Dussehra 2024 | नवे युग, नवे सीमोल्लंघन! हा दिवस ऐतिहासिक विजयाचे स्मरण करणारा

दसरा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक
Vijayadashami Dussehra
नवे युग, नवे सीमोल्लंघनPudhari File Photo
Published on
Updated on
प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

‘आश्विन शुद्ध दशमी’ हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. दसरा हा सण भारतीय परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक होय. ‘विविधतेत एकता’ हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य व वेगळेपण या सणाच्या निमित्ताने दिसून येते. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. त्यामुळे हा दिवस ऐतिहासिक विजयाचे स्मरण करणारा आणि भारतीय समाजाचे रक्षण करणारा तसेच शौर्य, पराक्रम आणि विद्वत्ता यांचा गौरव करणारा दिवस आहे. आज 21 व्या शतकात विजयादशमीच्या नव्या पर्वकाळात नवे सीमोल्लंघन करणे आवश्यक आहे.

बदलत्या काळात भारतीय सण, समारंभ आणि उत्सव यांचा नवा अर्थ शोेधला पाहिजे. समाजशास्त्रीय द़ृष्टीने विचार करता असे दिसते की, उत्सवांना एक पारंपरिक अर्थ असतो. लोक त्यामागील परंपरा व इतिहास विसरतात आणि केवळ प्रतीकात्मक द़ृष्टीने उत्सव साजरे केले जातात. या पार्श्वभूमीवर विजयादशमीच्या नव्या पर्वकाळात नवे सीमोल्लंघन करणे आवश्यक आहे. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. विजयादशमी किंवा दसरा हा सण भारतीय परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक होय. या दिवशी उत्तमोत्तम संकल्प करून ते सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला जातो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केला आणि या दिवशी ते पुनःश्च अयोध्येत परतले. यानिमित्ताने गुढ्या उभारल्या जातात आणि विजयी पताका फडकत ठेवून आनंदोत्सव साजरा केला जातो. या पराक्रमाचे प्रतीक म्हणून शस्त्रपूजन केले जाते आणि ज्ञानसामर्थ्याचे प्रतीक म्हणून ‘सारस्वत पुत्र’ ग्रंथाचेही पूजन करतात.

मध्ययुगीन वीर मराठे व राजपूत विजयादशमीच्या शुभ दिवशीच अन्याय करणार्‍या मुघलांविरुद्ध युद्ध मोहिमांना प्रारंभ करत असत. आपला इतिहास नव्याने सुवर्णाक्षराने लिहिण्याचा संकल्प प्राचीन व मध्ययुगीन काळात महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच दिवशी केला. त्यामुळे स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे रक्षण करण्याचा हा संकल्प दिवस होय, असे मानले जाते. या दिवशी सरस्वतीची पूजा करून सर्वोच्च धन असलेल्या ज्ञानाची उपासना केली जाते. पाटीवर ‘श्री गणेशाय नम:’ असे लिहून पाटीपूजा केली जाते. तसेच पूजनीय ग्रंथ समोर ठेवून त्यातील विचारांचेही महत्त्व जाणले जाते.

नवरात्रीच्या निमित्ताने देवीचे जागरण केले जाते. दुर्गा किवा भवानी ही महिषासुराचे मर्दन करते. अन्याय आणि आसुर प्रवृत्तीवर ती मात करते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारणीची प्रेरणा तुळजापूरच्या भवानीमातेने राजांच्या स्वप्नात येऊन दिली, असे ‘सभासद’ बखरीत नमूद केले आहे. देवीच्या घटाची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र सुरू होतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमीच्या सणाचा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात दसर्‍याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. त्यामुळे हा दिवस ऐतिहासिक विजयाचे स्मरण करणारा आणि भारतीय समाजाचे रक्षण करणारा तसेच शौर्य, पराक्रम आणि विद्वत्ता यांचा गौरव करणारा दिवस आहे. विजयादशमी हा सण भारतीय कृषी जीवनाशी नाते जोडणारा आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात हा एक कृषी संस्कृतीशी निगडीत लोकोत्सव होता. पिकांची निगा व काळजी घेतल्यानंतर धन-धान्य घरी येत असे. त्यावेळी होणारा आनंद व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भागात हा सण साजरा केला जात असे.

उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम भारतात चहू दिशांमध्ये दसरा वेगवेगळ्या पद्धतीने व तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो. ‘विविधतेत एकता’ हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य व वेगळेपण दसरा सणाच्या निमित्ताने दिसून येते. दसर्‍याच्या दिवशी आपल्या गावाच्या, शहराच्या सीमा ओलांडून शमी व आपट्याची पाने आणली जातात व ती एकमेकांना देऊन अभीष्टचिंतन केले जाते. ही पाने म्हणजे सोन्या-चांदीचे प्रतीक आहेत, असे समजून ती समाजामध्ये एकमेकांना वाटली जातात. दसरा भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात या दिवशी रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे. तसेच राजस्थान व मध्य प्रदेशातसुद्धा हा सण प्रभू रामचंद्रांच्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून साजरा केला जातो. बंगालमध्ये दुर्गापुजेला महत्त्व असून या पूजेच्या अंतिम चरणात दशहरा म्हणजे दसरा साजरा केला जातो. सर्व प्रांतामध्ये म्हैसूरचा दसरा सर्वात प्रसिद्ध आहे. येथे गजराजांचा उपयोग करून सीमोल्लंघनाची मिरवणूक काढली जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news