

राजेंद्र उट्टलवार
महापालिकांच्या सत्तास्थापनावरून विदर्भात राजकीय हालचालींना वेग आला असून, महापौरपदासाठी अंतर्गत संघर्ष, नाराजी आणि धक्कातंत्र सुरू आहे.
आठवडाभरात अनेक वर्षांचे प्रशासकराज संपुष्टात येऊन विदर्भातील चारही महापालिकांवर ‘नवा गडी नवे राज्य’ सुरू होईल. राज्यातील 29 पैकी 15 शहरांमध्ये महिला महापौर विराजमान होणार आहेत. यात विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर या ठिकाणी तीन महिला महापौर असणार आहेत. अमरावती येथे खुले आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 जानेवारीला नागपुरात येतील त्यावेळी त्यांच्यापुढे दोन प्रश्न असतील. त्यांचे निकटवर्ती जिवलग मित्र आमदार संदीप जोशी यांनी टर्म संपण्यापूर्वी घेतलेला राजकीय संन्यासाचा निर्णय, दोन दिवस कार्यकर्ते, पदाधिकार्यांचे शक्तिप्रदर्शन... यावरून तो निर्णय कायम ठेवायचा की रद्दबातल करायचा आणि दुसरे म्हणजे नागपूरच्या महापौरपदी कोण? मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय पक्ष संघटनेत कार्यरत शिवानी दानी यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे. नीता ठाकरे, अश्विनी जिचकार, दिव्या धुरडे, मंगला खेकरे अशी इतरही नावे आहेत. शिवानी दानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की, 105 नगरसेवकांना नारळ देणारा भाजप धक्कातंत्र अवलंबणार हे लवकरच स्पष्ट होईल. मनपा निवडणुकीत निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्याने संदीप जोशी नाराज झाल्याचे बोलले जाते. महापौर, आमदार अशी महत्त्वाची पदे मिळूनही ते नाराज आहेत तर साधे नगरसेवकपदाचे तिकीट न मिळालेल्या निष्ठावंतांचे काय? स्वतः नितीन गडकरी यांनी याबाबतीत अनेकदा चिमटे काढले आहेत. नागपुरात 15 वर्षांची सत्ता कायम ठेवणार्या भाजपला 120 सदस्यसंख्या गाठता आली नाही तरी सत्तेचा दिलासा मिळाला.
चंद्रपूर, अकोला येथे काँग्रेसचा महापौर बसू शकतो. एमआयएम, मुस्लिम लीगची अनपेक्षित मुसंडी सत्तेचे गणित काही अंशी बिघडविणारी ठरली. अमरावतीत महायुतीला सत्ता समोर दिसत असताना राणा-खोडके दाम्पत्याची जिल्ह्यातील वर्चस्वाची लढाई अडचणीची ठरत आहे. चंद्रपूरचा वाद नेते, त्यांचे नगरसेवक हॉटेलात मुक्कामी असल्याने नागपुरात पोहोचला आहे. शिवसेना उबाठाचे सहा नगरसेवक भाजप की काँग्रेसकडे यावर सध्या खल सुरू आहे. गटनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादात थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव सहप्रभारी कुणाल चौधरी यांना मध्यस्थी करावी लागली. लवकरच तोडगा निघून काँग्रेसचा महापौर बसेल, असा दावा केला जात आहे.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ शैलीत भाजपचा महापौर होईल आणि काँग्रेसचे नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला. काँग्रेसचा महापौर बसल्यास भाजपला नगरपालिकेपाठोपाठ मोठा धक्का बसेल. मंत्रिपद न दिल्याने मुनगंटीवार यांची नाराजी पक्षाचे आणखी किती नुकसान करणार हे येणारा काळच सांगेल. अकोल्यामध्ये 41 सदस्यांच्या मॅजिक फिगरपासून भाजप तीन सदस्य दूर आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, अपक्ष नगरसेवकांची बैठक झाली. काँग्रेसचे 21 नगरसेवक आहेत. भाजपला दूर ठेवण्याचे लक्ष्य आमदार साजिद खान पठाण यांनी ठेवले असले तरी उबाठा शिवसेनेचे नॉट रिचेबल 6 सदस्य, माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे पुतणे भाजप बंडखोर आशिष पवित्रकार यांची तळ्यात-मळ्यात भूमिका हा तिढा अधिक वाढवत आहे.
ध्वनी प्रदूषणाबाबत जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील सर्व जिल्हाधिकारी, मनपा, न.प. आयुक्त, पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांसह अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात सविस्तर उत्तर मागवले आहे. दुसरीकडे खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातून होत असलेल्या प्रदूषणावरील जनहित याचिकेची नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली. न्यायालयाने ऊर्जा सचिवांसह इतर प्रतिवाद्यांना दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे. एकंदरीत एकीकडे मोठी गुंतवणूक, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकासाचे, विदर्भ समृद्धीच्या वाटेवर असल्याचे गोडवे गायले जात असताना विदर्भाची बदलती हवा चिंता वाढविणारी म्हणता येईल.