इस्रायलमधील जनआक्रोश

इस्रायल आणि हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे
Israel Hamas War
इस्रायल आणि हमासमधील संघर्ष
Published on
Updated on

रशिया-युक्रेन युद्ध समाप्त होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच, इस्रायल आणि हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या सहा ओलिसांचे मृतदेह इस्रायलने ताब्यात घेतल्यानंतर, ओलिस तरुणांच्या कुटुंबीयांसह हजारो नागरिकांनी संताप व्यक्त केला. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंविरोधात देशभर निदर्शने सुरू झाली असून, या हत्याकांडाला नेतान्याहू हेच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. युद्धविराम करार झाला असता, तर ओलिसांची सुटका झाली असती, अशी जनभावना आहे. दक्षिण गाझामधील राफा शहरातील एका बोगद्यात ओलिसांचे मृतदेह सापडले. याच ठिकाणाहून मागच्या आठवड्यात एका ओलिसाची जिवंत सुटका केली होती; पण री इस्रायली सैनिक घटनास्थळी पोहोचण्याआधी हमासच्या दहशतवाद्यांनी या ओलिसांची निर्दयपणे हत्या केली. युद्धविरामाच्या वाटाघाटीचे गुर्‍हाळ सुरूच आहे; पण प्रत्यक्षात युद्ध काही थांबायला तयार नाही. या ओलिसांपैकी गोल्डबर्ग हा इस्रायली-अमेरिकी तरुण असून, त्याच्या पालकांनी जागतिक नेत्यांची भेट घेऊन त्याच्या मुक्ततेसाठी दबावही आणला होता. इस्रायलने युद्धविराम प्रस्ताव स्वीकारला असता, तर ओलिस ठेवलेले तरुण आता जिवंत असते, असे हमासने म्हटले आहे.

वास्तविक इस्रायलवर गेल्या वर्षी प्रथम हल्ला चढवला, तो हमासने. हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली, बाँबहल्ले केले आणि अनेक सामान्य नागरिकांचे अपहरणही केले. त्यानंतर इस्रायलने गाझापट्टीत तुफान हल्ले केले. आता ओलिसांच्या हत्येनंतरही इस्रायलने गाझात पुन्हा हल्ले करून 33 पॅलेस्टिनींना ठार मारले आहे. त्यामध्ये पॅलेस्टिनी व हमासच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. इस्रायलला केली जाणारी शस्त्रनिर्यात स्थगित करण्याचा निर्णय बि—टिश सरकारने घेतला आहे; पण त्यांच्या मदतीशिवायही हमासविरुद्धचे युद्ध जिंकू, अशी गर्जना नेतान्याहू यांनी केली आहे.

युनोशिवाय युरोपीय देश, इजिप्त, कतार ही इस्लामी राष्ट्रे आणि अमेरिका यांचे युद्धसमाप्तीसाठी प्रयत्न जारी आहेत; मात्र अद्याप संघर्ष संपण्याची चिन्हे बिलकुल दिसत नाहीत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर जो हल्ला केला होता, त्यात 1200 सामान्य लोकांचा बळी गेला होता. ही घटना घडली, तेव्हा नेतान्याहू यांची देशातील लोकप्रियता घसरणीला लागली होती. न्यायव्यवस्थेवर दडपण आणण्याच्या त्यांच्या धोरणामुळे केवळ विरोधकच नव्हे, तर जनताही नाराजच होती. लोकप्रियतेस लागलेली ओहोटी थांबवण्यासाठी ही संधीच आहे हे जाणून, नेतान्याहू यांनी हमासविरोधात थेट दंड थोपटले. नेतान्याहू यांनी आतापर्यंत हमासच्या अनेक कमांडर्सना ठार मारले आहे. एवढेच नव्हे, तर हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हानिया हा तेहरानच्या दौर्‍यावर असताना, इस्रायलने तेथेच त्याची हत्या घडवून आणली. हानिया ज्या सरकारी अतिथिगृहात मुक्कामाला होता, तेथे इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्डस्चा कडेकोट पहारा असतानाही, इस्रायलने हानियाची बाँबस्फोट करून हत्या घडवून आणली.

विशेष म्हणजे, हानिया इराणच्या नवीन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी तेहरानला गेला होता. यापूर्वीच, हमासचा खात्मा केल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा नेतान्याहू यांनी केली आहे. त्यांच्या सरकारमधील समर्थकही त्यांच्याप्रमाणेच अतिजहाल विचारांचे असून, गाझापट्टीचा कायमचा कब्जा मिळेपर्यंत आता थांबू नये, असा या सर्वांचा आग्रह आहे. युद्धविराम केला, तर कट्टरतावाद्यांना ते रुचणार नाही आणि सरकार पडून पंतप्रधानपद गमवावे लागेल, अशी भीती नेतान्याहू यांना वाटत आहे. खुद्द नेतान्याहू हेही पॅलेस्टाईनप्रश्नी गेली कित्येक वर्षे आक्रमकतावादी भूमिकाच घेत आले आहेत; पण त्यांनी प्रचंड भ—ष्टाचार केला असून, पंतप्रधानपदासारख्या घटनात्मक पदाचे कवच नसल्यास, उद्या आपल्याला तुरुंगातही जावे लागेल, हे त्यांना पुरते ठाऊक आहे.

नेतान्याहू यांनी शस्त्रसंधी करण्यासाठी पुरेशी सक्रियता दाखवलेली नाही, अशी जाहीर नाराजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही व्यक्त केली आहे. इस्रायलमध्ये तर नेतान्याहू सरकारविरोधात जनतेने सलग तीन दिवस निदर्शने केली असून, देशातील प्रमुख कामगार संघटनेने संप घोषित केला आहे. कोणत्याही परिस्थितीत इस्रायलच्या सर्व ओलिसांची मुक्तता करावी, ही त्यांची मागणी आहे. संपामुळे वाहतूक तसेच वैद्यकीय सेवा पूर्णतः विस्कळीत झाल्या आहेत. हमासच्या ताब्यात अद्याप 101 ओलिस असून, त्यांची छायाचित्रे असलेली बॅनर्स हातात घेत, सरकारविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. ताब्यातील इस्रायली व्यक्तींची सुटका केली, तर नेतान्याहू गाझावरील हल्ले सुरूच ठेवतील, अशी हमासला शंका आहे.

शिवाय इस्रायलच्या कारागृहात कैदी असलेल्या सर्व पॅलेस्टिनी दहशतवाद्यांची सुटका व्हावी, हीही हमासची मागणी आहे. दोन्ही बाजूंनी तडजोड करावी, अशी अमेरिकेची अपेक्षा असली, तरी उभयपक्षी हट्टाग्रही भूमिका असल्यामुळे युद्ध संपायला तयार नाही. यात भर म्हणून की काय, आता ‘हिजबुल्लाह’ने इस्रायलवर हल्ला चढवला आहे. तर तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इस्रायलविरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. तुम्ही जास्त शहाणपणा केलात, तर तुमची अवस्था इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेनसारखी होईल, असा प्रति इशाराच इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्ज यांनी एर्दोगन यांना दिला आहे.

मध्यंतरी इस्रायलमधील कट्टर ज्यूंनाही अन्य नागरिकांप्रमाणे लष्करी सेवा बजावणे अनिवार्य असेल, असा निकाल तेथील सुप्रीम कोर्टाने दिला होता; पण कट्टर ज्यू विद्यार्थ्यांना असलेली सैन्यात न जाण्याची सवलत कायम राहायला हवी, अशी नेतान्याहू यांच्या आघाडी सरकारला पाठिंबा देणार्‍या जहाल पक्षांची मागणी आहे. नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाचीही हीच धारणा आहे. म्हणजे एकीकडे बाह्या सरसावून हमास वगैरेंना नष्ट करण्याच्या वल्गना करायच्या आणि हे सर्व इतरांनी करायचे, असा या राज्यकर्त्यांचा हा मतलबीपणा आहे. युद्धाची किंमत शेवटी सामान्यांना व सैनिकांना चुकवावी लागते म्हणूनच इस्रायलमध्ये नेतान्याहूंविरोधातील जनआक्रोश प्रकट होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news