

बांगला देशमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये मध्यवर्ती निवडणुका होणार असल्या, तरी देखील ऑगस्ट 2024 पासून हा देश जळतच आहे. पंतप्रधान शेख हसीना वाजेद त्यांच्या विरोधात उठाव झाल्यानंतर त्यांना भारताच्या आश्रयास यावे लागले. या उठावात अवामी लीग या हसीना यांच्या तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांची घरे जाळण्यात आली. आगामी निवडणुका लढवण्यास अवामी लीगला बंदी घालण्यात आली आहे. उलट बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (बीएनपी) विद्यमान अध्यक्ष तारीक रहमान हे सतरा वर्षांनंतर गेल्या आठवड्यात पुन्हा मायदेशी परतले. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सतरा वर्षे हद्दपार असलेले रहमान हे बांगला देशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे चिरंजीव. ते आगामी पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जातात. जमात-ए-इस्लामी पक्षाची बीएनपीबरोबर 2001 ते 2006 या काळात युती होती. मात्र येत्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर कट्टर विरोधक म्हणून उभे राहिले आहेत.
तारीक रहमान लष्कराच्या आशीर्वादाने परतले आहेत. बांगला देशच्या राजकारणात त्यांना क्राऊन प्रिन्स असे संबोधले जाते. लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष जियाउर रहमान यांचे ते सर्वात धाकटे पुत्र. खालिदा या तीनदा पंतप्रधान झालेल्या होत्या. वास्तविक पूर्वी तारीक हे बीएनपीमध्ये एक प्रमुख चेहरा म्हणून उदयास आले होते. खालिदा जियांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. ते पक्षाचे रणनीतिकार होते आणि युवकांमध्येही लोकप्रिय होते. परंतु 2007 मध्ये देशातील राजकारण पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या भोवर्यात सापडले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आणि ते दीड वर्ष तुरुंगात होते. ब्रिटनमध्ये 17 वर्षे निर्वासिताचे आयुष्य जगल्यानंतर 25 डिसेंबर रोजी ते परतले, त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी झुबेदा आणि मुलगी झैमा याही परतल्या आहेत. कडक सुरक्षेमध्ये ज्या पद्धतीने तारीक यांचे स्वागत करण्यात आले, त्यावरून लष्कराचे त्यास मूक समर्थन असल्याचे स्पष्ट होते.
खालिदा सध्या आजारी असून, त्यांच्याजवळ राहण्याची इच्छा तारीक यांनी व्यक्त केली होती. परंतु वास्तविक खालिदा या कित्येक महिने आजारी असून, त्यावेळी काही तारीक यांना मायदेशात येऊ देण्यात आलेले नव्हते! बांगला देशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे असून, सव्वा वर्षापूर्वी बांगला देश पेटला होता, तेव्हा युनूस यांनाही विदेशातून माघारी बोलावण्यात आले होते. सध्या युनूस यांच्याकडेच देशाच्या कारभाराची सूत्रे असली, तरी ते लष्कराचेच प्यादे आहेत. काही दिवसांपूर्वीच युवा नेते शरीफ उस्मान हादी यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आंदोलकांनी तेथील आघाडीचे दैनिक असलेल्या द डेली स्टारच्या कार्यालयावर हल्ले केले. अवामी लीग हा बांगला देशमधील सर्वात मोठा पक्ष असून, येत्या निवडणुकी तोच भाग घेऊ शकणार नसल्यामुळे, या निवडणुकांना काहीएक अर्थ नाही.
बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी हे दोन्हीही धर्मांध आणि हिंसाचाराचे समर्थन करणारे पक्ष आहेत. भारताचा द्वेष करणे आणि भारतविरोधी कारस्थाने रचणे, हेच त्यांचे धोरण राहिलेले आहे. बांगला देशात गेल्या काही दिवसांत सात हिंदू कुटुंबांची घरे जाळण्यात आली आहेत. मागच्या आठवड्यात देशभरात प्रचंड निदर्शने झाली आणि त्यादरम्यान जमावाने 28 वर्षीय हिंदू कामगार दीपू चंद्र दास याची हत्या केली. धर्माचा अपमान केल्याच्या आरोपावरून जमावाने दीपूला मारहाण करून ठार केले आणि त्याचा मृतदेह एका झाडाला बांधून पेटवून देण्यात आला. पाकिस्तानातही धर्मनिंदेच्या आरोपावरून अशाच प्रकारे हिंदू व ख्रिश्चनांच्या हत्या झालेल्या आहेत. बांगला देशातील अल्पसंख्याकावरील अत्याचार हा भारतासाठी अधिक चिंतेचा विषय आहे. धर्मनिंदेचे आरोप करत अल्पसंख्य समाजामध्ये दहशत निर्माण करणे, हाच त्यामागचा हेतू आहे. ज्या हादीची हत्या झाली, तो भारतविरोधी कृत्य करत होता. परंतु अवामी लीग पक्षाने त्याची हत्या केली. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर सीमा ओलांडून भारतात लपले, असा निराधार आरोप करण्यात आला.
हादी हा राज्यशास्त्राचा अभ्यासक होता आणि खासगी विद्यापीठांमध्ये तो शिकवत होता. बांगला देशातील राजकीय परिस्थितीवर त्याने पुस्तकही लिहिले आहे. परंतु एका विशिष्ट अजेंड्यावरच तो काम करत होता. हसीना सरकारविरोधातील निदर्शनांदरम्यान त्याचे राजकीय महत्त्व वाढले. इन्कलाब मंच नावाचे एक नवीन संघटन हादीने उभे केले. हा मंच कट्टरपंथी जमात-ए-इस्लामीच्या जवळचा मानला जातो. आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणाही हादीने केली होती. हादीच्या खुनानंतर हजारो जिहादी बांगला देशमध्ये दंगल करून देशाची राखरांगोळी करत आहेत, अशा आशयाची टिप्पणी प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केली आहे. या देशासमोरील खरा धोका हा आहे. सध्याच्या राजकीय अस्थिरतेमुळे तो आणखी वाढला आहे.
तेथील कट्टरतावादी पक्ष आणि शक्तींना पाकिस्तानचा पाठिंबा दडून राहिलेला नाही. त्याचमुळे उफाळलेला संघर्ष देशाला कुठे नेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताकडे बोट दाखवून हे कट्टरपंथी पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत आहेत. जेन-झीच्या आंदोलनाच्या उद्रेकानंतर झालेल्या सत्तापालटानंतरही हा देश सुधारण्याचे नाव घेईना. हादीवर गोळ्या झाडणारा फैझल करीम मसूद हा अवामी लीगच्या छात्र लीगशी संबंधित आहे. हसीनाविरोधी बंडानंतर दहशतवादविरोधी कायद्याच्या अंतर्गत छात्र लीगवर बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी बांगला देशमधील बंडानंतर तेथे नॅशनल सिटिझन्स पार्टी नावाच्या दुसर्या एका पक्षाची स्थापना करण्यात आली. त्याचे नेते नाहिद इस्लाम हे युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारमध्ये होते. हादी हा बांगला देशसाठी लढताना शहीद झाला. भारताने हादीचे मारेकरी आणि शेख हसीना यांना आमच्याकडे परत सोपवावे, अशी पोस्ट नाहिद यांनी लिहिली आहे.
बांगला देशातील अतिरेकी कृत्यांना हसीना यांची चिथावणी असल्याचा आरोप बांगला देशच्या परराष्ट्रखात्याने केला आहे. जमात-ए-इस्लामी या पक्षावरील बंदी युनूस यांनीच उठवली होती. थोडक्यात, आता बांगला देशमध्ये भारताचा दोस्त असलेला अवामी लीग पक्ष हा बाजूला पडला असून, बीएनपी, जमात-ए-इस्लामी आणि नॅशनल सिटिझन्स पार्टी हे तिन्ही पक्ष भारताला शत्रू समजणारे आहेत. बांगला देशातील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा धोकाच आहे. शेजारी देशातील ही राजकीय अस्थिरता भारतासाठी चिंतेची बाब आहे ती त्यामागील पाठीराखा पाकिस्तान असल्यानेच. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणांकडे लक्ष देताना, कमालीची सावधगिरी बाळगावी लागणार आहे.