

कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रत्येक सरकारला ठरावीक वर्षांच्या कारभारानंतर मतदारांच्या नकारात्मक भूमिकेला सामोरे जावे लागते. पाठोपाठ दोन किंवा तीन टर्म सत्तेवर असलेल्या सरकारला निवडणुकीच्या वेळी अँटिइन्कमबन्सीचा फटका बसू शकतो. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सलग पंधरा वर्षे पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या त्यांच्या पक्षाचे तीन महिन्यांपूर्वी पानीपत कसे झाले, हे सर्व देशाने बघितले आहे; पण गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ केंद्रात सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची जादू आजही देशावर कायम आहे, असे इंडिया टुडे समूहाने केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. सी व्होटर्सने घेतलेल्या सर्वेक्षणात आज लोकसभेची निवडणूक झाली, तरी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सर्वाधिक जागा जिंकेल व सरकार स्थापन करील, असे निष्कर्ष काढले आहेत.
सी व्होटर्सने केलेल्या सहामाही सर्वोक्षणात देशात आज लोकसभा निवडणूक झाली, तरी एनडीएला ३२६ जागा मिळतील व इंडिया आघाडीची मजल १८५ जागांवर थांबेल, असे म्हटले आहे. भाजपचे २६१ खासदार निवडून येऊ शकतात, तर काँग्रेसच्या खासदारांची संख्या १०६ असेल असे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेे, प्रमुख विरोधी पक्ष असलेली काँग्रेस आणि त्यांना साथ देणारी अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी यांनी कितीही आदळआपट केली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तुंग लोकप्रियता कायम आहे व त्यांच्या जवळपास दुसरा कोणीही नेता नाही, हे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. विरोधी नेत्यांनी केलेले आरोप, संसदेत घातलेला गोंधळ, विद्यार्थी व युवकांना जमवून केलेले विरोध प्रदर्शन याचा मोदींच्या लोकप्रियतेवर काहीही परिणाम झालेला नाही. भाजप व एनडीएकडे मोदी हे नाणे खणखणीत आहे. मोदी यांचे प्रभावी व भक्कम नेतृत्व हा भाजपचा व एनडीएचा हुकमी एक्का आहे. त्यामुळे मोदींच्या विरोधात कितीही पत्रकार परिषदा व सभा-मेळावे घेतले व मोदींची टिंगल टवाळी करणारी रिल्स काँग्रेस पक्षाने कितीही बनवली, तरी त्यांचे स्थान उंच शिखरावरच आहे, असा या सर्वेक्षणातील आकडेवारीचा अर्थ आहे.
सी व्होटर्सच्या वतीने वर्षातून दोन वेळा देशातील मतदारांची मानसिकता कशी आहे? जनतेच्या मनात सरकारविषयी व नेतृत्वाविषयी काय भावना आहेत, या मुद्द्यावर सर्वेक्षण करण्यात येते. ताज्या सर्वेक्षणात पंचवीस हजार जणांनी सहभाग घेतला. देशापुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे. तरुणांमधे खदखद आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जंतर-मंतर व देशात अन्यत्र जेन झीची झालेली आंदोलने, जेन झीवर झालेला लाठीमार, अश्रुधूर, पॅलेट गन्समधून झालेला गोळीबार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा, राम मंदिरात दान पेटीवर पडलेला दरोडा, महागाई आदी ज्वलंत मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात आजही जनतेचा विश्वास हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच आहे. प्रादेशिक नेते, लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन यांच्या कारभारावर लोकांची कमी-अधिक नाराजी असू शकते; पण देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच करावे, अशी लोकांची भावना आहे. एवढेच नव्हे, तर आज निवडणूक झाली, तरी मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असे मत सर्वाधिक लोकांनी नोंदवले आहे. देशात २२ राज्यांत भाजप सत्तेवर आहे.
सतरा राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत. देशात भाजपचा जो आश्चर्यकारक विस्तार झाला तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळेच. ज्या राज्यात भाजपला शिरकाव करणे कठीण होते, अशा पश्चिम बंगालमध्ये आज भाजपची सत्ता आहे. राज्यात सर्वत्र कमळ फुलले आहे. ५४३ जागा असलेल्या लोकसभेत आज एनडीएच्या खासदारांची संख्या ३५२ आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार आज लोकसभा निवडणूक झाली, तर एनडीएचे ३२६ खासदार निवडून येऊ शकतील. जानेवारी २०२६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात लोकसभेत भाजपचे २८७ खासदार निवडून येतील असे म्हटले होते; पण ऑगस्ट २०२६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात भाजपचे २६१ खासदार विजयी होऊ शकतील, असे म्हटले आहे. दर सहा महिन्यांनी घेतल्या जाणाऱ्या देशव्यापी सर्वेक्षणात काही मुद्द्यांवर आकडेवारीत चढ-उतार होतच असतात; पण भाजप हा सर्वाधिक खासदारांचा नंबर १ चा पक्ष राहील व केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकारच स्थापन होईल, हे निष्कर्ष कायम आहेत.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने 'अब की बार चार सौ पार' अशी घोषणा दिली होती. प्रत्यक्षात निकालानंतर भाजपचे २४० खासदार निवडून आले होते. २०२४ मध्ये इंडिया आघाडीचे २३२ व काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आले होते. ताज्या सर्वेक्षणानानुसार आज लोकसभा निवडणूक झाली, तर इंडिया आघाडीचे १८७ व काँग्रेस पक्षाचे १०६ खासदार निवडून येतील असा अंदाज आहे. याचा दुसरा अर्थ काँग्रेस पक्षाचे खासदार काहीसे वाढू शकतील; पण इंडिया आघाडीच्या खासदारांची संख्या कमी होईल. देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक म्हणजे ४८.७ टक्के लोकांनी पसंती नरेंद्र मोदींना दिली आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात मोदींना पसंती देणाऱ्या लोकांची संख्या ५४.७ टक्के होती. त्यानंतर पंतप्रधान म्हणून दुसऱ्या क्रमांकाची पसंती लोकांनी राहुल गांधी यांना दिली आहे.
राहुल गांधी यांना २७.१ टक्के लोकांची पसंती आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणापेक्षा त्यात ०.५ टक्के वाढ झाली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना ९.२ टक्के, ममता बॅनर्जी २ टक्के, अखिलेश यादव १.७ टक्के, अभिजित दीपके १.३ टक्के व अरविंद केंजरीवाल यांना १.२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षाने केलेल्या गदारोळात वाहून गेले. स्वत: पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री अधिवेशनात 'वंदे मातरम्' गीताची वेळ सोडून फिरकले नाहीत, तरीही देशातील जनतेच्या मनात मोदींचे स्थान कायम आहे. राजकारणात आजची लोकप्रियता उद्याच्या निवडणुकीतील विजयाची हमी नसते. आगामी काळात सरकारच्या कामगिरीबरोबरच रोजगार, महागाई, शेतकरी प्रश्न, तरुणांच्या अपेक्षा आणि विरोधकांची एकजूट हे मुद्दे महत्त्वाचे ठरतील. मतदारांचा अंतिम कौल निवडणुकीच्या वेळी कोणत्या मुद्द्यांवर ठरतो, याकडे देशाचे लक्ष राहणार आहे. एकूणच, या सर्वेक्षणातून मतदारांच्या मनातील राजकीय कल पूर्णपणे एकतर्फी असल्याचे मानणे योग्य ठरणार नाही. निवडणुकीला अजून बराच कालावधी असला, तरी सध्याच्या घडीला मोदींचे नेतृत्व भाजप आणि एनडीएसाठी सर्वात मोठे राजकीय भांडवल असल्याचे चित्र दिसते.