Diveagar Beach Tragedy | बेपर्वाईचे बळी

Diveagar Beach Tragedy |
Diveagar Beach Tragedy | बेपर्वाईचे बळी (File Photo)
Published on: 
Updated on: 

रायगड जिल्ह्यातील दिवेआगरचा नितांतसुंदर आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याला दरवर्षी अंदाजे ४ ते ५ लाख पर्यटक भेट देतात. या समुद्रातील अनपेक्षित प्रवाहांनी आळंदीतील एका खासगी शिकवणी वर्गातील कोवळ्या वयाच्या आठ विद्यार्थ्यांना आपल्या उदरात ओढून घेतले आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या किशोरवयीन मुलांचा हा करुण अंत त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वांच्याच मनाला चटका लावणारा ठरला; मात्र अशा प्रत्येक दुर्घटनेनंतरची हळहळ, समाजमाध्यमांतील सांत्वन संदेश आणि प्रशासकीय पातळीवरील चौकशीच्या तात्पुरत्या घोषणांचे सोपस्कार यापलीकडे जाऊन समाज म्हणून, सुजाण नागरिक म्हणून आपण काही आत्मपरीक्षण करणार आहोत का, हा खरा सवाल आहे. समुद्राचे वर्णन ‘अथांग‌’ असे केले जाते. याचा अर्थ ज्याचा तळ लागत नाही किंवा ज्याला मर्यादा नाही असा होतो. ही अथांगता आणि त्याचे रौद्र रूप हे मानवाच्या आवाक्याबाहेरचे आहे, हे ठाऊक असूनही त्याकडे डोळेझाक करून, जीव धोक्यात घालण्याची घातक बेपर्वाई आपल्यात का भिनली आहे, याचे उत्तर शोधण्याची वेळ आता टळून चालली आहे.

इतिहासातील अनुभवांवरून धडा घेण्याचे शहाणपण माणसाला उपजत आहे; पण जल्लोषाच्या भरात ते हरपते तेव्हा अनर्थ घडणे अटळ असते. चेंगराचेंगरी, रस्ते अपघात किंवा पर्यटनस्थळांवरील बेधुंदपणा अशा घटना पाहिल्या की, आपल्यात कसलाही बोध न घेण्याची मानसिकता वाढत चालली आहे की काय, असा प्रश्न पडतो. मुरुड जंजिरा येथे २०१६ मध्ये पुण्याच्या एका महाविद्यालयातील चौदा तरुण-तरुणींना समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केले होते. त्यावेळीही सहलींच्या सुरक्षिततेची मोठी नियमावली जाहीर झाली, चौकशी समित्या नेमल्या; परंतु नंतर काय झाले? काही वर्षांनी गणपतीपुळे येथे भाविकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तारकर्ली आणि मालवणच्या समुद्रात जलक्रीडेदरम्यान पर्यटकांचे प्राण गेले, अलिबाग-किहीमच्या किनाऱ्यांवरही पर्यटकांच्या दुर्घटनांची मालिका अखंड सुरूच राहिली. हीच परिस्थिती शेजारच्या गोवा राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर दिसते. दिवेआगरची घटना याच निष्काळजीपणाच्या साखळीतील आणखी एक दुर्दैवी कडी आहे. समुद्र हा जलतरण तलाव नव्हे किंवा कौटुंबिक मनोरंजनाचे उद्यानही नाही; पण याचे भान बहुतांश पर्यटकांना नसते. समुद्राच्या पृष्ठभागावर दिसणारे शांत पाणी आणि त्याचे अंतर्प्रवाह याचा अंदाज सामान्य माणसाला नसतो.

एखाद्या ठिकाणी पाऊल ठेवताना वाळू पायाखालून सरकते आणि क्षणार्धात माणूस खोल खड्ड्यात खेचला जातो किंवा अचानक मोठी लाट येऊन पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही आत ओढून घेते. दिवेआगरमधील प्रकरणात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे विद्यार्थी लाटांसोबत वाहून गेले. सायंकाळी १६-१७ वर्षे वयोगटातील ४८ मुलामुलींचा गट समुद्रात उतरत असताना त्यांच्यासोबत मार्गदर्शक, शिक्षक आणि आयोजक काय करत होते? सोबत असणाऱ्या सहा शिक्षकांनी मुलांना सूचना दिल्या होत्या का? आपल्यावरील जबाबदारीचे भान ठेवत या मुलांकडे लक्ष ठेवण्याचे काम त्यांनी काटेकोर केले का? प्रत्यक्षात ती बुडू लागली तेव्हा त्यांनी काय केले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून ते अनाठायी नाहीत. ऐन उमेदीत असणारी पोटची पोरे जाण्याचे दुःख भेदक असते. सदर ॲकॅडमीने सहलीसाठी पालकांकडून संमतीपत्रे घेतली होती; पण ही संमती दुर्लक्ष करण्याचा परवाना नव्हता. ती संस्थेवरील विश्वासापोटी दिली होती. त्या विश्वासाला जागणे हे संस्थाचालकांचे कर्तव्य होते. चौकशीतून नेमकी चूक कोणाची, हे यथावकाश समोर येईलच; पण गेलेल्या जीवांचे काय? ते परत येणार नाहीत.

समुद्रकिनारी प्रशासनाने धोक्याचे फलक लावणे, लाल झेंडे उभारणे, जीवरक्षकांची चोवीस तास नेमणूक करणे, ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी सूचना देणे या किमान उपाययोजना करणे अनिवार्य आहे. प्रत्यक्षात बहुतांश किनारपट्टीवर ना पुरेसे जीवरक्षक असतात, ना बचाव कार्यासाठी आवश्यक आधुनिक नौका अथवा सुरक्षा जाळ्या. प्रशासनाची ही अनास्था जेवढी जबाबदार आहे, तितकीच किंबहुना त्याहून अधिक जबाबदार पर्यटकांची बेपर्वा मनोवृत्ती आहे. समुद्रात लाटांना सामोरे जाणे, धोक्याच्या रेषेच्या पलीकडे जाऊन स्वतःचे पराक्रम सिद्ध करणे आणि आताच्या काळात रिल्स, फोटोच्या नादात मृत्यूच्या जबड्यात उभे राहणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. सुरक्षारक्षकांनी शिटी वाजवून मागे येण्यास सांगितले, तरी दुर्लक्ष करणे, त्यांच्याशी हुज्जत घालणे किंवा हसण्यावारी नेणे ही प्रवृत्तीही सर्रास दिसते. निसर्गाचे नियम मानवाच्या क्षमतांपेक्षा कितीतरी पटीने कठोर असतात, याचा विसर पडल्याचा हा परिणाम आहे. नियम धाब्यावर बसवणे म्हणजे धाडस हा चुकीचा समज आपण करून घेतला आहे; पण अशा घटनांनी तो दर्प क्षणात वाळूसारखा विरून जातो.

शैक्षणिक सहलींच्या आयोजनाचा आणि सुरक्षिततेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पालकांकडून सहलीच्या नावाखाली भरमसाट शुल्क घेतले जाते; मात्र त्या बदल्यात मुलांच्या सुरक्षिततेची जी चोख व्यवस्था हवी, त्याकडे बिनदिक्कत दुर्लक्ष केले जाते. संमतीपत्र घेतल्यानंतर तर संस्थाचालक किंवा शिक्षक आपली जबाबदारी संपली अशा थाटात वावरतात. सहलीचे नियोजन करताना तेथील हवामानाचा अंदाज, भरती-ओहोटीच्या वेळा, संभाव्य धोक्यांची माहिती आणि आणीबाणीच्या प्रसंगी वैद्यकीय मदतीची उपलब्धता याविषयी कोणताही ठोस अभ्यास केला जात नाही. याबाबत प्रशासनाने संबंधितांना सवाल विचारलेच पाहिजेत. शासनाने शैक्षणिक सहलींसाठी वेळोवेळी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार धोकादायक जलस्रोताजवळ, खोल समुद्रात किंवा दऱ्याखोऱ्यांच्या टोकावर विद्यार्थ्यांना नेण्यास सक्त मनाई आहे.

सहलीसोबत प्रशिक्षित प्रथमोपचारतज्ज्ञ, पुरेसे शिक्षक आणि काळजीवाहू कर्मचारी असणे आणि प्रत्येक हालचालीवर कडक नजर ठेवणे बंधनकारक आहे; परंतु नियमांची पूर्तता केली जाते का, हे तपासण्याची कोणतीही सक्षम यंत्रणा शिक्षण विभागाकडे नाही. दिवेआगरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती भविष्यात होऊ द्यायची नसेल, तर अशा निष्काळजीपणासाठी संस्थाचालकांवर आणि आयोजकांवर गुन्हे दाखल होऊन शिक्षा होणे गरजेचे आहे. किनारपट्टीवरील सुरक्षेबाबतही युद्धपातळीवर काम होणे गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निसर्गाची पूजा करणारी आपली संस्कृती आहे. कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. दर्याला शांत करण्यासाठी आणि नवीन वर्षात भरपूर मासळी मिळावी म्हणून तसेच समुद्रात जाताना कोणताही अनपेक्षित धोका, वादळ किंवा लाटांचे संकट ओढवू नये म्हणून मच्छिमार देवाला साकडे घालतात. यामागची भावना आणि हेतू समुद्रस्थळी पर्यटनाला जाताना लक्षात ठेवल्यास अनर्थ टळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news