UN woman leadership | मिशेल बॅचलेट, रेबेका ग्रीनस्पॅन

UN woman leadership |
UN woman leadership | मिशेल बॅचलेट, रेबेका ग्रीनस्पॅन
Published on
Updated on

युवराज इंगवले

संयुक्त राष्ट्र (यूएन) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तिची स्थापना जगात शांतता, सुरक्षा आणि सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात आली. दुसर्‍या महायुद्धानंतर जगभरात स्थैर्य निर्माण करण्यासाठी 24 ऑक्टोबर 1945 रोजी याची स्थापना झाली. सध्या या संघटनेत 193 सदस्य देश आहेत. संयुक्त राष्ट्राच्या 80 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च पदावर महिला नेतृत्व येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. यावेळी चार उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टमध्ये केली असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे मिशेल बॅचलेट (वय 74) आणि रेबेका ग्रीनस्पॅन (70). न्यूयॉर्कमध्ये 21-22 एप्रिल रोजी या दोघींमध्ये चर्चासत्र (डिबेट) होणार आहे. मिशेल या चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा राहिल्या आहेत, तर रेबेका या कोस्टारिका देशाच्या माजी उपराष्ट्राध्यक्षा आहेत.

1973 मध्ये चिलीमध्ये जनरल ऑगस्टो पिनोशे यांनी लष्करी उठाव केला. त्यावेळी मिशेल वैद्यकीय (बालरोग) शिक्षण घेत होत्या. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष साल्वाडोर अयेन्दे यांच्याशी जवळीक असल्यामुळे मिशेल यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. त्यांना अटक करून अमानुष छळ करण्यात आला. तुरुंगात त्यांचे हात बांधून त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. बंदिवानांना लोखंडी गजांना बांधून विजेचे धक्के देण्यासारख्या क्रूर पद्धती वापरल्या जात होत्या. या छळामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, तरीही मिशेल खचल्या नाहीत. त्यांनी पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.

क्लिनिकमध्ये संसाधनांच्या अभावामुळे एका रुग्णाची होणारी तडफड पाहून त्यांनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला होता. पुढे त्या राजकारणात उतरल्या आणि काही काळानंतर त्यांनी आरोग्यमंत्री आणि संरक्षणमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली. 2006 मध्ये त्या चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा बनल्या. राष्ट्राध्यक्षा असतानाही त्या सामान्य लोकांमध्ये मिसळत असत. रेबेका ग्रीनस्पॅन यांचा राजकीय प्रवास खूप वेगळ्या पद्धतीने सुरू झाला. 1980 च्या दशकात राष्ट्राध्यक्ष कार्यालयातून आलेल्या एका फोन कॉलमुळे त्यांना आर्थिक सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अर्थ उपमंत्री म्हणून काम केले आणि 1994 मध्ये त्या कोस्टारिका देशाच्या उपराष्ट्राध्यक्षा बनल्या. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक अन्नसंकट तीव्र झाले.

युक्रेनमधून गहू, मका आणि बार्ली यांची निर्यात थांबल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्या आणि उपासमारीचा धोका निर्माण झाला. त्यावेळी रेबेका या संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या महासचिव होत्या. त्यांनी पुढाकार घेऊन रशिया, तुर्किये आणि युक्रेन यांच्यात चर्चा घडवून आणली. त्यांच्या प्रयत्नांमुळे काळ्या समुद्रातून धान्य निर्यात करण्याचा करार झाला. मिशेल आणि रेबेका या दोन्ही महिला नेत्यांनी कठीण परिस्थितींवर मात करून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व सिद्ध केले. त्यामुळे यावेळी संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर महिला नेतृत्वाची नवी इतिहासरचना होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news