political miracles elections | चमत्कारांचे दिवस
मित्रा, नुकत्याच नगरपरिषदांच्या निवडणुका होऊन गेल्या. या निवडणुकांच्या बातम्या पाहिल्यानंतर असे लक्षात आले की, ही निवडणूक म्हणजे चमत्कारांची एकप्रकारची जंत्रीच होती. बरोबर आहे, तू म्हणतोस ते. काही ठिकाणी काही नगरसेवक मात्र एका मताने निवडून आले. या ठिकाणी जो पराभूत झाला असेल त्याला किती वाईट वाटत असेल विचार तरी कर. ऑटो पाठवून दोन मतदार अजून आणले असते, तर आपण निवडून आलो असतो. कुठेतरी हलगर्जीपणा झाला आणि एका मताने हरलो, ही खंत त्याला आयुष्यभर राहील.
अरे, हे तर काहीच नाही. काही वॉर्डांमध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. अचूक. सारखे मतदान दोघांनाही मिळाले तर दोघांच्या संमतीने लहान मुलाच्या हाताने ‘ईश्वर चिठ्ठी’ काढली जाते आणि त्या चिठ्ठीत ज्याचे नाव निघेल तो निवडून आला, असे जाहीर केले जाते. बरोबरी गाठल्यानंतर चिठ्ठीमध्ये आपले नाव न निघणे याला नशिबाने हुलकावणी देणे, असे म्हणतात. याचा अर्थ जवळपास विजय निश्चित झाला होता; परंतु नशिबात नव्हता, असा काहीतरी प्रकार होत असतो.
हे बघ मित्रा, या निवडणुकीतला सगळ्यात मोठा चमत्कार कोकणात झाला आहे. पक्षांतरबंदी किंवा आपण वाटेल ते म्हणत असू. परंतु, घडलेला प्रकार मात्र आश्चर्यचकित करणारा आहे. एका पक्षाची दोन शकले झाली तरी त्यांची एकमेकांशी मैत्री असतेच. एक नगराध्यक्ष या दोनपैकी एका पक्षाकडून उभे होते आणि ते निवडून आले. अर्थात, विरोधात असलेल्या दुसर्या भाऊबंदकी पक्षाने अर्थात त्यांना भरपूर मदत केली होती. आपण कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवली याचा विसर निवडून आल्याबरोबर अवघ्या काही तासांत विजयी उमेदवाराला पडला आणि ते तत्काळ दुसर्या पक्षात सामील होण्यासाठी निघाले. अवघ्या काही तासांत होणारे हे पक्षांतर मतदारांना आणि इतर राजकारणी लोकांना तोंडात बोटे घालायला लावणारे आहे एवढे निश्चित.
अरे, हे तर काहीच नाही. खरे चमत्कार तर पुढेच आहेत. महिनाभरात विविध महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर अशा मोठ्या शहरांच्या निवडणुकांमध्ये याहीपेक्षा मोठे चमत्कार मतदारांना आणि जनतेला पाहायला मिळणार आहेत. मनोरंजनाचे दिवस सुरू होत आहेत मित्रा. दररोज पेपर वाचत जा आणि टी.व्ही.वर बातम्या पाहत जा आणि क्षणाक्षणाला मनोरंजन करून घेत जा. शेवटी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मनोरंजन कमी झाले असले तरी राजकारणात मात्र त्याचे प्रमाण वाढत चालले आहे, याविषयी माझ्या मनात तरी काही शंका नाही.

