Elon Musk
Elon Musk | डिजिटल वसाहतवादाचा धोका

Elon Musk | डिजिटल वसाहतवादाचा धोका

Published on

तानाजी खोत

स्वित्झर्लंडमधील दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत इलॉन मस्क यांनी केलेल्या विधानाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, मस्क यांच्या मते, चालू वर्षाच्या अखेरपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोणत्याही एका हुशार मानवाच्या बुद्धिमत्तेला मागे टाकेल. इतकेच नव्हे, तर पुढील पाच वर्षांत एआय हे संपूर्ण मानवजातीच्या एकत्रित बुद्धिमत्तेपेक्षाही अधिक शक्तिशाली होईल.

मस्क यांनी टेस्ला ऑप्टिमससारख्या ह्युमनॉईड रोबोटस्च्या आगमनाचीही घोषणा केली. त्यांच्या मते, हे मानवी शरीररचना असलेले रोबोटस् लवकरच प्रत्यक्ष कामात दिसू लागतील आणि मानवी श्रम ही केवळ एक ‘निवड’ उरेल, ती गरज राहणार नाही. मस्क यांच्या विधानाला पुष्टी देणारी आकडेवारी आज जागतिक बाजारपेठेत दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा गुरुत्व मध्य ‘तेला’कडून ‘डेटा’कडे सरकला आहे. एआय चालवण्यासाठी लागणार्‍या चिप्स तयार करणार्‍या ‘एनवीडिया’ या कंपनीने 4 ट्रिलियन डॉलर्सच्या मूल्याचा टप्पा गाठला. मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि अ‍ॅमेझॉनसारख्या दिग्गज कंपन्या आज आपली सर्व शक्ती एआयच्या संशोधनात ओतत आहेत. कारण ज्या कंपन्यांकडे हे तंत्रज्ञान असेल, त्या भविष्यातील जगाच्या खर्‍या ‘सत्ताधीश’ असतील. हे नव्या जगाचे वास्तव आहे.

जगात सध्या अण्वस्त्रे आणि शस्त्रास्त्र स्पर्धेपेक्षाही ‘कॉम्प्युटिंग पॉवर’ची स्पर्धा सुरू आहे. आता राष्ट्रांमधील स्पर्धा सीमारेषेवरून नसून ‘एआय चिप्स’वर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील सध्याचा संघर्ष हा प्रगत सेमीकंडक्टर चिप्ससाठी आहे. ज्या देशाकडे सर्वात प्रगत एआय असेल, तो देश सायबर सुरक्षा, अंतराळ संशोधन आणि युद्धतंत्रात अजिंक्य ठरेल, हे आजच्या काळातले सत्य झाले आहे. प्रगत एआय तंत्रज्ञान मोजक्याच कंपन्या किंवा देशांकडे राहिल्यास जगामध्ये एक प्रकारचा ‘डिजिटल वसाहतवाद’ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मस्क यांनी म्हटल्याप्रमाणे जर एआय मानवी बुद्धीला मागे टाकणार असेल, तर आपले दैनंदिन जीवन कसे असेल? वैद्यकीय निदानापासून ते आर्थिक गुंतवणुकीपर्यंतचे सर्व महत्त्वाचे निर्णय एआय घेईल. मानवाची भूमिका केवळ त्या निर्णयांवर देखरेख ठेवण्यापुरती मर्यादित राहील. ह्युमनॉईड रोबोटस् जर कारखान्यात आणि घरात काम करू लागले, तर रोजगाराच्या पारंपरिक व्याख्या बदलतील.

जागतिक विचारवंत युवाल नोवा हरारे यांच्या मते फार मोठा युजलेस क्लास तयार होईल. यामुळे निर्माण होणारी सामाजिक विषमता रोखण्यासाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कमसारख्या धोरणांचा विचार जगाला करावाच लागेल. मस्क यांनी दावोसमध्ये केलेले विधान मानवजातीसाठी एका क्रांतीची चाहुल आहे. बुद्धिमत्ता आता केवळ जैविक राहिलेली नाही, ती डिजिटल स्वरूपात आपल्यासमोर उभी आहे. तंत्रज्ञानाच्या या अफाट वेगाला मानवी मूल्यांची आणि नैतिकतेची जोड कशी द्यायची, हेच या शतकातील सर्वात मोठे आव्हान असेल. मस्क यांचे विधान खरे ठरले, तर आपण एका अशा जगात असू, जिथे विचार करणे हे केवळ मानवाचे काम उरणार नाही. पण त्यामुळे मानवी समूहासमोरील सर्व प्रश्न सुटणार नाहीत तर त्यावेळी मानवासमोर आणखी नवी आव्हाने असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news