

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही गेले, तरी आपल्या देशात ट्रॅफिक समस्या नाही असे शहर, गाव सापडणार नाही. वाटेल त्या पद्धतीने, वाटेल त्या दिशेने लोक वाहने चालवत असतात आणि एकमेकांना धडकत असतात. अपघातांचे प्रमाण पाहिले, तर असे लक्षात येईल की, कुणाची तरी एकाची चूक निश्चितच असते. पहाटेच्या वेळी ड्रायव्हरची डुलकी लागते आणि अपघात होतो. भरधाव वेगाने येणारा एखादा ट्रक एखाद्या कारवर आदळतो आणि अपघात होतो. रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा असतो आणि तो न दिसल्यामुळे दुचाकीस्वार त्यावर जाऊन धडकतात. सध्या साखर कारखाने सुरू असल्याने उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जास्तीचा ऊस भरल्यामुळे ती ट्रॉली कलंडते आणि बाजूने जाणार्याचा चेंदामेंदा होतो. अशी अत्यंत विस्कळीत वाहतूक व्यवस्था असताना जगद्विख्यात टेस्ला कंपनी आपल्या देशात प्रवेश करत आहे. यामुळे आम्ही काळजीत पडलो आहोत. काळजी वाटण्याचे कारण म्हणजे, या टेस्ला गाडीला ड्रायव्हरच नाही. पूर्णतः सेन्सरवर चालणारी ही गाडी एलॉन मस्क नावाचे उद्योगपती आता भारतात घेऊन येत आहेत.
गाडीला ड्रायव्हर असूनही इतके अपघात होतात, तर ड्रायव्हर नसताना काय होईल, या भीतीनेच अंगावर काटा येत आहे. विनाड्रायव्हरची ही गाडी समोरून किंवा बाजूने येणारी-जाणारी वाहने आधीच ओळखून त्याप्रमाणे कृती करणार आहे. समोरून एखादे वाहन येत असेल, तर गाडीचा ब—ेक लागेल आणि धडक होऊ शकणार नाही. आपल्या देशामध्ये वाहन चालवताना वाहनचालकाला समोरील गाड्यांचा आणि इतर वाहतुकीचा अंदाज घेऊनच गाडी चालवावी लागते. येणार्या गाडीला ओळखले, तरी समोर येणार्या गाडीने टेस्लाला ओळखले पाहिजे, हे फार महत्त्वाचे आहे. विनाड्रायव्हरची गाडी जागेवर थांबेल; पण समोरून येणारा धडकेल त्याचे काय करायचे, हा प्रश्नच आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये वाहतूक अत्यंत शिस्तीची असते. अमेरिकेतील एका ड्रायव्हरला विचारले की, तुमच्याकडे गाडी कशी चालवतात? तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘उजव्या बाजूने चालवतात.’ भारतीय ड्रायव्हरला विचारले की, ‘तुमच्याकडे गाडी कशी चालवतात?’ त्याचे उत्तर होते, ‘जशी जमेल तशी.’
वनवे रस्त्यावर एकाच बाजूने गाड्या जाणे अपेक्षित असते. भारत हा एकमेव असा देश आहे की, वनवेवर तुम्ही रस्ता क्रॉस करताना तुम्हाला दोन्ही दिशेने बघावे लागते. कारण, वाट्टेल तशी गाडी चालवणे हा भारतीय नागरिकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. टेस्लाची चालकविरहित गाडी आली आणि त्याच्या सेन्सरने वर्षभर गाडी चालवली, तर त्याही गाडीला भारतीय रहदारीचे गुण लागण्याची शक्यता आहे. भारतीय रस्त्यांवर दोन-तीन वर्षे चालक विरहित गाडी फिरली, तर तिही आपल्या रहदारीच्या नियमांना फाट्यावर मारून जशी जमेल तशी गाडी चालवायला सुरू करेल की काय, याची शंका वाटते. मग, आता भारताच्या रस्त्यांवर विनाचालकशिवाय सर्व गाड्या धावू लागल्या, तरी रस्त्यावरून जाणार्यांनी जीव मुठीतच घेऊन चालावे लागणार आहे. कारण, ही गाडी कधी अंगावर येऊन धडकेल, याची शाश्वती नसणार आहे. भारतातील रस्त्यांचा विचार करता बहुंताश ठिकाणी खड्डेच खड्डे पडलेले दिसत असतात. त्यामुळे विनाचालक गाडी धावण्यासाठी रस्ते चकचकीत करावे लागतील.
कलंदर