Dr.Veerabhadran Ramanathan: डॉ. वीरभद्रन रामनाथन

हवामान बदलाच्या संकटाची वैज्ञानिक पाळेमुळे शोधून जगाला सावध करणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉ. वीरभद्रन रामनाथन यांना 2026 चा अत्यंत प्रतिष्ठेचा क्रॅफोर्ड पुरस्कार जाहीर झाला
Dr.Veerabhadran Ramanathan
Dr.Veerabhadran Ramanathan: डॉ. वीरभद्रन रामनाथन Pudhari
Published on
Updated on
मुरलीधर कुलकर्णी

हवामान बदलाच्या भीषण संकटाने संपूर्ण जगाला कचाट्यात पकडले असताना या संकटाची वैज्ञानिक पाळेमुळे शोधून जगाला सावध करणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉ. वीरभद्रन रामनाथन यांना 2026 चा अत्यंत प्रतिष्ठेचा क्रॅफोर्ड पुरस्कार जाहीर झाला आहे. ‌‘रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस‌’ने भूविज्ञानातील योगदानासाठी या पुरस्काराची घोषणा केली असून, वैज्ञानिक वर्तुळात या सन्मानाला भूविज्ञानातील ‌‘नोबेल‌’ मानले जाते.

रामनाथन यांनी पाच दशकांत हवामान बदलावर केलेल्या मूलगामी संशोधनामुळे केवळ विज्ञानाला नवी दिशा मिळाली नाही, तर जगाच्या धोरणांमध्येही आमूलाग््रा बदल झाले आहेत. त्यांना आजवर ब्लू प्लॅनेट प्राईज, टायलर प्राईज आणि फ्रान्सचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान ग््राँड मेडल अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

दि. 24 नोव्हेंबर 1944 रोजी मदुराईमध्ये वीरभद्रन यांचा जन्म झाला. त्यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील सनी अल्बानी विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. त्यांनी शिकागो विद्यापीठ आणि त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगो येथे ‌‘स्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग््रााफी‌’मध्ये हवामान आणि वातावरणीय विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ योगदान दिले. त्यांच्या संशोधनाची सुरुवात 1970 च्या दशकात झाली, जेव्हा जगाला केवळ कार्बन डायऑक्साईड हाच ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत आहे असे वाटत होते; मात्र 1975 मध्ये रामनाथन यांनी जगासमोर धक्कादायक सत्य मांडले. त्यांनी सिद्ध केले की, क्लोरोफ्लुरोकार्बन्स हे केवळ ओझोन थराचे नुकसान करत नाहीत, तर ते कार्बन डायऑक्साईडपेक्षा 10,000 पटीने अधिक उष्णता शोषून घेतात. त्यांच्या या शोधनिबंधामुळे जगाचे लक्ष ‌‘ग््राीन हाऊस गॅसेस‌’च्या व्यापक रूपाकडे गेले आणि पुढे जाऊन ‌‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल‌’सारखे आंतरराष्ट्रीय करार अस्तित्वात आले.

रामनाथन यांचे कार्य केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी ‌‘ॲटमॉस्फेरिक बाऊन क्लाऊडस्‌‍‌’ म्हणजेच वातावरणातील तपकिरी ढगांचा शोध लावला. दक्षिण आशिया आणि जगाच्या इतर भागांत प्रदूषकांमुळे निर्माण होणारे हे ढग सूर्याचा प्रकाश अडवून जमिनीवर थंडावा निर्माण करतात; पण त्याच वेळी वातावरणात उष्णता कोंडून ठेवतात. यामुळे हिमालयातील हिमनद्या वितळत असल्याचे आणि मान्सूनचे चक्र विस्कळीत होत असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले. कॉर्नेल विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे. त्यांचे ‌‘प्रोजेक्ट सूर्य‌’ हे अभियान आजही ग््राामीण भागातील महिलांना सौर ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहित करत आहे.

व्हॅटिकन सिटीच्या ‌‘पॉन्टिफिकल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस‌’चे सदस्य म्हणून पोप फ्रान्सिस यांचे हवामान बदलावरील जगप्रसिद्ध परिपत्रक तयार करण्यात रामनाथन यांची भूमिका मोलाची होती. वयाच्या सत्तरीनंतरही त्यांचा उत्साह थक्क करणारा आहे. त्यांचे सिद्धांत आज हवामान बदलाच्या लढाईतील मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांना मिळालेला क्रॅफोर्ड पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, पृथ्वीला वाचवण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका ऋषितुल्य वैज्ञानिकाच्या कार्याला मानवजातीने दिलेली ही मोठी पावती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news