Journey of Life | अस्तित्वाचा खरा प्रवास

Journey of Life |
Journey of Life | अस्तित्वाचा खरा प्रवास
Published on
Updated on

डॉ. नगीना माळी

प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची इच्छा असते; मात्र दुसऱ्यांची नक्कल करताना अनेकदा ती स्वतःचे अस्तित्व हरवून बसते. खरे अस्तित्व हे आपल्या विचार, कृती, मूल्ये आणि समाजमान्य वर्तनातून घडत असते.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, ही बाब सर्वपरिचित आहे. आणि त्यात येणारी अत्यंत महत्त्वाची, नेहमी हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे अस्तित्व हे होय. अस्तित्वाचा उलगडा केला तर लक्षात येते की, अस्तित्व हे व्यक्तिपरत्वे बदलत असते. पण अस्तित्व म्हणजे काय याचा अर्थ न समजता पुढे जाणे म्हणजे अज्ञानच. अस्तित्व म्हणजे असे व्यक्तिमत्त्व, जे आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, आचार-विचार-उच्चारातून उमटत असते. अस्तित्वाची सुरुवात, आईने दिलेल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत राहते. दरम्यानच्या काळात ज्या घटना आपल्या आयुष्यात घडतात, त्यांस आपण कसे सामोरे जातो, किती धैर्याने सामना करतो, उभा राहतो, त्याचेच रूप म्हणजे अस्तित्व होय. जन्मापासून मृत्यूपर्यंत राहू दे, पण अगदी समजण्यास सुरुवात झाल्यापासून ते ६०-७५ वर्षांपर्यंत पाहिले तर असे म्हणता येईल की, आपण आपल्या अस्तित्वासाठी झगडतो. ते टिकवण्यास सरसावतो.

पण आपले अस्तित्व नेमके काय आणि कसे आहे, हे न समजून घेता हा झगडा काय कामाचा. इतरांप्रमाणे चांगले राहण्याचा प्रयत्न करीत असाल तर ठीकच. पण त्यांच्याप्रमाणे मला बनायचे आहे, या वाक्यानेच प्रथम अस्तित्वावर घाव बसतो. जगातील प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्र अस्तित्व आहे. ते ना घेता येते, ना देता येते. मग आपला दुसऱ्याप्रमाणे होण्याचा अट्टहास का? आपले आदर्श चांगले असणे यात गैर काहीच नाही. त्यांच्यासारखे, त्यांच्याप्रमाणे बनण्यामध्ये आपण आपल्यात असणाऱ्या क्षमता, कुवत, कौशल्य सोडून त्याच व्यक्तीच्या मागे का धावतो? कदाचित त्या व्यक्तीपेक्षा जास्त तुमच्यात असू शकते. कदाचित कमीही. कमीची भरपाई करता येईल. पण जास्तीचा वापर कसा कराल, याचा विचार अपुरा राहतो.

अस्तित्व समजून घ्यायचे असेल, तर मला काय हवे, काय नको, काय बनायचे आहे, कसे बनायचे आहे, याचा आराखडा तयार हवा आणि समजून घेतलेले अस्तित्व टिकवायचे असेल तर अविरत प्रयत्न हवेत. सराव हवा. स्वतंत्र अस्तित्व निर्माण तर यातच होते की, तुम्ही किती स्वतंत्र विचार करता, कोणते आदर्श ठेवता. कोणासारखे बनण्यापेक्षा, स्वत:सारखे बनायला तयार असता. आपल्यातील क्षमता ओळखून कामास लागता. दुसऱ्याच्या पावलावर पाऊल न टाकता स्वत: पावले उमटवता. म्हणून अस्तित्व ही अशी बाब आहे, जी आपोआप येत नसते.

एखाद्या ठिकाणी तुम्ही नसतानाही काही लोकांना तुमची उणीव वाटत असेल तर ते तुमचे अस्तित्व मान्य करतात. आणि असूनही नसल्यासारखे तुम्हाला वागवत असतील तर तुमचे अस्तित्व त्यांना मान्य नाही. म्हणजेच काय तर अस्तित्वात तुमची समज, उमज, विचार-आचार, राहणीमान झळकत असते. अनेक प्रसंगांतून तुम्ही तुमचे अस्तित्व घडवित असता. त्याला थोडा जरी धक्का पोहोचत असेल, तर आपण दुखावतो. पण तो ‘इगो’ नसतो. तुम्ही तसे नसताना तसे दाखवले गेले तर राग आपल्याला येतो; तर काहींना फरकच पडत नाही. कारण अशा व्यक्तींना आधी हे माझे अस्तित्व हे अशा पद्धतीचे आहे, हे त्यांनी स्वत:च आधी मान्य केलेले असते आणि हीच त्याची सुरुवात असते आणि या सुरुवातीचा शेवट कधीच नसतो. कारण तुम्ही नसला तरी अस्तित्व राहते. वर्षानुवर्षे टिकते. मोजता येत नाही, पण अनुभवता येते. असे आहे हे अस्तित्व.

आपल्यास हव्या त्या पद्धतीने वागण्याचे स्वातंत्र्य व्यक्ती इतकी अनुभवत जाते की, ते अखेर समाजास अमान्य वर्तनापर्यंत येते आणि एक वेळ समाजाने नाकारले की, शेवट झालाच समजा. अर्थात अस्तित्व अमान्य. असे अस्तित्व असूनही नसल्यासारखे. प्रत्येक व्यक्ती स्वतःचे वेगळे असे अस्तित्व निर्माण करण्यास धडपडत असते की, मी ओळखले जावे. ही बाब उचितही आहे. पण वेगळे म्हणता म्हणता जगावेगळेच झाले तर हसू होते. तुमचे काम, तुमचे अस्तित्व समाज जोपर्यंत स्वीकारतो, तोपर्यंत तुम्हालाही छान वाटतं. अन्यथा नकारात्मकतेला सामोरे जावे लागते. म्हणूनच अस्तित्व शोधताना स्वतःपासून सुरुवात करून कुटुंब, समाज, देश, जगात फिरून स्वतःपर्यंतच यावे लागते. स्वतःत असणाऱ्या गोष्टी वापरण्याची कला, शहाणपण स्वतःत असावे लागते. मतितार्थ असा म्हणावा लागेल की, अस्तित्व म्हणजे कला, शहाणपण होय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news