

सध्या आयपीएल सामन्यांची धूम सुरू आहे. हे सामने कुणा देशाविरुद्ध खेळले जात नसून विविध देशांतील खेळाडूंना खरेदी करून संघ तयार केला जातो. हे सर्व संघ परस्परांशी झुंज देतात आणि आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करतात. वैभव सूर्यवंशी नावाचा अवघा 13 वर्षांचा मुलगा या आयपीएलमध्ये दाखल झाला आणि एकाच सामन्यात कमीत कमी चेंडूंमध्ये शतक करण्याचा विक्रम करून संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला.
आयपीएलचा हंगाम सुरू होऊन अनेक वर्षे झाली आहेत. प्रत्येक स्पर्धेतून नवीन कोणीतरी तारा समोर येत असतो. पण वैभवने अगदी कमी वयात मोठा पराक्रम गाजवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्वजण आता त्याचा जयजयकार करत आहे. खरे तर वैभव हा बिहारचा रहिवासी आहे. पण सोशल मीडियावर बर्याच लोकांनी तो मराठीच आहे, असे पसरवण्यास सुरुवात केली. पुढे असे कळले की, सूर्यवंशी हे आडनाव बिहारमध्येही खूप लोकांचे आहे. बर्याच मराठी माणसांचा त्यामुळे भ्रमनिरासही झाला.
वैभव ज्या सामन्यामध्ये गाजला, त्या सामन्यात त्याला टाकल्या गेलेल्या पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला. 11 षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने त्याने अवघ्या 35 चेंडूंत शतक पूर्ण केले. वैभवचे नाव गाजवायला सुरुवात होताच त्याच्या वयावरून वाद निर्माण करण्यात आला. त्याच्या वयावरून अनेक तर्क लावले गेले. आयपीएल खेळणारा हा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. राजस्थान रॉयल्स या संघाने वैभवला सुमारे एक कोटी रुपयांच्या करारात बांधून घेतले तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. राजस्थान रॉयल्सचा कोच म्हणजेच प्रशिक्षक महान भारतीय क्रिकेट खेळाडू राहुल द्रविड आहे. राहुलने वैभवमध्ये असलेले टॅलेंट ओळखले आणि त्याला आपल्या संघात घेतले.
आयपीएलमध्ये देशोदेशीचे नामवंत खेळाडू खेळत असतात आणि अशा एकापेक्षा एक गोलंदाजांचा सामना करत वैभवने भिरकावलेले षटकार क्रिकेट क्षितिजाच्या बाहेर गेले नसते तरच नवल होते. वैभवच्या आई-वडिलांनी त्याचे टॅलेंट ओळखून सर्वस्व पणाला लावले आणि एक अद्वितीय असा फलंदाज देशाला दिला याबद्दल देश त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे. ग्रामीण भागातून येऊन असंख्य भारतीय मुले देश पातळीवर चमकत आहेत याचा अभिमानच वाटतो.
आज देशात ग्रामीण भागामधील पालकसुद्धा वेळप्रसंगी शेती विकून आपल्या मुला-मुलींना खेळाचे प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यश प्रत्येकाला मिळेल याची काही खात्री नसते. प्रयत्न करावे लागतात. कठोर मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे यशाला गवसणी घालता येते. सर्वच क्रीडा क्षेत्रांना आज देशात चांगले वातावरण आहे. चांगला खेळ करणार्या खेळाडूंना सरकारही नोकरीमध्ये सामावून घेत असते. आज देशामध्ये विराट कोहलीसारखा जगातील टॉपचा खेळाडू असताना नवनवीन टॅलेंट पुन्हा येतच असते.