द ग्रेटलाही या टोळ्यांपुढे शरणागती पत्करून अन्य मार्गाने भारताकडे यावे लागले. खैबर पख्तुनख्वा आणि पाकिस्तान केंद्र संघर्षात आता या खिंडीला पुन्हा सामरिक महत्त्व आले आहे.