पहिला चहा | थलपती स्टाईल...

Thalapathy style
पहिला चहा | थलपती स्टाईल...
Published on
Updated on

तामिळनाडूच्या राजकारणात अखेर तो दिवस उगवणार आहे. पडद्यावर शंभर जणांना हवेत उडवत, एका गाण्यात प्रेम आणि दुसर्‍या गाण्यात क्रांती करत आलेल्या नायक थलपतीचा आता प्रत्यक्षात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. फरक इतकाच, यावेळी क्लायमॅक्समध्ये ‘कट’ म्हणायला दिग्दर्शक नाही. आता प्रत्येक ठिकाणी थलपतीला कॅमेर्‍याकडे पाहताना ही खबरदारी घ्यावी लागेल की, हे शूटिंग नाही, तर खरंखुरं सरकार आहे. शिवाय मंत्रिमंडळदेखील खरेखुरे मंत्री असणार आहेत, ती मंडळी म्हणजे इतर स्टारकास्ट नसेल, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. मुळात थलपती पडद्यावरचा लार्जर दॅन लाईफ नायक असल्यामुळे आता गृहखात्याच्या मंत्र्यांची एन्ट्री स्लो मोशनमध्ये झाली किंवा अर्थमंत्री फाईल उघडताना पार्श्वभूमीला व्हायोलिन वाजत असल्याचा भास अनेक अधिकार्‍यांना होऊ शकतो. झालंच तर सरकारी निर्णयांची नवीन शैली पाहायला मिळू शकते. पूर्वीचे सरकार जीआर काढताना साध्या पीडीएफमध्ये काढायचे. आता प्रत्येक जीआरच्या आधी 30 सेकंदांचा टीझर आधी येऊ शकतो. किंवा एखादी नवी योजना सादर करताना थलपतीला अशीही अ‍ॅडव्हर्टाईझ करता येईल- ‘कमिंग सून... तामिळनाडूची सर्वात मोठी योजना!’

थलपतीच्या अनेक सिग्नेचर स्टाईल आता मंत्रालयात पाहायला मिळू लागल्या, तर आश्चर्य वाटून घ्यायला नको. राज्य सचिवालयात फाईल पुढे सरकवण्यासाठी आता ‘मास बीजीएम’ लावलं जाऊ शकते किंवा नवे सीएम थलपतीसाहेब आता एखाद्या फाईल सही करताना पहिल्यांदा टेबलवर हलकंस मुठीने ठोकू शकतात... त्यामुळे अधिकार्‍यांनाही एखाद्या चित्रपटासारखं वाटू शकेल.

तमिळनाडूतील लोक मात्र खूश आहेत. त्यांना वाटतं, किमान आता तरी रस्त्यांच्या उद्घाटनाला चार गाणी आणि दोन फाईट्स पाहायला मिळतील. तर काहींना चिंता वाटते की, मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाला, तर अचानक कुणीतरी टेबलावर उडी मारून म्हणू शकतो- ही फक्त चर्चा नाही हा इंटरव्हल पॉइंट आहे! विरोधकांवर टीका करायला थलपतीच्या चित्रपटातील डायलॉग्जचे रील्स व्हायरल करता येतील. गुन्हेगार पकडताना स्लो मोशन स्टाईल वापरू नये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट थलपतीने विसरू नये ती म्हणजे, राजकारणात जनताच क्लायमॅक्स लिहीत असते...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news