Terror Red Alert | दहशतीचा ‘रेड अलर्ट’

शिवाय गेल्या पंधरा दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांकडून येणारे ‘हाय अलर्ट’ आणि त्यासाठी असणारी सुरक्षा सज्जता याला छेद देत हे दहशतवादी कृत्य घडवले गेले.
Pudhari Editorial Article
दहशतीचा ‘रेड अलर्ट’(Pudhari File Photo)
Published on
Updated on

जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला सात महिने झाले नाहीत तोवर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले, तपास आणि सुरक्षा यंत्रणांना आव्हान दिले आणि दिल्लीच्या गजबजलेल्या लाल किल्ल्याजवळ शक्तिशाली स्फोट घडवून आणत सार्‍या देशालाच हादरवून सोडले. पहलगामचा बदला घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ने या दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांचे कंबरडे मोडले असले, तरी त्यांची वळवळ अजूनही सुरूच आहे. ती थांबणार नाही, असा जणू इशाराच दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांनी या ताज्या घटनेने दिला.

जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला सात महिने झाले नाहीत तोवर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले, तपास आणि सुरक्षा यंत्रणांना आव्हान दिले आणि दिल्लीच्या गजबजलेल्या लाल किल्ल्याजवळ शक्तिशाली स्फोट घडवून आणत सार्‍या देशालाच हादरवून सोडले. पहलगामचा बदला घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ने या दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांचे कंबरडे मोडले असले, तरी त्यांची वळवळ अजूनही सुरूच आहे. ती थांबणार नाही, असा जणू इशाराच दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांनी या ताज्या घटनेने दिला. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यासाठीचे मतदान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सार्‍या देशाचे लक्ष या राज्यात राजकीय समीकरणे काय राहणार, याकडे लागले असताना त्याचबरोबर एकूणच निवडणूक प्रक्रिया हिंसाचारमुक्त, शांततेच्या वातावरणात पार पडत असताना हा स्फोट घडवून आणला गेला.

Pudhari Editorial Article
Editorial : लवंगी मिरची : निसर्ग प्रेरणा

शिवाय गेल्या पंधरा दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांकडून येणारे ‘हाय अलर्ट’ आणि त्यासाठी असणारी सुरक्षा सज्जता याला छेद देत हे दहशतवादी कृत्य घडवले गेले. या गंभीर आणि देशाला धक्का देणार्‍या घटनेचे कनेक्शन तपासले जात असले, तरी त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. अटक केलेल्यांत पुलवामातील एका डॉक्टरचा समावेश आहे. स्फोटामागील कट उघड होत असून त्यात बुरख्याआड लपलेल्या ‘व्हाईट कॉलर’ दहशतवाद्यांचा नवा डाव समोर आला. हा घटनाक्रम आणि त्यातील व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग या सार्‍याच बाबी चक्रावून टाकणार्‍या आहेतच शिवाय सुरक्षा व्यवस्थेसमोर नवे प्रश्न निर्माण करणार्‍याही आहेत. दहशतवाद्यांनी थेट राजधानीलाच लक्ष्य केले. त्यातही मोठ्या गर्दीचा परिसर ते गाठण्यासाठी निवडला, संशय येणार नाही, यारितीने कार्यपद्धती रचली गेली. स्फोटकांसाठी अमोनियम नायट्रेट आणि डेटोनेटर तंत्रज्ञानाचा केला गेलेला वापर हाही तितकाच चिंतेचा विषय. स्फोटासाठी वापरल्या गेलेल्या कारची गेल्या काही महिन्यांत अनेकदा खरेदी-विक्री झाली. ओळख लपविण्यासाठी दहशतवादी संघटनांची हीच ‘मोडस ऑपरेंडी’ असते.

यामागे ‘जैश ए महमद’ संघटनेचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय आहे. संघटनेचे कर्तेकरविते, पाठीराखे कोण, हे त्यातून पुरेसे स्पष्ट होऊ शकते. घटनेच्या काही तासांपूर्वीच हरियाणातील फरिदाबादमध्ये पोलिसांनी भाड्याच्या घरातून 360 किलो अमोनियम नायट्रेट आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली होती. ते घर एका काश्मिरी डॉक्टरच्या नावावर होते. या कारवाईच्या आधी गुजरात ‘एटीएस’नेही इसिसशी संबंधित दोन मॉड्युल्समधील तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. ते शस्त्रे बदलण्यासाठी गुजरातमध्ये आले होते आणि हल्ल्याची योजना आखत होते, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. जम्मू-काश्मीर आणि फरिदाबाद पोलीस ज्या डॉ. उमर मोहम्मदचा शोध घेत होते, तोच या साखळीतील मुख्य दुवा मानला जातो. गुजरात, हरियाणा आणि आता दिल्लीतील घटना पाहता दहशतवाद्यांनी नवीन आश्रयस्थाने शोधून काढली आहेत, हे स्पष्ट होते. लाल किल्ला जो आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे आणि देशाच्या आत्म्याशी जोडलेला आहे, त्याच्या जवळ असा स्फोट होणे ही देशावर झालेली एक खोल जखम आहे. हल्ल्याने केवळ जीव घेतले नाहीत, तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले.

गुप्तचर यंत्रणा अशा हल्ल्यांना रोखण्यासाठी तयार होती का? सतत मिळणार्‍या दहशतवादी अलर्टस्ना आपण किती गांभीर्याने घेतले? गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड झाला आहे, त्यावरून दिसते की, दहशतवादी संघटना नवीन पद्धती आणि ठिकाणे शोधत आहेत. हेही शक्य आहे की, पाकिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांनी अलीकडील अपयशानंतर घाईघाईने दिल्ली हल्ल्याचा कट रचला असावा.

दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना आता अनेक आघाड्यांवर एकाच वेळी काम करावे लागणार आहे. शिवाय दिल्ली, मुंबईसह महानगरांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. स्फोटात ठार झालेला डॉक्टर, शिवाय दोन डॉक्टरांची अटक आणि पुलवामातून अटक झालेला डॉक्टर सहकारी, त्याचे नातलग यावरून कटाचा पर्दाफाश होईलच; मात्र या कटाचे किती, कोणते आणि कसे पदर आहेत, स्लीपर सेल कशा रितीने काम करत आहेत, हे सारे जसे नवीन आहे, तसे आव्हान निर्माण करणारेही आहे. एनआयएसह सर्वच तपास यंत्रणा कामाला लागल्या असून कटातील सहभागी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या जातीलच, यात शंका बाळगायचे कारण नाही. दहशतवादी शक्ती आता केवळ सीमापारहून नव्हे, तर शिक्षित समाजातही मुळे रुजवत आहे.

या घटनेत सुमारे तीन टन स्फोटके जप्त केली आहेत. त्यावरून या घटनेची तीव्रता पुरेशी स्पष्ट होते. देशभरातील सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा, गुप्तचर यंत्रणा सक्षम बनवण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील देखरेख वाढवण्यासाठीचा हा इशारा मानावा लागेल. राजधानीतील या दहशतीच्या सांजेने आपल्याला आठवण करून दिली आहे की, एकजुटीने आणि सतर्क राहिलो नाही, तर दहशतवाद नवनवीन रूप घेऊन परतत राहील. लाल किल्ल्याची ही निःशब्दता आता जणू एक इशारा बनली आहे. तो इशारा आहे, दहशतवादाला थारा देता कामा नये, ना रस्त्यांवर, ना मनात यासाठीचा! ‘या पुढील देशातील कोणतेही दहशतवादी कृत्य हा देशावरील हल्ला मानला जाईल’, असे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान म्हटले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही, ते सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला होता. दिल्लीतील या घटनेमागे असलेली ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. दिल्ली स्फोटाची पाळेमुळे खणून काढली जातील, दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, देश अशा भ्याड हल्ल्यांसमोर कधीही झुकणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली आहे. नव्याने झालेला हा हल्ला आणि उघड होणारे कट ‘ऑपरेशन सिंदूर’ पुन्हा सुरू करण्यास भाग तर पाडत नाहीत ना?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news