

समोरासमोरच्या लढाईमध्ये भारताविरुद्ध जिंकू शकत नसल्याने पाकिस्तानने छुप्या मार्गाने कुरापती काढण्यासाठी दहशतवाद हे शस्त्र म्हणून वापरले. पाकिस्तानसारखा देश शेजारी आहे, हे आपले प्राक्तन आहे. त्यामुळे सदैव सजग, सज्ज राहणे, हेच या प्रश्नावरचे उत्तर आहे.
प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक
गेल्या दशकातील घटत असलेले दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण पहलगाम घटनेनंतर पुन्हा वाढले आहे. लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटाच्या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्नांची मालिका उभी आहे. पाकिस्तानातील अल कायदा, जैश ए मोहम्मद यांसारख्या 10-11 प्रमुख दहशतवादी संघटना, या जगातील गेल्या तीन दशकांपासून भारतासह काही देशांसाठी आव्हान ठरत आहेत. समोरासमोरच्या लढाईमध्ये भारताविरुद्ध जिंकू शकत नसल्याने पाकिस्तानने छुप्या मार्गाने कुरापती काढण्यासाठी दहशतवाद हे शस्त्र म्हणून वापरले. यालाच राज्य पुरस्कृत दहशतवाद म्हणतात. अशा दहशतवादास पैसा, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्रे या सर्व बाबी पुरविण्याचे काम संबंधित शासन करत असते. त्यामुळे अशा दहशतवादाचे संकट संपूर्ण जगापुढे उभे आहे.
गेल्या तीन दशकांमध्ये खुद्द अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया तसेच इंडोनेशिया, रशिया इत्यादी अनेक राष्ट्रे दहशतवादाच्या भयसंकटाचे लक्ष्य बनली होती. अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आणि पेंटागॉनवर हल्ला झाला. नंतर प्रेसिडेंट बराक ओबामा यांना ओसामा बिन लादेन यास पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे लष्करी कारवाई करून पकडले आणि त्याची समुद्रात विल्हेवाट लावली. खुद्द अमेरिकेने दहशतवाद अनुभवलेला असताना डोनाल्ड ट्रम्प पाकचे लष्करप्रमुख मुनीर याचे लांगुलचालन का करत आहेत, असा प्रश्न पडतो.
दहशतवादाच्या प्रश्नावर जगात नसणारे एकमत किंवा राष्ट्रांची दुटप्पी भूमिका हा प्रश्न अधिक बिकट बनवत आहे. भारतासारख्या देशावर दहशतवादाचे संकट उभे राहते, तेव्हा अनेक राष्ट्रे मूग गिळून बसतात; पण त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मग मात्र निषेधाची पोपटपंची करतात. खरे तर लोकशाही राष्ट्रांनी दहशतवादाच्या प्रश्नावर दुटप्पी भूमिका घेऊ नये. कारण, भविष्यात जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांपुढे दहशतवादाचे भयसंकट उभे राहणार आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी सर्व लोकशाही राष्ट्रांना एकसमान भूमिका घेऊन लढाईसाठी तयार झाले पाहिजे.
लेबनॉनमधील कृती संघटना असो की पॅलेस्टाईनमधील हमास. या संघटनांनी दहशतवादाचे भूत का व कसे नाचविले? त्याचे उत्तर असे आहे की, या देशातील सरकार कमजोर असल्यामुळे तेथील अस्थिरतेचा आणि दबल्याचा फायदा दहशतवादी संघटनांनी घेतला आणि समस्यांचे दुष्टचक्र निर्माण केले. स्थानिक सरकारांच्या कळत-नकळत किंवा प्रत्यक्ष पाठिंबा असल्यामुळे हे दहशतवादी गट सक्रिय होतात आणि आपल्या शेजारच्या लोकशाही राष्ट्रांवर हल्ले करतात. तेव्हा जगातील इतर राष्ट्रांनी त्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांची आर्थिक नाकेबंदी केली पाहिजे आणि त्यांना एकाकी पाडले पाहिजे; पण दुर्दैवाने तसे होत नाही. चीन, अमेरिका, इंग्लंड यांसारखी सुरक्षा परिषदेत ‘व्हेटो’ अधिकार असणारी राष्ट्रे जोपर्यंत दहशतवादाबाबतचा दुटप्पीपणा सोडत नाहीत, तोवर दहशतवादाविरुद्धची लढाई संपणार नाही.
माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर केलेल्या भाषणात दहशतवादाचे संपूर्ण वस्त्रहरण केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, आम्ही आयआयटी, आयआयएमसारख्या संस्था निर्माण केल्या व पाकिस्तानने दहशतवादाचे कारखाने चालविले. विकासाची फळे लोकांपर्यंत पोहोचविण्याऐवजी लोकांना गुमराह करून त्यांना दहशतवादाच्या चक्रात अडकविणारे कुठलेही सरकार जनतेचे भले करू शकत नाही. ही गोष्ट जेव्हा पाकमधील सामान्य जनतेला कळेल, तेव्हा तेथील दहशतवादाचे समर्थन कमी होऊ शकेल; परंतु पाकिस्तानात दहशतवादी संघटनांच्या कार्यालयात प्रत्यक्ष लष्करप्रमुख जातात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात, हा राज्य पुरस्कृत दहशतवादाचा एक उत्तम नमुना आहे.
स्थानिक लोकांना हाताशी धरून हिंसक कारवाया केल्या जातात. यासाठी अशिक्षितांबरोबरच सुशिक्षितांचेही धर्माच्या नावावर ब्रेनवॉश केले जाते. दिल्लीतील स्फोट असोत किंवा फरिदाबादमध्ये सापडलेली स्फोटके असोत, यामध्ये वैद्यकीय पदवी घेणार्या डॉक्टरांचा समावेश चिंताजनक आहे. अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्येसुद्धा तेथील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि बुद्धिवादी यांचा बुद्धिभ्रष्ट करून त्यांचीही माथी भडकविण्यात आली होती. यामागे आयसिस या दहशतवादी संघटनेनेही आपला विखारी प्रचार-प्रसार करण्यासाठी आयटी क्षेत्रातील तरुणांना जाळ्यात ओढले होते.
ज्या देशांमध्ये दहशतवाद पोसला जात आहे, त्या देशात कमालीची सामाजिक व आर्थिक विषमता आहे. लोकांच्या धर्मभोळेपणाचा फायदा घेऊन त्या देशातील राजकीय नेतेमंडळी देशातील मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना दहशतवादी संघटनांच्या नादी लावतात आणि त्यांच्या मार्फत आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षा साध्य करण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानमध्ये जे दहशतवादाचे पीक आले आहे, त्यामागे असलेले लोकशाहीविरोधी तत्त्वज्ञान हे अधिक चिंता निर्माण करणारे आहे. खरे तर आज आर्थिक अराजकाच्या खाईत लोटलेल्या पाकिस्तान सरकारने जनतेच्या कल्याणाच्या विकासाच्या योजना कृतीमध्ये आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले पाहिजेत; पण तसे होत नाही. त्यामुळे तेथील तरुण वर्ग हा दहशतवादाच्या कच्छपी लागतो आणि नंतर जेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो, तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त झालेले असते. लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकारच दहशतवादाचे पालनपोषण करत असेल, तर त्या देशाकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? असा देश आपला शेजारी आहे, हे आपले प्राक्तन आहे. त्यामुळे आपण सदैव सजग आणि सज्ज राहणे, हेच या प्रश्नावरचे उत्तर आहे.
पाकमधील आणि अन्य देशांतील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे जगाचे 100 कोटी अब्जांहून अधिक नुकसान झालेले असावे, असे म्हटले जाते. याचाच दुसरा अर्थ असा की, दहशतवाद थांबला, तर लोकांना उपासमार, भूक आणि दारिद्य्र या समस्यांचा सामना करता येऊ शकतो. दहशतवादी राष्ट्रांची कोंडी करणे, त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न देणे आणि दहशतवाद्यांच्या बदलत्या मोडस ऑपरेंडी लक्षात घेत त्यांचा निकराने मुकाबला करणे हेच आपल्या हाती आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आता दहशतवादाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी एखादा विशेष कार्यक्रम हाती घेतला पाहिजे आणि मोठी मोहीम उघडली पाहिजे. तसे झाले, तरच लोकशाहीचे भले होईल.