Actor Pradeep Rawat | प्रदीप रावत

Actor Pradeep Rawat |
Actor Pradeep Rawat | प्रदीप रावत
Published on
Updated on

तानाजी खोत

भारतीय चित्रपटसृष्टीत दमदार आवाज, भेदक नजर आणि रांगड्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे ४ ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी ब्लड कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी त्यांची झुंज संपली. त्यांच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीने केवळ एक उत्कृष्ट खलनायकच नव्हे, तर एक अत्यंत ताकदवान आणि अष्टपैलू चरित्र अभिनेता गमावला आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात २१ जानेवारी १९५२ रोजी जन्मलेल्या प्रदीप रावत यांनी सुरुवातीला सैन्यात जाण्याचे स्वप्न पाहिले होते; मात्र तो प्रयत्न अपुरा पडल्यानंतर आणि काही काळ बँकेत नोकरी केल्यानंतर त्यांनी आपल्यातील अभिनय गुणांना वाव देण्याचे ठरवून सिनेसृष्टीची वाट धरली. त्यांची अभिनय कारकीर्द तब्बल चार दशकांहून अधिक काळ विस्तारलेली होती. बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या अजरामर पौराणिक मालिकेत त्यांनी साकारलेला ‘अश्वत्थामा’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे; मात्र ते केवळ खलनायकी किंवा नकारात्मक भूमिकांमध्ये अडकून पडले नाहीत. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ या ऑस्कर नामांकित चित्रपटात त्यांनी ‘देवा सिंग सोधी’ या शूर आणि तापट शीख सैनिकाची भूमिका ताकदीने साकारली होती. ‘सरफरोश’ चित्रपटातील ‘सुलतान’ ही त्यांची भूमिका त्यांच्यातील अभिनयाची खोली आणि गांभीर्य दाखवून देणारी होती.

प्रदीप रावत यांचे नाव घेताच आजच्या पिढीच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो ‘गजनी’. ए. आर. मुरुगादास दिग्दर्शित या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी साकारलेला ‘गजनी धर्मात्मा’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय खलनायकांपैकी एक मानला जातो. हिंदी ‘गजनी’साठी दिग्दर्शकाला आमीर खानचे नाव सुचवण्यात त्यांचाच मोठा वाटा होता. यावरून त्यांचे आपल्या सहकलाकारांसोबतचे सलोख्याचे संबंध दिसून येतात. त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे संवादांपेक्षा त्यांची देहबोली आणि डोळ्यांतील भाव खूप काही सांगून जायचे. खलनायक साकारताना त्यांच्या केवळ पडद्यावर येण्यानेच एक प्रकारची दहशत निर्माण होत असे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत, विशेष करून तेलुगू चित्रपटांमध्ये (उदा. एस. एस. राजामौली यांच्या ‘साय’ चित्रपटातील ‘भिक्षू यादव’) त्यांनी आपला एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता. अलीकडेच त्यांनी ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या मराठी चित्रपटात ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारली होती.

पडद्यावर अत्यंत क्रूर, हिंसक आणि निर्दयी दिसणारे प्रदीप रावत खऱ्या आयुष्यात मात्र अगदी याच्या उलट स्वभावाचे होते. पत्नी कल्याणी आणि मुलगा विक्रमादित्य यांच्यासह कुटुंबात रमणारे प्रदीप रावत मनमिळाऊ, शांत आणि सहकाऱ्यांशी आदराने वागणारे साधे गृहस्थ होते. त्यांच्यातील साधेपणा त्यांच्या अवाढव्य शरीरयष्टी आणि गंभीर चेहऱ्याच्या आड दडलेला असायचा. सेटवर ते नेहमी हसतमुख असत आणि नव्या कलाकारांना मार्गदर्शन करत असत. १५० हून अधिक चित्रपटांतून हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि मराठी अशा अनेक भाषांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप रावत खऱ्या अर्थाने एक पॅन इंडिया स्टार होते. त्यांच्या निधनाने एका दमदार आणि रांगड्या पर्वाचा अंत झाला आहे. ‘गजनी’ आणि ‘अश्वत्थामा’ यांसारख्या सशक्त व्यक्तिरेखांमधून ते नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news