Missed Nobel Award | हुकलेला पुरस्कार

तिसरे महायुद्ध होऊ शकणारी सात युद्धे आपण थांबवली आहेत. त्यामुळे शांततेचा नोबेल पुरस्कार आपल्यालाच मिळावा, अशी आग्रही मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पतात्या करत होते.
Missed Nobel Award
हुकलेला पुरस्कार(Pudhari File Photo)
Published on
Updated on

तिसरे महायुद्ध होऊ शकणारी सात युद्धे आपण थांबवली आहेत. त्यामुळे शांततेचा नोबेल पुरस्कार आपल्यालाच मिळावा, अशी आग्रही मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पतात्या करत होते. या पुरस्काराने त्यांना हुलकावणी दिली आहे, हे स्पष्ट झाले. व्हेनेझुएला नावाच्या देशाच्या विरोधी पक्षनेते यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळावा, यासाठी कुठेही भांडणे लागली की, ट्रम्प महोदय धावून जात असत आणि कसेही करून ते भांडण सोडवायचा प्रयत्न करत असत. दोन देशांमधील आपापसातील भांडण बरेचदा त्यांचे स्वतःचे समजुत घेऊन मिटत असे. त्या देशांतील कोणीही अध्यक्षांनी किंवा पंतप्रधानांनी काही वक्तव्य करण्याआधीच ट्रम्प महोदय ‌‘मी हे युद्ध थांबवले‌’ असे जाहीर करत असत. एखाद्या पुरस्काराचा मोह किती असावा, याचे हे कमाल उदाहरण समजले गेले पाहिजे.

पुरस्कार हे तसे मोहक असतात, यात शंका नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्यामधील ती एक महत्त्वाची घटना असते. लेखक, कवी, साहित्यिक हे तर पुरस्कार मिळवण्यासाठी कुठल्या थराला जातील, याचे काही सांगता येत नाही. पुरस्कार निवड समितीत कोण आहे, याचा आधी शोध घेतला जातो आणि या निवड समितीतील सदस्यांच्या बरोबर व्यक्तिगत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला स्वतःची पुस्तके किंवा काव्यसंग्रह पाठव, भेटी दे, प्रत्यक्ष भेटून त्यांचे कौतुक करणे असे प्रकार सर्व केले जातात. पुरस्कार निवड समिती हीसुद्धा शेवटी माणसांनीच बनलेली असते. त्यांनाही विविध प्रकारचे लोभ, मोह असतातच. बरेचदा एकाच बैठकीमध्ये विशिष्ट ठिकाणी बसून कोणता पुरस्कार कोणाला द्यायचा, याचे वाटप केले जाते. आजकाल सोशल मीडियामुळे पुरस्कार प्रकरणाला वजन प्राप्त झालेले आहे. एखाद्या व्यक्तीला एखादा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला, तर पुरस्कार देणारी संस्था त्याची प्रसिद्धी करत नाही. भारावलेल्या अवस्थेत असलेली पुरस्कारप्राप्त व्यक्ती स्वतःहून मला हा पुरस्कार मिळाला, याचा डंका पेटवायला लागतो.

Missed Nobel Award
Tadaka Article | अशा या भेटीगाठी..!

पुरस्कारांचा माणसाला असलेला मोह लक्षात घेऊन काही लोकांनी फक्त पुरस्कार देणाऱ्या संस्थांची सुरुवात केलेली आहे. या संस्थांची काम करण्याची पद्धतही सारखीच आहे. सर्वात प्रथम संस्था तुम्हाला संपर्क साधते आणि हा पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आहे, याबद्दल तुमचे अभिनंदन करते. तुम्ही लगेच पेपरात बातम्या वगैरे छापून आणता. त्यानंतर पंधरा दिवसांनी संस्था तुम्हाला काही एक रक्कम मागते आणि यथावकाश तो पुरस्कार देते. तुमच्याकडून घेतलेल्या रकमेवरच यांचा व्यवसाय सुरू असतो.

पुरस्काराचे नाव काय असावे, हे अनेक संस्था ठरवत असतात. ट्रम्पतात्या यांना नोबेल पुरस्कार न मिळाल्याने त्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील एखाद्या फुकटवाडी गावचा न्यू नोबेल पुरस्कार मिळवून स्वतःला शांतता मिळवून घ्यावी, असे सुचवावेसे वाटते. असे पुरस्कार वाटणाऱ्या संस्थांची राज्यात काही कमी नाही, हे निश्चित!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news