दहशतवादाविरोधात एकजुटीने लढण्याची वेळ

दहशतवाद हा माणुसकीवरचे एक मोठे संकट
time-to-unite-against-terrorism
दहशतवादाविरोधात एकजुटीने लढण्याची वेळPudhari File Photo
Published on
Updated on
राजनाथ सिंह

दहशतवाद हा माणुसकीवरचे एक मोठे संकट आहे. एका सुसंस्कृत समाजाने जपलेल्या मूल्यांविरोधातील तो एक मोठा धोका आहे. खरे तर, दहशतवाद हा क्रांती, बलिदान आणि हिंसाचाराच्या चुकीच्या रोमांचक कल्पनांवर पोसला गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, एकासाठी स्वातंत्र्यसैनिक असलेली व्यक्ती दुसर्‍यासाठी दहशतवादी असते हे विधानाच मुळात चुकीचे आणि धोकादायक आहे. खरे स्वातंत्र्य कधीही दहशत आणि रक्तपाताच्या आधारावर उभारले जाऊ शकत नाही.

दहशतवाद आणि दहशतवाद्यांचे मुख्य हत्यार म्हणजे दहशत. अर्थात, दहशत पसरवण्याचे अथक प्रयत्न करूनही ते समाजात निराशावादी वा पराभूत मानसिकता निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत, हेच वास्तव आहे आणि भारत याच वास्तवाचा पुरावा असल्याचे निश्चितच म्हणावे लागले. अगदी 26/11 चा दहशतवादी हल्ला असो किंवा 2001 चा भारताच्या संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला असो अथवा अलीकडेच पहलगाममध्ये केलेला हल्ला असो, भारत या पूर्वी कधी नव्हता इतका ताठ मानेने, अधिक ताकदीने आणि अधिक द़ृढनिश्चयीपणे उभा राहिला आहे.

खरे तर, विकृत विचारधारेच्या स्वरूपातील दहशतवाद असो वा कारस्थानी उद्दिष्टांच्या स्वरूपातील असो, एकसंध भारतासमोर तो कायमच अपयशीच ठरणार, हेच त्याचे प्रारब्ध आहे. दहशतवादी कृतींचे अवघ्या एका दिवसाचे अस्तित्वही सामूहिक सद्सद्विवेकबुद्धी आणि शांततेच्या वचनबद्धतेला आव्हान देणारी असते, हे आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यामुळेच सर्व शांतताप्रिय देश आणि व्यक्तींनी या धोक्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

भारताने प्रत्यक्ष कृतीतून दहशतवादाविरोधातील लढ्याचा मार्ग जगाला दाखवला आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारत सीमेपलीकडून पाकिस्तानमधून होत असलेल्या सरकार पुरस्कृत दहशतवादाचा बळी ठरला आहे. अलीकडेच पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा भारताच्या एकसंधतेला तडा देण्याचा आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा एक क्रूर आणि अयशस्वी प्रयत्न होता. दहशतवाद्यांनी लोकांची हत्या करण्याआधी ज्या तर्‍हेने पर्यटकांच्या धर्माविषयी चौकशी केली, त्यांच्या अशा कृतीतूनच या हल्ल्याच्या क्रूरतेची साक्ष पटते. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन आणि बॉम्बगोळ्यांचा वापर करून भारतातल्या विविध धर्मांच्या धार्मिक स्थळांवरही हल्ला केला. त्यांचा हा हल्ला म्हणजे, भारताच्या एकसंधतेला तडा देण्याचाच आणखी एक प्रयत्न होता. कोणताही धर्म अशा घृणास्पद कृत्यांना मान्यता देऊच शकत नाही. दहशतवादी क्रौर्याचे दर्शन घडवणारी कृत्ये योग्य ठरवण्यासाठी अगदी हेतुपुरस्सर धर्माचा गैरवापर करतात. धर्माच्या बुरख्याआड लपून दहशतवादी ज्या श्रद्धेचा दावा करतात आणि आपण धर्मपालन करत असल्याचे ढोंग रचतात, खरे तर ते या भावनेचीच क्रूर चेष्टा करत असतात. धर्माचा हा गैरवापर आकस्मिक किंवा उत्स्फूर्त नाही, तर ते हेतुपुरस्सर रचलेले एक कारस्थानच आहे. आपल्या क्रूर कृत्यांना फसवी वैधता देण्यासाठी अगदी काळजीपूर्वक तयार केलेली रणनीतीच आहे.

दहशतवादाबाबत आपण शून्य सहिष्णूतेचेच धोरण राबवणार असल्याची बाब भारताने स्पष्ट केलीच आहे. चर्चा आणि दहशतवाद एकत्र जाऊच शकत नाहीत आणि त्यामुळेच पाकिस्तानसोबत भविष्यात होणार असलेला कोणताही संवाद वा चर्चा ही केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच केंद्रित असेल. दुसरीकडे पाकिस्तान या गोष्टींना खरोखरच गांभीर्याने घेत असेल, तर त्यांनी न्यायाची सुनिश्चिती व्हावी, या उद्देशाने हाफिज सईद आणि मसूद अझहर यांच्यासारख्या संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या दहशतवाद्यांना न्यायासाठी भारताच्या ताब्यात द्यायला हवे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत दहशतवादी कृत्यांविरोधात प्रतिक्रिया देत आला आणि त्याचवेळी दहशतवादाविरोधात बाळगायचा दीर्घकालीन द़ृष्टिकोन आणि रणनीती काय असू शकते, याचा शोध घेत आला आहे. भारताच्या सशस्त्र दलांना यापूर्वी केवळ बचावात्मक कारवाई करण्याचीच परवानगी होती; मात्र अलीकडच्या काळात सर्जिकल स्ट्राईक्स (2016), बालाकोट स्ट्राईक (2019) आणि आता ऑपरेशन सिंदूर (2025) यांसारख्या कारवायांच्या माध्यमातून भारताने दहशतवादी आणि पाकिस्तानमधील त्यांच्या जनकाप्रती आपल्या धोरणात मूलभूत बदल केला आहे. आता भारतालाही जाणीव झाली आहे की, केवळ नैतिक आणि राजनैतिक विरोध, तसेच बचावात्मक पवित्रा पुरेसा नाही. त्यामुळेच आता दहशतवादी कुठेही लपून बसले असले, तरी त्यांचा कृतिशील पद्धतीने खात्मा करणे हेच आमचे धोरण बनले आहे. आता दहशतवादाची कोणतीही कृती ही युद्धाचे कृत्य असल्याचेच मानले जाईल. आता जर का भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर दहशतवादाला प्रोत्साहन देणारे सरकार आणि दहशतवादी यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही आणि त्यांना चोख प्रत्युत्तरही दिले जाईल. पाकिस्तान आपल्या भूमीवरून कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांना आवर घालण्यास असमर्थ ठरला, तर पाकिस्तानलाही आपल्या या असमर्थतेची किंमत चुकवावीच लागेल.

दिल्ली येथे ‘नो मनी फॉर टेरर’ ही दहशतवाद विरोधातील वित्तपुरवठ्याशी संबंधित मंत्रीस्तरीय परिषद झाली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे भारताची भूमिका मांडली. एक जरी हल्ला झाला, तरी तो अनेक हल्ल्यांसारखाच असतो आणि एक जरी जीव गमावला, तरी ते अनेकांचा जीव गेल्याप्रमाणेच असते हीच आपली धारणा आहे आणि त्यामुळेच आता भारत दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली होती. आताही भारत दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे, हेच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारत सरकारने आणि भारताच्या सशस्त्र दलांनी जगाला दाखवून दिले.

आता आम्हाला याची पूर्ण जाणीव झाली आहे की, दहशतवाद्यांविरोधात लष्करी कारवाई गरजेची आहे; पण ती पुरेशी मात्र नाही. दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधाच पूर्णतः नष्ट करणे अत्यावश्यक आहे. दुसरीकडे पाकिस्तान दहशतवादाचा एक हत्यार म्हणून वापर करत आला आहे आणि त्यामुळेच भारताने पाकिस्तानला राजनैतिक आणि आर्थिकद़ृष्ट्या यशस्वीपणे एकटे पाडले आहे. त्या अनुषंगानेच पाकिस्तानने सीमेपलीकडून होत असलेल्या दहशतवादाला दिले जात असलेले पाठबळ थांबवत असल्याचे विश्वासार्हपणे दिसून येत नाही आणि असे पाठबळ देण्याचे धोरण पाकिस्तान कायमचे सोडून देत नाही तोपर्यंत भारताने सिंधू जल करारच स्थगित केला आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानवरही महत्त्वाचे परिणाम होणारच आहेत. कारण, पाकिस्तान आपली 80 टक्के कृषी जमीन (16 दशलक्ष हेक्टर) आणि एकूण पाणी वापरापैकी 93 टक्के पाण्यासाठी सिंधू नदीच्या व्यवस्थेवरच अवलंबून आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही व्यवस्था 237 दशलक्ष लोकांचा आधार आहे. इतकेच नाही, तर पाकिस्तानच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील एक चतुर्थांश योगदान या व्यवस्थेमुळेच होत असते, हे पाकिस्ताने स्वतः लक्षात घेतले पाहिजे. खरे तर, दहशतवाद ही काही केवळ भारताची समस्या नाही, तर ती एक जागतिक समस्या आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news