अवकाश किंवा गगनमंडल भेदणे हे सोपे काम नाही. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अनेक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना ‘मिसाईल मॅन’ असे म्हणतात. एखादे निर्धारित लक्ष्य देऊन मिसाईल कार्यान्वित केले की, थेट अवकाशाला भेदून ते निश्चित केलेल्या ठिकाणी पडून त्याचा स्फोट होत असतो.
सध्या महाराष्ट्राचे अवकाश अनेक हेलिकॉप्टर वार्यांनी भरून गेले आहे. नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणे आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. स्टार प्रचारक नेत्यांना एकाच दिवसात अनेक ठिकाणी जास्तीत जास्त सभा घेता याव्यात म्हणून हेलिकॉप्टर बुक झाले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, लवकरच अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या विशिष्ट तारखेनंतर ज्यांचे अर्ज राहतील, त्यांची नावे मतदान यंत्रांवर येऊन ते खर्या अर्थाने उमेदवार ठरणार आहेत.
निवडणुकांच्या तारखांची जवळपास निश्चिती झाली होती, तरीही शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत मोठ्या राजकीय पक्षांचे उमेदवार नेमके कोण, याविषयीचा निर्णय होत नव्हता. राजकीय पक्षांचे निर्णय होण्यास वेळ लागतो, कारण समोरची पार्टी कुणाला तिकीट देत आहे, हे पाहून आपले उमेदवार ठरवले जातात. शेवटच्या क्षणापर्यंत शक्तिप्रदर्शन, दावे आणि प्रतिदावे केले जातात. त्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी आणि त्याला उमेदवारी दिल्यास बंडखोरी करण्यास कोण तयार आहे, याचे अनुमान लावूनच तिकीट वाटप केले जाते. ज्याच्याकडे पक्षाचा एबी फॉर्म आहे, तो त्या पक्षाचा उमेदवार हे निश्चित असते. एबी फॉर्म हा निवडणुकीतला अत्यंत कळीचा मुद्दा आहे.
निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवशी पहाटे ज्यांची उमेदवारी निश्चित झाली त्यांना एबी फॉर्म कसे पाठवावेत, हा एक मोठाच प्रश्न या वर्षी राजकीय पक्षांपुढे होता. पुढे होणार्या सत्तेच्या समीकरणांत भविष्यातील प्रत्येक आमदार महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे हा सगळा गदारोळ सुरू होता. उमेदवार कोण, याचा निर्णय मुंबईत होत असल्यामुळे एबी फॉर्म सकाळी जाहीर झालेल्या उमेदवारांना दुपारपर्यंत ते कसे पोहोचवावेत, हा मोठाच प्रश्न असल्यामुळे चक्क त्यासाठी पण हेलिकॉप्टर तयार होते. एका पक्षाचा विशिष्ट उमेदवाराला उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याबरोबर एबी फॉर्म नावाचा अधिकृत फॉर्म घेऊन हेलिकॉप्टर जे निघाले, ते गगनमंडळाला भेदत नाशिकमध्ये आणि इतरत्र पोहोचले. एबी फॉर्म प्राप्त होताच त्या उमेदवाराने त्या पक्षाकडून आपली उमेदवारी दाखल केली. एबी फॉर्म पाठवण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले, याचा तमाम मराठी बांधवांना अभिमान वाटला पाहिजे. उमेदवार कोणाचे, कितीही निवडून येवोत, परंतु एबी फॉर्म हेलिकॉप्टरद्वारे पाठवून राजकीय पक्षांनी आपली श्रीमंती दाखवून दिली आहे. विकास विकास म्हणजे असतोच काय? आणि यापेक्षा तो वेगळा काय असणार आहे, याचे उत्तर तुम्हाला सापडले तर आम्हाला जरूर सांगा. सध्या राज्यात राजकरणाचा धुरळा उडला असून, सर्वत्र केवळ आणि केवळ त्याचीच चर्चा रंगली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या प्रचार व्यस्त झाले आहेत.