Goa tourism: गोव्यात पर्यटकांचा नंगानाच

सध्या गोव्यात एका रशियन पर्यटकाने दोन रशियन महिलांचा खून केल्याची कबुली दिल्याने खळबळ माजली आहे
Goa tourism
Goa tourism: गोव्यात पर्यटकांचा नंगानाचFile Photo
Published on
Updated on
मयुरेश वाटवे

शांत, सुशेगाद गोवा अलीकडे पर्यटकांच्या उपद्रवाने त्रस्त आहे. दोन महिलांचा रशियन पर्यटकाकडून झालेला खून ही ताजी घटना आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देताना येथील जनतेलाही शांतपणे जगण्याचा हक्क आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सध्या गोव्यात एका रशियन पर्यटकाने दोन रशियन महिलांचा खून केल्याची कबुली दिल्याने खळबळ माजली आहे. एका आसामी महिलेचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता. त्याची नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती; मात्र त्या महिलेचा खून त्यानेच केल्याचे तो सांगत आहे. शांतताप्रेमी गोवेकरांना किनारपट्टी भागात जगणे मुश्कील झाले आहे. देशी-विदेशी पर्यटक या भागात मोठ्या प्रमाणात भाड्याने घरे घेत आहेत. या घरांचे भाडे फक्त त्यांनाच परवडू शकते अशी स्थिती आहे; मात्र त्यांचा उपद्रव स्थानिकांना होत असतो. काही दिवसांपूर्वी उत्तर गोव्यातील याच भागात एका महिलेच्या अंगावर एकाने गाडी घातली होती. कुत्र्यावरून त्याच्याशी वाद घातल्याचे निमित्त झाले होते.

गोव्यात बेकायदा वास्तव्य करून राहणाऱ्या सरासरी पाच विदेशी नागरिकांची दरमहा हकालपट्टी होत असल्याचे विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरातून उघड झाले आहे. हा संशयित रशियन पर्यटकही एकाच भागात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होता; मात्र त्याचे शेवटचे वास्तव्य कुठे होते हे अद्याप निश्चित झालेले नाही.

निळे समुद्र, मोकळे किनारे, शांत जीवनशैली आणि सुसंस्कृत समाज ही गोव्याची प्रतिमा झपाट्याने बदलत चालली आहे. पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेला बेजबाबदार, बेशिस्त आणि कधी कधी गुन्हेगारी स्वरूप धारण करणारा उपद्रव आता गोव्याच्या सामाजिक सुरक्षिततेस आणि शांतताप्रिय संस्कृतीस थेट आव्हान देऊ लागला आहे. मद्यपान, अमली पदार्थांचा वापर, मध्यरात्रीपर्यंत गोंगाट आणि कायद्याची भीती नसलेली वागणूक यामुळे सामाजिक तणाव वाढत आहे. काही किनारपट्टी भागांत कायदा आणि सुव्यवस्था ही संकल्पनाच दुय्यम ठरल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पोलीस यंत्रणेमुळे कठोर कारवाईला मर्यादा येतात.

अलीकडे गोवा विधानसभेत उत्तर गोव्यातील हरमल येथे आयोजित होणाऱ्या ‌‘ख्रिसमस कामसूत्र‌’सारख्या कार्यक्रमाला विरोध झाला होता. ख्रिसमस आणि कामसूत्र यांचा काहीही संबंध नसताना अशा स्वरूपाचे कार्यक्रम राजरोस कसे आयोजित केले जातात आणि त्यातून काही समूहांच्या भावना अकारण दुखावल्या जात असल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. हा प्रश्न केवळ धार्मिक भावनांचा नसून, गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली कोणत्या प्रकारच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात आहे, याचाही आहे.

पर्यटन म्हणजे केवळ उच्छृंखल स्वातंत्र्य नव्हे. स्थानिक संस्कृतीचा आदरही झाला पाहिजे. काही वर्षांपूर्वी गोव्यात नायजेरियन नागरिकांनी महामार्ग रोखून धरल्याची घटना घडली होती. त्यावेळी परिस्थिती आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. ही घटना अजून विस्मृतीत गेलेली नसताना आज पुन्हा विदेशी नागरिकांच्या बेकायदा वास्तव्याचा आणि गुन्हेगारी कृत्यांचा प्रश्न ऐरणीवर येणे हा प्रशासनासाठी इशाराच आहे. आता अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक झाले आहे. आज अनेक गोवेकर आपल्या गावांमध्ये परके असल्यासारखे वावरत आहेत. स्थानिक सण, परंपरा आणि साधी जीवनशैली यांना दुय्यम स्थान मिळत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता दीर्घकालीन धोरण आखणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम विदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत कठोर नोंदणी व्यवस्था लागू करणे गरजेचे आहे. भाड्याने घरे देणाऱ्या मालकांनी संबंधित व्यक्तींची संपूर्ण माहिती पोलिस ठाण्यात देण्याचे बंधन आहेच; मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. पर्यटन व्हिसावर येऊन दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्यांवर नियमित तपासणी आणि कारवाई झाली पाहिजे. किनारपट्टी भागांत स्वतंत्र पोलीस पथके, सीसीटीव्ही यंत्रणा आणि गस्त वाढवणे आवश्यक आहे. स्थानिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन तत्काळ कारवाई व्हायला हवी. गोवा पर्यटन स्थळ असले, तरी ते लाखो लोकांचे घर आहे, ही जाणीव शासन, प्रशासन आणि पर्यटन उद्योगातील घटकांनी ठेवणे अत्यावश्यक आहे. आज कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर गोव्याची शांत, सुरक्षित आणि सुसंस्कृत ओळख कायमची धूसर होण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news