पहिला चहा | येवा कोकण आपलाच असा...!

पहिला चहा | येवा कोकण आपलाच असा...!
Published on
Updated on

आता मॉम्स अँड पॉप्स भलतेच एक्साईट होऊन मुलांना घेऊन समुद्राच्या तळाशी असणारे गुलदार जहाज की काय ते पाहायला मालवणात जाणार बरे! महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मत्स्य व्यवसाय विभागाने हा ऐतिहासिक प्रकल्प हाती घेऊन दूरद़ृष्टी साधली. तिकडे युरोपात बुडालेल्या टायटॅनिकला शेवाळ साचल्यामुळे इकडे स्वतःला शेवाळात माखून घेण्याचे गुलदार जहाजाने ठरविले आहे. आता या शेवाळयुक्त नौकेला पाहायला अनेक देशी-विदेशी पर्यटक येतील. स्कुबा डायव्हर्स, स्नॉर्कलर्स यांचे खिसे जाम होतील. हे मुद्दाम बुडालेले पहिलेच जहाज असेल. कारण, नौदलाने याला निवृत्त करून इंजिन काढून घेऊन समुद्राखालीच विश्रांती घे म्हणून पाठवून दिले. जहाजाला विश्रांतीची सवय नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने बिचार्‍या जहाजाला काम दिले. तू समुद्राखाली राहा म्हणजे तुला शेवाळ येईल आणि प्रचंड प्रमाणात माशांची पैदास होईल. मत्स्य व्यवसाय वाढेल. माशांनापण तुझ्या छोट्या छोट्या खोल्यांत संसार थाटता येईल.

हे सर्व विश्व पाहायला पर्यटक समुद्रात उतरतील आणि पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्थेस फायदाच फायदा असे आमिष दिले. पगारादाखल हवे तेवढे पाणी ठेवून घे. हा अवघाचि समुद्र तुझा अशी कागदोपत्री तजवीजही मत्स्य व्यावसायिकांनी केली. हे जहाज पर्यटनासाठी पाण्याखाली राहण्यास सज्ज आहे, हे पर्यटकांना सूचित केले. जहाजाने निमूटपणे सर्व मान्य केले असावे म्हणून प्रकल्पाच्या योजना पुढे राबविण्याचे ठरले. टोईंग करून जहाजाला निवती बंदराच्या नियोजित ठिकाणी पाण्याच्या खाली उतरविण्यात आले.

आता पोरं हे जहाज पाहण्यासाठी पाण्यात उतरतील. गुलदारचा सांगाडा थोड्याच दिवसात शेवाळात माखून गेलेला असेल. पोरांसाठी ही पर्वणीच असेल. हॉटेल, होम स्टे गर्दीने भरून जातील. सिंधुदुर्ग आणि इतर कोकणस्थ किल्ल्यासोबत आयएनएस गुलदार जहाजपण पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल. पैसे मिळविण्याच्या कितीही क्लृप्त्या केल्या, तरी होर्मुझात अडकलेल्या जहाजांना मात्र शेवाळ लागेपर्यंत थांबण्याची वेळ येऊ नये, ही मॉम्स अँड पॉप्स सोबत प्रत्येकाच्या मनात उलथापालथ तर चालतच राहणार. ती समस्या सुटेपर्यंत हा खेळ चांगला असेही एकीकडे वाटून घ्यावे पर्यटकांनी. म्हणून अनेक पर्यटक या जहाजाला शुभेच्छा देत आहेत आणि कोकणातल्या पाट्या अजून गडद होऊन सांगत आहेत, ‘येवा कोकण आपलाच असा.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news