

उषा बाला चिलुकुरी व्हॅन्स, ज्यांना आज संपूर्ण अमेरिका ‘सेकंड लेडी’ म्हणून ओळखते, त्या एक बुद्धिमान, कार्यक्षम आणि प्रेरणादायी भारतीय-अमेरिकन महिला आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांच्या पत्नी असलेल्या उषा यांचा प्रवास हा परंपरा, शिक्षण, मेहनत आणि कर्तृत्व यांचा अनोखा संगम असून अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या पत्नीची भूमिका स्वीकारणार्या त्या पहिल्या आशियाई-अमेरिकन आणि हिंदू महिला ठरल्या आहेत.
उषा व्हॅन्स यांचा जन्म 6 जानेवारी 1986 रोजी सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे तेलुगू भाषिक भारतीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी असून त्यांनी नंतर सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीत अध्यापन केले. त्यांची आई आण्विक जीवशास्त्रज्ञ असून त्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत ‘प्रोव्होस्ट’ म्हणून कार्यरत होत्या. अशा उच्चशिक्षित कुटुंबातून आलेल्या उषा यांना शैक्षणिक गुणवत्ता आणि कठोर परिश्रमाची जाणीव लहानपणापासूनच झाली.
त्यांनी येल युनिव्हर्सिटीतून इतिहास विषयात पदवी घेतली आणि पुढे गेटस् स्कॉलर म्हणून केंब्रिज विद्यापीठात मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केले. येल लॉ स्कूलमधून त्यांनी ज्युरिस डॉक्टर पदवी संपादन केली. त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील तत्कालीन मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्टस्, न्यायाधीश ब्रेट कॅवनॉग आणि न्यायाधीश अमूल थापर यांच्यासोबत लॉ क्लर्क म्हणून कार्य केले. त्यानंतर त्यांनी ‘मंगर, टोल्स अँड ऑल्सन’ या प्रसिद्ध लॉ फर्ममध्ये सिव्हिल लिटिगेशन आणि अपील्स या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.
2014 मध्ये उषा आणि जे.डी. व्हॅन्स यांचा विवाह झाला. ही एक सांस्कृतिकद़ृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती, कारण हा एक अंतरधार्मिक विवाह होता. उषा या हिंदू धर्माचे पालन करतात आणि भारतीय परंपरेशी त्यांचा गाढा संबंध आहे. त्यांच्या आजी, चिलुकुरी संथम्मा या विशाखापट्टणम येथे राहतात आणि त्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. उषा व्हॅन्स यांची केवळ अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष यांच्या पत्नी इतकीच मर्यादित ओळख नसून त्यांनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांनी शिक्षण आणि सुरुवातीचा राजकीय द़ृष्टिकोन डेमोक्रॅटिक पक्षाशी निगडित ठेवला असला तरी आता त्या रिपब्लिकन पक्षाच्या विचारधारेशी सहमत आहेत. त्यांचे जीवन हे आधुनिक अमेरिकन समाजात भारतीय संस्कृतीचे जतन करणार्या आणि त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेणार्या स्त्रीचे एक उत्तम उदाहरण आहे.
उषा व्हॅन्स यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व हे भारतीय-अमेरिकन समुदायासाठी एक प्रेरणा आहे. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा सन्मान राखत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही प्रामाणिकपणे काम केल्यास यशस्वी होणे भारतीय वंशाच्या व्यक्तींसाठी अवघड नाही हे त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून लहान वयातच संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.