

दि. 25 मे 2025 हा दिवस भारतातील तमाम ध्येयवेड्या तरुण-तरुणींसाठी अत्यंत महत्त्वाचा. आयएएस, आयपीएस, आयएफएस बनण्यासाठी ज्या परीक्षेची तरुण, तरुणी गेल्या दीड-दोन वर्षांपासून वाट पाहत आहेत, ती यूपीएससी पूर्व परीक्षा फक्त एक महिना सात दिवसांवर आहे. 25 मे रोजी रविवारी देशातील सुमारे 13 लाख विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी कर्तुत्व आजमावतील. यातील निम्मे यशवंत ऑगस्टमध्ये होणार्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.
भारतातील तरुण, तरुणींची जसजशी संख्या वाढतेय तसतशी आयएएस आणि आयपीएस बनण्याची क्रेझही वाढतेय. तथापि, असे सर्वच ध्येयवादी तरुण-तरुणी आयएएस, आयपीएस अधिकारी बनू शकत नाहीत. वर्षभरातील एकूण जागा मर्यादित आणि इच्छुक जास्त असे व्यस्त प्रमाण असल्याने कित्येक उमेदवारांना आयआरएससह (भारतीय महसूल सेवा) अन्य 26 ते 27 सेवांमध्ये समाधान मानावे लागते. गुणवत्ता यादीत झळकणारे पहिले शंभर ते सव्वाशे उमेदवारच आयएएस, त्यानंतर दुसर्या श्रेणीतील 100 आयएफएस आणि तिसर्या श्रेणीतील 100 ते 125 आयपीएस बनू शकतात. उरलेल्या 500 ते 600 उमेदवारांना इंडियन पोस्टल सर्व्हिस, इंडियन कोस्टल सर्व्हिस, सीबीआय सुपरिंटेंडेड यासह अन्य अखिल भारतीय सेवांमधील पदांवर समाधान मानावे लागते.
आयएएस ही देशातील सलग दोन वर्षे चालणारी अशी परीक्षा आहे, जी केवळ पास होऊन चालत नाही. येथे मेरिटमध्येच यावे लागते. या परीक्षेला बसणारे सर्वच उमेदवार अभ्यास करतात; पण इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी उत्तुंग यश मिळवावे लागते. असे उत्तुंग यश मिळविण्यासाठी अभ्यासही खडतर करावा लागतो. अशा अभ्यासासाठी परिश्रमही कठोर असायला हवेत.
विजय मिळो अथवा पराजय, याची पर्वा न करता प्रचंड शक्तिनिशी ते कामाला लागतात आणि अखेर यशाला गवसणी घालतातच. महाराष्ट्रात असे अनेक उमेदवार होऊन गेले आहेत, ज्यांनी परीक्षा देण्याचे शेवटचे वर्ष आणि अखेरचा प्रयत्न (अटेम्ट) शिल्लक असताना आयएएस परीक्षा क्रॅक केली आणि कुटुंबीयांना सुखद धक्का दिला.
सनदी अधिकारी बनण्याचे वेड तरुणांना का खुणावते? जगात मंदीची लाट येवो की कोरोनाची महामारी, सनदी अधिकार्यांचे पगार कधीच कुणीही थांबवू शकत नाही. भारतीय राज्यघटनेने या नोकरशहांना भक्कम संरक्षण कवच बहाल केले आहे. त्यांचा पगार दर महिन्याच्या 1 तारखेला होतोच. त्यांचा पगार संचित निधीतून केला जातो. एखादा सनदी अधिकारी कुणाला आवडो अथवा न आवडो, त्याला वाट्टेल तेव्हा नोकरीवरून काढता येत नाही.
अखिल भारतीय सेवेच्या 311 व्या कलमाने त्यांच्या नोकरीला भक्कम संरक्षण कवच लाभले आहे. यामागचा मुख्य हेतू हाच की, सरकार कोणत्याही पक्षाचे असूदेत सनदी अधिकार्यांनी निष्पक्ष आणि तटस्थ राहून निर्भयपणे काम करावे; परंतु बरेच सनदी अधिकारी निर्भयपणे काम न करता राजकारण्यांची खूशमस्करी करण्यात धन्यता मानतात. त्याचे कारणही दिवसेंदिवस ओंगळवाणे आणि हिडीस रूप धारण करत असलेल्या राजकारणात आहे.
गुजरातमधील संजय भटसारख्या आयपीएस अधिकार्यासारखी आपली गत होऊ नये आणि आयुष्यभर तुरुंगात सडण्याची वेळ येऊ नये, असे बर्याच सनदी अधिकार्यांना वाटू शकते; पण धोरणी मुत्सद्दीपणा आणि निष्कलंक चारित्र्य असेल, तर राजकारण्यांच्या मुसक्या आवळता येतात, हे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी दाखवून दिले आहे. आपल्या शक्तीचे सिंचन केल्याने देशात किती आमूलाग्र बदल केला जाऊ शकतो याचा वस्तुपाठ शेषन यांनी घालून दिला आहे. देश तोच आहे. राजकारणी आणि परिस्थिती फक्त बदलली. यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हृदयस्पर्शी वचन आहे. ते ग्रामगीतेत म्हणतात, ‘कौन कहता हैं यह देश होगा गुंडोंका, मवालियोंका, काले बाजार शौकिंयोंका। अरे आयीं हवा निकल जायेंगी जोश बढ़ेगा सेवा का।’