Panaji Municipal Corporation Election | पर्रीकर पुत्र चमत्कार करतील?

Panaji Municipal Corporation Election
Panaji Municipal Corporation Election | पर्रीकर पुत्र चमत्कार करतील?
Published on
Updated on

मयुरेश वाटवे

दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी पणजी महापालिका निवडणुकीत भाजप-बाबूश मोन्सेरात पुरस्कृत पॅनेलविरोधात उमेदवार उभे केले आहेत. उत्पल बाप से बेटा सवाई ठरतील का, या प्रश्नाचे उत्तर ही निवडणूक देणार आहे.

काही मतदारसंघांना राष्ट्रीय राजकारणात खूप महत्त्व असते. पणजी हा त्यापैकीच एक. त्याचे कारण म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत. पणजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पर्रीकर यांच्याकडे असले, तरी पणजी महानगरपालिकेवर आमदार बाबूश मोन्सेरात यांची बराच काळ एकहाती सत्ता होती. पणजी महानगरपालिकेतील सत्ता आणि स्थानिक राजकारणावर त्यांचे मजबूत नियंत्रण आहे. आपला ताळगाव मतदारसंघ वगळता लगतचा सांताक्रूज आणि पर्रीकरांच्या निधनानंतर पणजी अशा तीन मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव नेते आहेत. यावरून त्यांच्या राजकीय बळाची कल्पना यावी.

पर्रीकर आणि बाबूश यांचे संबंध हे पूर्णतः सुसंवादाचे नव्हते; पण राजकीय व्यवहार्यतेच्या द़ृष्टीने त्यांनी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत बाबूश यांचे खाते काढून घेतल्यानंतर सरकार कोसळल्याचा अनुभव त्यांच्या स्मरणात कायम राहिला. त्यानंतर त्यांनी थेट संघर्ष टाळण्याची भूमिका घेतली. प्रशासकीय कणखरपणा असूनही राजकीय गणितांची जाणीव ठेवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सध्या नगर नियोजन (टीसीपी) खात्यावरून गोव्यात रणकंदन सुरू आहे. हे खाते नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. हेच खाते तेव्हा मनोहर पर्रीकर सरकारमध्ये बाबूश मोन्सेरात यांच्याकडे होते.

मात्र, आज स्थिती वेगळी आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर गोवा भाजपमध्ये निर्माण झालेली पोकळी, बदललेली नेतृत्वशैली आणि स्थानिक राजकारणातील नव्या आकांक्षा या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजी महानगरपालिकेत थेट बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनेलविरोधात स्वत:चे पॅनेल उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. जुने भाजप कार्यकर्ते आणि पर्रीकर यांचे निष्ठावान समर्थक उत्पल यांच्या मागे उभे राहिल्याने या संघर्षाला भावनिक रंगही आहे. पर्रीकरांच्या स्मृती, त्यांची प्रतिमा आणि त्यांच्या नावाशी जोडलेली स्वच्छ राजकारणाची अपेक्षा यांचा लाभ उत्पल यांना मिळू शकतो; पण केवळ आडनाव पुरेसे ठरणार नाही. मनोहर पर्रीकर यांनी आपली ओळख संघर्षातून, अभ्यासू वृत्तीने आणि प्रशासकीय कर्तबगारीने निर्माण केली होती. त्यांना संघटन उभारणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेशी थेट नाते जोडण्याचा मोठा अनुभव होता. उत्पल यांच्यासमोरचे आव्हान म्हणजे या वारशाचे रूपांतर प्रत्यक्ष राजकीय शक्तीत करणे. बाबूश मोन्सेरात यांची संघटनशक्ती, स्थानिक पातळीवरील संपर्क आणि निवडणूक व्यवस्थापनातील कौशल्य यांचा मुकाबला करणे सोपे नाही.

गोवा भाजपच्या अंतर्गत राजकारणातही या लढतीचे परिणाम दूरगामी ठरू शकतात. पर्रीकरांच्या काळातील कार्यकर्त्यांना वाटणारी उपेक्षा, बदललेली नेतृत्वशैली आणि स्थानिक पातळीवरील असंतोष यांना उत्पल यांच्या पॅनेलच्या रूपाने एक आवाज मिळाला आहे. उत्पल यांनी पर्रीकरांचा वारसा जपण्याबरोबरच आधुनिक शहरी प्रशासनाची द़ृष्टी दाखवावी लागेल. त्यांच्या अनेक मुलाखतींतून एका परिपक्व नेत्याचे दर्शन घडले आहे. बाबूश मोन्सेरात यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यांच्या पॅनेलला धक्का बसल्यास त्यांच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

वडिलांनी ज्या राजकीय शहाणपणाने समतोल साधला, त्यापेक्षा वेगळी वाट निवडणारा पुत्र अधिक यशस्वी ठरेल का? उत्पल पर्रीकर यांच्यासाठी हीच खरी कसोटी आहे. पणजी महानगरपालिकेवर ताबा मिळवणे म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर पर्रीकर नावाचा वारसा प्रस्थापित करणे. येणार्‍या काळात पणजीचे राजकारण कोणत्या दिशेने जाते, हे या संघर्षावर अवलंबून राहील. बाप से बेटा सवाई ठरेल की राजकीय वास्तव वेगळीच कथा लिहील, याचे उत्तर मतदारच देतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news