

काही तरी बिघडले आहे, हे निश्चित. पर्यावरणाचा समतोल म्हणा किंवा निसर्गाचे चक्र म्हणा, बिघाड झालेला आहे हे आता दिसून येत आहे. पावसाला आर्त हाक घालणारी मराठवाड्यातील जनता चक्क ‘नको नको रे पावसा’, असे म्हणत आहे. ‘येरे येरे पावसा’ म्हणणार्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल, अशाप्रकारची व्यंगचित्रे या भागात प्रसिद्ध झाली आहेत. मराठवाडा हा टँकरवाडा म्हणून ओळखला जातो. जिथे पिण्याच्या पाण्याची मारामार असते, तिथे लाखो टँकर पावसाने ओतून टाकले आहेत. खरिपाचे हातातोंडाशी आलेले पीक पार वाहून गेले आहे, त्यामुळे ‘नको नको रे पावसा,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये संपूर्ण राज्यात बर्यापैकी उष्णता असते. याच काळात रब्बीच्या पिकासाठी शेताची मशागत केली जाते. धो धो झालेल्या पावसामुळे काही काही शेतकर्यांची नुसती पिकेच नाही, तर चक्क शेतही वाहून गेलेले आहे. एवढा सगळा विध्वंस करूनही पर्जन्यदेवतेचे समाधान झालेले दिसत नाही. अजूनही कुठे कुठे पावसाची बरसात सुरूच आहे. पाऊस पडावा म्हणून कधी काळी प्रार्थना केली जायची, आता पाऊस थांबवण्यासाठी काय करावे हे समजत नसल्यामुळे जनता भांबावून गेली आहे.
पाऊस पडावा म्हणून बेडकांचे लग्न लावण्याची प्रथा होती. आता या बेडकांचा घटस्फोट कसा घडून येईल, याचाही विचार करण्याची वेळ महाराष्ट्र राज्यातील लोकांवर आहे. हे सगळे कशामुळे घडून आले, याची शहानिशा तज्ज्ञ मंडळी करतीलच; परंतु आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या हातात पुन्हा त्याच सर्वशक्तिमान परमेश्वराची आराधना करण्याशिवाय काहीही नाही. कुठे तरी बंगालच्या उपसागरात एखादे वादळ निर्माण होते आणि कमी की जास्त दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस मात्र मराठवाड्यात पडत आहे, हे कळण्यापलीकडचे आहे.
पावसाचे अंदाज वर्तवणारी महत्त्वाची संस्था म्हणजे हवामान विभाग आणि त्याचबरोबर आजकाल स्वयंघोषित हवामानतज्ज्ञही तयार झाले आहेत. यांच्यापैकी सर्वांच्या अंदाजांना फसवून पावसाने घुसखोरी केल्याचे दिसून आले आहे. पावसाळा संपून एकदाचे कोरडे वातावरण झाले, तर कृषी आणि इतर सर्वच क्षेत्रांना पुन्हा बहर येण्यास वेळ लागणार नाही. पशुसंवर्धनाचा विचार केला, तरी गोठ्यामधील ओल आणि साचलेला चिखल, यामुळे सरसकट 20 टक्के दूध उत्पादन कमी झाले होते. एकदाचे गोठे कोरडे झाल्याबरोबर माश्या कमी होतील आणि पुन्हा उत्पादनात वाढ होईल हे महत्त्वाचे आहे.
याला जबाबदार कोण असू शकेल, याचा विचार केला तर पावसाच्या पहिल्या सरींबरोबर कवितांचा पाऊस पाडणार्या कवींनाही जबाबदार धरले पाहिजे. इथून पुढे पावसाळ्याच्या काळात कवी मंडळींवर अशाप्रकारच्या कविता लिहिण्यासाठी बंदी आणली पाहिजे. जो काय पाऊस पडायचा तो पडू द्या; पण तुम्ही कवितांचा पाऊस पाडू नका, अशी आमची कवींनाही नम्र विनंती आहे.