

अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणविरोधात अत्यंत आक्रमक अशी संयुक्त मोहीम हाती घेऊन तुफानी हल्ले चढवले. यामध्ये इराणचे सवोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे पश्चिम आशियात भडका उडाला. खामेनी समर्थक रस्त्यावर उतरल्याने आणि इराणने अमेरिकेवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिल्याने परिस्थिती चिघळताना दिसते. जगाला तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित होणार असून जगाच्या अर्थकारणालाच त्याची झळ बसेल. गाझापट्टी आणि युक्रेनमधील युद्धानंतर आता पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारण व व्यापारावर अत्यंत दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने ‘एपिक फ्युरी’ आणि इस्रायलने ‘लायन्स रोअर’ अशा मोहिमांच्या अंतर्गत सामुद्रिक तसेच हवाई हल्ले करून, तेहरानसह इस्फाहान कोम, कराज, शिराज, तबरीज आणि केरमानशाह या प्रमुख शहरांना लक्ष्य केले. इराणनेही इस्रायलसह कतार, कुवेत, बहारीन, संयुक्त अरब अमिराती येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर प्रतिहल्ले चढवले. इराणचे समर्थन असलेले येमेनमधील हुती आणि लेबनॉनमधील हेजबोला हे अतिरेकी गटही सक्रिय झाले असून, त्यांनी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. इराणने अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळावा, यासाठी अमेरिका व इस्रायलकडून दबाव होता. इराणने युरेनियम समृद्धीकरणाची पातळी अणुऊर्जा कार्यक्रमापुरती सीमित ठेवण्याची तयारी दर्शवली होती; परंतु क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम थांबवावा, या अमेरिकेच्या मागणीस त्याची तयारी नव्हती. यासंबंधी ओमानमध्ये बोलणी सुरू होती आणि ती संपण्यापूर्वीच अमेरिका आणि इस्रायलने थेट युद्धच सुरू केले. इराणपासून आपल्या देशाला आणि जनतेला धोका होता. त्यामुळे हल्ला केला, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी अण्वस्त्रे बाळगू नयेत, याची खबरदारी घेणे हे अमेरिकेचे ध्येय आहे. आम्ही त्यांच्या नौदलाचा नाश करू, तसेच पश्चिम आशियात त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणार्यांचाही सर्वनाश करू, अशी गर्जना करतानाच इराणी जनतेने स्वतःचे भवितव्य स्वतःच्या हातात घेण्याचे आवाहनही ट्रम्प यांनी केले. काही महिन्यांपूर्वी इराणमध्ये झालेल्या आंदोलनास अमेरिकेचीच चिथावणी होती. इराणमध्ये 1979 मध्ये इस्लामी क्रांती झाल्यानंतर रुहल्ला खोमेनी हे इराणचे सुप्रीम लीडर बनले. त्यांच्या मृत्यूनंतर (1989) अयातुल्ला अली खामेनी सर्वोच्च धर्मगुरू बनले. नागरी वापरासाठी आण्विक कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचवेळी संहारक अण्वस्त्रांची निर्मिती करण्यावर बंदी घातली होती. खामेनी यांनी सरकारी क्षेत्रातील तेल व वायू उद्योगांचे खासगीकरण केले आणि इराणला ऊर्जा महाशक्ती बनवले. तथापि, त्यांनी शिया इस्लामवादास प्रोत्साहन दिले आणि अन्य देशांतही इराणी क्रांतीचा प्रसार केला. इराणने ‘अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ला पूर्ण पाठिंबा दिला. सीरिया, इराक, येमेन, गाझा येथील युद्धांत त्यांनी थेटपणे सहभाग घेतला, तर युक्रेन युद्धात रशियाची बाजू घेतली. अमेरिकाविरोधावरच इराणमधील धार्मिक सत्तेचे राजकारण आधारलेले आहे. खामेनी इस्रायलला कट्टर शत्रू समजत होते. इस्रायलला संपवण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला होता. त्यासाठी इस्रायल व पॅलेस्टाईन संघर्षात त्यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली होती. 1999, 2009, 2017-18 आणि 2025 मधील स्त्रिया, विद्यार्थी व सर्वसामान्यांची आंदोलने त्यांनी निर्घृणपणे चिरडून टाकली. स्त्रीवादी कार्यकर्त्या, पत्रकार, ब्लॉगर्स यांनी विरोधी आवाज काढताच त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. इराणमधील शहा पहलवी यांची राजवट संपल्यानंतर गेली 47 वर्षे तेथे धर्मगुरूंचीच सत्ता असून, या काळात तेथे कट्टरतावाद रुजवला गेला; मात्र म्हणून इराणमधील राजवट उलथून पाडण्याचा अधिकार अमेरिका, इस्रायल वा कोणत्याही बाहेरील देशांना नाही. 2003 मध्ये सद्दाम हुसैन यांनी महासंहारक अस्त्रांचा साठा करून ठेवल्याचा आरोप करून, अमेरिकेने इराकवर आक्रमण केले. प्रत्यक्षात ही अस्त्रे सापडलीच नाहीत. इराकवर हल्ला करण्यास इस्रायलनेच अमेरिकेला प्रवृत्त केले होते, अशी माहिती नंतर पुढे आली. यावेळी अणुबॉम्बची निर्मिती करता येईल, अशाप्रकारचा कुठलाही आण्विक साठा आम्ही बाळगणार नाही, अशा आशयाची लेखी हमी देण्याची तयारी इराणने दर्शवली होती, असे ओमानचे परराष्ट्रमंत्री बद्र अलबू सैदी यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणशी केलेल्या करारात या गोष्टीचा उल्लेख नव्हता. त्यामुळे इराण युरेनियम समृद्धीकरण करत आहे, हा युक्तिवाद संदर्भहीन ठरला होता. अण्वस्त्र केंद्रांची अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना पाहणी करू देण्याची तयारी इराणने दर्शवली होती; परंतु त्यापूर्वीच ट्रम्प यांनी पश्चिम आशियात युद्धनौका धाडल्या. इराणवर हल्ला केल्यास त्याचे भयानक परिणाम होऊ शकतात, असा इशारा ट्रम्प यांना त्यांच्या सल्लागाराने दिला होता; परंतु तो त्यांनी धुडकावून लावला. हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखली, तर त्यामुळे व्यापार ठप्प होऊन जाईल. भारत आणि चीनसह इतर देशांचे शेकडो तेलाचे टँकर तेथूनच जातात. इराणच्या आखाताच्या तोंडावर असलेला हा अरुंद जलमार्ग जगातील 25 टक्के तेल व्यापार हाताळतो. इराणवरील या हल्ल्यांमध्ये फ्रान्स सहभागी नाही, असे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी म्हटले असून, रशियाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. चीन, उत्तर कोरियानेही निषेध केला. खामेनींची हत्या करण्यात आली, अशी प्रतिक्रिया रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी दिली आहे, तीही महत्त्वाची ठरते. इराणसह पश्चिम आशियात नोकरी-धंद्यासाठी लाखो भारतीय गेले असून, त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. शिवाय हजारो पर्यटकही आखाती देशांत अडकले आहेत. या सर्वांना सुरक्षितपणे परत आणण्याचे आव्हान आहे. संयुक्त राष्ट्र संघाची पर्वा न करता मनमानीपणे कोणत्याही देशावर हल्ले करणे आणि तेथे सत्तापालट घडवणे, ही साम—ाज्यवादी मानसिकता असून, याचे कदापि समर्थन करता येणार नाही. या नव्या युद्धाने उरल्यासुरल्या जागतिक शांततेला धक्का बसला आहेच, त्यावर वेळीच तोडगा न निघाल्यास विश्वयुद्धाची ती नांदी ठरण्याचाही मोठा धोका संभवतो.