जागतिक महासत्तेला हवंय सुरक्षाकवच

'गोल्डन डोम' क्षेपणास्त्र प्रणालीची घोषणा
trump-approves-golden-dome-missile-defense-system
जागतिक महासत्तेला हवंय सुरक्षाकवच Pudhari File Photo
Published on
Updated on
महेश कोळी

एकविसाव्या शतकात युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. आता पारंपरिक रणांगणापेक्षा सायबर स्पेस, ड्रोन तंत्रज्ञान आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे हाच आधुनिक युद्धाचा मुख्य भाग बनत आहे. अशावेळी जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला भविष्यातील या ‘हायब्रीड युद्धा’ला सामोरे जाण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची गरज भासत आहे. यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्डन डोम’ नावाची एक सर्वसमावेशक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली उभारण्याचा घाट घातला आहे.

अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेमध्ये महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्डन डोम’ ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (मिसाईल डिफेन्स शिल्ड) उभी करण्यास मंजुरी दिली आहे. ही प्रणाली विदेशी क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून अमेरिकेला वाचण्यासाठी विकसित करण्यात येत आहे. याची एकूण अंदाजित किंमत सुमारे 14 लाख 96 हजार 798 कोटी रुपये इतकी आहे. या प्रणालीमुळे शत्रूच्या आक्रमक क्षेपणास्त्रांना आकाशातच नष्ट करता येणार असून, त्यामुळे अमेरिकेची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या अखेरीस म्हणजे 2029 मध्ये ही संपूर्ण प्रणाली कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील संचलनाची जबाबदारी जनरल मायकेल गुट्टलीन यांच्याकडे सोपवली आहे. ‘गोल्डन डोम फॉर अमेरिका’ या नावाने ओळखली जाणारी ही योजना संरक्षणाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.

अर्थात, या प्रकल्पाला तांत्रिक व राजकीय आव्हानांचा मोठा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच, काही तज्ज्ञांनी यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक खर्च करावा लागण्याचीही शक्यता वर्तवली आहे. या घोषणेसोबत ट्रम्प यांनी पुन्हा कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य बनण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कॅनडा स्वतंत्र राष्ट्र राहिल्यास ‘गोल्डन डोम’मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना 61 अब्ज डॉलरचा खर्च करावा लागेल; पण जर त्यांनी अमेरिकाचा भाग होण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना एकही डॉलर खर्च करावा लागणार नाही. हा प्रस्ताव त्यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ नेटवर्कवर पोस्ट करत अधिकृतपणे मांडला आहे. तथापि, कॅनडाच्या अध्यक्षांनी नम—पणाने; पण ठाम राहत हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

‘गोल्डन डोम’ ही प्रणाली इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ प्रणालीसारखी असली, तरी अमेरिकेच्या भौगोलिक आणि सामरिक गरजांनुसार ती अधिक विस्तृत आणि प्रगत रूपात साकारली जाणार आहे. ही प्रणाली तीन मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे. रडार, कमांड पोस्ट आणि लॉन्चर युनिटस्. यापैकी रडार प्रणाली आकाशातील संभाव्य धोक्यांची माहिती मिळवण्यास सक्षम असेल. या प्रणालीला मिळालेली माहिती कमांड पोस्टला दिली जाईल, जी निर्णय घेऊन लॉन्चर युनिटला निर्देश देईल. लॉन्चरमधून मिसाईल्स हवेत सोडली जातील. ही क्षेपणास्त्रे उड्डाणादरम्यानच लक्ष्य शोधून नष्ट करतात. या प्रणालीत मोबाईल आणि स्टॅशनेरी दोन्ही प्रकारचे लॉन्चर आहेत.

अमेरिका या प्रणालीसाठी विविध प्रकारच्या लघू आणि दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश करणार आहे. तसेच, हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसाठी खास उपाययोजना, नवीन फ्लेअर्स आणि हत्यारे विकसित केली जातील. सध्या अस्तित्वात असलेल्या ‘पॅट्रियट डिफेन्स सिस्टीम’ आणि प्रगत रडार तंत्रज्ञानाला एकत्रित करून ‘गोल्डन डोम’ तयार केला जाणार आहे.

अमेरिका आणि कॅनडा यांच्यात नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड अर्थात ‘नोरा’च्या माध्यमातून आधीपासूनच सामूहिक संरक्षण सहकार्य आहे. मात्र, ट्रम्प यांचा हा नवीन प्रस्ताव आणि त्यांचे भाष्य कॅनडा-अमेरिका संबंधांमध्ये नव्याने तणाव निर्माण करू शकते. कारण, ‘गोल्डन डोम’ हा प्रकल्प फक्त संरक्षणात्मक पातळीवर मर्यादित नसून, त्याचा वापर राजकीय हेतूंकरिता, विशेषतः ट्रम्प यांच्या राजकीय अजेंड्यासाठी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तथापि, हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला तर जगातील कुठल्याही दहशतवादी किंवा शत्रुराष्ट्राच्या नापाक योजनांना अमेरिकेविरुद्ध यश मिळवणे कठीण होईल, हे निश्चित. कारण, या प्रणालीच्या साहाय्याने अमेरिका आजूबाजूला एक अद़ृश्य संरक्षणकवच उभारणार आहे, ज्याला कोणताही शत्रू भेदू शकणार नाही.

इस्रायलची ‘आयर्न डोम’ ही छोट्या देशांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेली हवाई संरक्षण प्रणाली आहे. या ‘आयर्न डोम’ने 2011 पासून आजवर हजारो लहान अंतराच्या रॉकेटस् आणि इतर क्षेपणास्त्रांचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. मात्र, अमेरिका हा देश क्षेत्रफळाच्या द़ृष्टीने इस्रायलपेक्षा सुमारे 430 पट मोठा आहे आणि लोकसंख्येच्या द़ृष्टीने 30 पट मोठा आहे. त्यामुळे इस्रायलप्रमाणे छोट्या आणि ठराविक भागात कार्यरत असलेल्या एअर डिफेन्स सिस्टीमला अमेरिकेसारख्या विशाल देशात प्रत्येक भागात तैनात करणे ही एक मोठी अडचण होती. म्हणूनच अमेरिका ही नवी आणि अधिक व्यापक प्रणाली विकसित करत आहे. ‘गोल्डन डोम’ ही प्रणाली केवळ छोट्या क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करत नाही, तर ती लांब पल्ल्याच्या मिसाईल्स, ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे होणार्‍या हल्ल्यांपासूनही संरक्षण करू शकते. ही स्पेस-बेस्ड (अवकाशातून चालणारी) मल्टी-लेयर डिफेन्स सिस्टीम आहे. ही प्रणाली लांब पल्ल्याच्या, बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईल्सचा नाश करू शकते.

कोणत्याही दिशेने आलेला धोका ओळखून 360 डिग्री संरक्षण प्रदान करते. ‘गोल्डन डोम’ ही प्रणाली अधिक गतिमान, सुस्पष्ट आणि सध्याच्या हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. अमेरिका सध्या कोणत्याही मोठ्या युद्धात सहभागी नाहीये. जिथे जिथे अमेरिकेची लष्करी उपस्थिती आहे, तेथील स्थिती पाहिल्यास या सर्व भागात तुलनेने दुर्बल शत्रू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अमेरिकेला मोठे नुकसान पोहोचवले जाण्याच्या शक्यता शून्य आहेत. तरीही ट्रम्प प्रशासनाने ही प्रणाली उभारण्याचा निर्णय भविष्यातील युद्धे आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (सायबर व डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे लढले जाणारे युद्धप्रकार) लक्षात घेऊन घेतला आहे. दुसरी गोष्ट अशी की, अमेरिकेने पूर्व किनारा आणि अटलांटिक महासागर परिसरात संभाव्य धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी ‘यूएस फ्लीट फोर्स कमांड’ची तैनाती करून ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news