

शिवरायांच्या अनेक साहसी मोहिमांपैकीच एक आरमारी मोहीम म्हणजे बसरूरची लढाई. या लढाईत शिवरायांची मुत्सद्देगिरी आणि त्याचबरोबर उच्च कोटीची नैतिकताही दिसून येते. शिवजयंतीनिमित्त विशेष लेख.
शिव छत्रपतींच्या अनेक साहसी, विलक्षण, रोमांचकारी लढायांपैकीच एक महत्त्वाची म्हणजे बसरूरची लढाई. राजांनी फेब्रुवारी 1665 मध्ये स्वतःच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील बसरूर बंदरावर केलेली आरमारी मोहीम ही मराठा नौदलाच्या इतिहासातील पहिली आणि अत्यंत यशस्वी सागरी मोहीम होय. पोर्तुगीजांना चाप लावण्यासाठी, कारवारच्या दक्षिणेकडील या श्रीमंत बंदरावर अचानक हल्ला करून महाराजांनी प्रचंड संपत्ती लुटली व मराठ्यांचे आरमारी सामर्थ्य सिद्ध केलं. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील बसरूर येथील पोर्तुगीजांची सत्ता आणि त्यांनी केलेली लूट मोडून काढण्यासाठी ही मोहीम आखली गेली. या मोहिमेत महाराजांनी अफाट संपत्ती मिळवली आणि शत्रूला अनपेक्षित आजची संकल्पना वापरायची तर ‘सर्जिकल स्ट्राईक’ने नामोहरम केलं. बसरूर बंदरावर पोर्तुगीजांनी अवैध कब्जा करून स्थानिक जनतेची लूट केली होती. तसेच, सुरतसारखं समृद्ध बंदर व्यापारासाठी महत्त्वाचं होतं. 1664 मध्ये बेदनूरचा शासनकर्ता भद्राप्पा नाईक यांचा मृत्यू झाल्यामुळं अराजक मानले होतं. तेव्हा माजलेल्या पोर्तुगीजांचा बीमोड करणं आवश्यक होतं.
मालवणच्या सागरी किल्ल्याची उभारणी सुरू होती. कर्नाटकातील भटकळच्या दक्षिणेस असलेल्या बसरूर बंदरावर चालून जाण्याचा मनसुबा मनी धरून शिवाजीराजांनी तयारी केली. तीन मोठी गलबतं, 85 जहाजं आणि लहान तरांडी घेऊन राजांनी मोहीम सुरू केली. तलवारी, भाले, बरच्या अशा शस्त्रांसह पुरेसे तोफगोळे आणि तोफा घेऊन, बलदंड घोडे आदी युद्धसाहित्य गलबतांवर चढवण्यात आलं. छोट्या जहाजांवर सैनिकांना चढवण्यात आलं. दहा हजार सैन्य होतं. स्वारीची जय्यत तयारी करण्यात आली. सरदार दोरोजी फाकडे आणि मायनाक भंडारी हे जातीनं लक्ष घालून सैन्याची जुळणी करत होते.
शिवाजीराजांनी काटेकोर नियोजन केलं होतं. त्या काळात बार्देश गोवा या पोर्तुगीज ठाण्यावर सैन्य खूप कमी होतं. राजांनी अत्यंत धूर्तपणे ही मोहीम आखली होती. राजांच्या गुप्तहेरांनी आणलेली खबर पक्की होती. पोर्तुगालचा सम्राट चौथा जॉन याची कन्या लेडी कॅथरीन हिचा विवाह 21 मार्च 1662 या दिवशी इंग्लंडच्या दुसरा चार्ल्स याच्याशी झाला होता. पोर्तुगीज सम्राटानं आपल्या ताब्यातील मुंबई हे महत्त्वाचं आणि समृद्ध बेट आपला जावई इंग्लंडचा राजपुत्र चार्ल्स द्वितीय याला आंदण म्हणून द्यायचं जाहीर केलं होतं. तो सोहळा 8 फेब्रुवारी 1665 या दिवशी मुंबईत व्हायचा होता. त्यासाठी सारी पोर्तुगीज सेना गोव्यातून समुद्रमार्गे मुंबईला गेली होती. गोव्यात अगदी तुरळक सैन्य उरलं होतं. शिवाजीराजांनी वर्षभरापूर्वीच ही खबर काढली होती. म्हणूनच गोवा जिंकून पोर्तुगीजांच्या ताब्यातून सोडवायचा आणि गोव्यातील पोर्तुगीजांची सगळी ठाणी जिंकून त्यांना पोर्तुगालला हाकलण्याचा निर्धारच राजांनी केला होता.
शिवाजीराजांनी इशारा देताच ही आरमारी मोहीम सुरू झाली. जाताना एका बेटाजवळ राजांनी सारा ताफा थांबवला. जहाजावरून शंभर घोडी आणि स्वारांना बेटावर उतरवलं. स्वत: नेताजी पालकर आणि मुरारबाजी देशपांडे या कसलेल्या सेनानींना उतरवलं. फिरंग्यांच्या ठाण्यांवरची सगळी खबरबात काढून आणण्यासाठी हे सारेजण चपळ, तगडे घोडे दौडवत रवाना झाले. नेताजी आणि मुरारबाजींनी ठरवल्यानुसार दुसर्या दिवशी रात्री सारं घोडदळ दौडत परत आलं. नेताजींनी राजांना सांगितलं, ‘राजे, उद्या पहाटेला पोर्तुगीजांच्या सर्व ठाण्यांवर भगवा फडकेल, इतकी त्यांची फौज कमी आहे. पण, त्यांचा बारुदखाना आणि दारूगोळा अफाट आहे. असंख्य तोफा आणि कसलेले गोलंदाज सज्ज आहेत. आपल्या सैन्याची प्रचंड हानी होईल. दहा हजारांपैकी दोनेक हजार सैनिक कसेबसे वाचतील. आठ हजारांना प्राणाहुती द्यावी लागेल.’
आपल्या मस्तकावर वीज कोसळते की काय असा आघात राजांवर झाला. ते म्हणाले, ‘नेतोकाका, मी शिवाजी आहे, कुणी बादशहा नव्हे. माझ्या लाडक्या सैनिकांचा बळी देऊन तिन्ही लोकांचं सम्राटपदही मला नको. बादशहाचं सैन्य हे पगारासाठी लढतं आणि माझं सैन्य हे स्वराज्यप्राप्तीच्या ध्येयासाठी लढतं. म्हणून माझा प्रत्येक सैनिक मला प्राणाहून प्रिय आहे...’ महाराजांनी आपला ताफा बार्देश गोव्याकडे नेण्याऐवजी इक्केरीकडे वळवला. अंकोला, होनावर, भटकळ या बाजूनं बसरूरच्या दिशेनं राजे पुढे निघाले. कारवार मागे पडलं. पुढे कुंदापूरचा किल्ला आणि त्याच्या बाजूला बसरूरचा जलदुर्ग उभा होता. शिवाजीराजे येत असल्याची वार्ता समजल्यानंतर त्या समृद्ध सुवर्णनगरांमधली प्रजा आनंदली. तिथला राजा सोमशेखर आपल्या प्रजेला भेटू शकत नव्हता, आपल्याच राज्यात फिरू शकत नव्हता. इक्केरीच्या प्रजेनं शिवरायांचं स्वागत केलं.
बसरूरच्या जवळून वाहणार्या वराही नदीतून फिरंग्यांचं एक जहाज पुढे चाललं होतं. इक्केरीमधील तरण्याबांड सुंदर स्त्रियांना बंदिवान करून फिरंगी दलालांनी पोर्तुगालला पळवून न्यायचा कट केला होता. तेच हे जहाज होतं. राजांनी तरांडी आणि छोट्या नावांमधून सशस्त्र सैनिकांच्या पलटणी सागरातून धाडल्या. सैनिकांनी फिरंगी जहाजाला वेढा घातला. ‘हर हर महादेव’ हा घोष करत मावळ्यांनी पोर्तुगीज दलालांना कंठस्नान घातलं. सर्व लेकीबाळींची सुटका केली. दुसर्या योजनेप्रमाणे मावळे तरांड्यांमधून बसरूरच्या भूमीवर उतरले. हलक्या तोफा नेण्यात आल्या. पहाट होण्यापूर्वीच पोर्तुगीज सैनिकांवर हल्ला चढवला. बेसावध सैनिकांना कैद केलं. जे लढले, त्यांना यमसदनी पाठवलं. कमी वेळेची, पण जोरदार लढाई झाली. शिवाजी राजांनी बसरूरच्या पोर्तुगीजांच्या ठाण्यावर कब्जा मिळवला. पोर्तुगीजांनी निरपराध प्रजेच्या गुलामगिरीसाठी बनवलेले लाकडी पिंजरे राजांनी मोडून काढून प्रजेची सुटका केली. बावीस वर्षे वयाचा राजा सोमशेखर आपल्या रूपसुंदर चेन्नम्मा राणीला घेऊन शिवरायांच्या दर्शनाला आला. राजांनी त्याचं राज्य त्याच्या हाती सोपवलं. त्याच्या संपत्तीपैकी एका कवडीलाही राजांनी हात लावला नाही. शिवरायांच्या मनोरंजनासाठी सोमशेखरनं कलावती नामक सौंदर्यवान कलावंतिणीचं नृत्य आयोजित केलं होतं. शिवरायांनी या नृत्यगायनाच्या सोहळ्याला उपस्थित राहायला ठामपणे नकार दिला. इतकेच नव्हे, तर सोमशेखर राजाच्या खांद्यावर हात ठेवून राजे म्हणाले, ‘सोमशेखर, आपली राणी चेन्नम्मा या रूपवती आहेत, गुणवती आहेत. त्यांना नीट सांभाळा. रंगाढंगाच्या नादात किती वाहवत जायचं आणि आपल्या राजगादीचं पावित्र्य किती जपायचं, याचा गांभीर्यानं विचार करा.’ पोर्तुगीजांनी लुटलेला दोन कोटी होनांचा खजिना आणि पोर्तुगीज बनावटीच्या उत्कृष्ट बारा तोफा हा ऐवज घेऊन स्वराज्य निर्मितीच्या पुढील कार्यासाठी मावळ्यांसह शिवाजीराजे रवाना झाले.