Exam paper leak prevention | प्रश्नपत्रिका गळती रोखण्यासाठी तंत्रज्ञान

Exam paper leak prevention |
Exam paper leak prevention | प्रश्नपत्रिका गळती रोखण्यासाठी तंत्रज्ञान
Published on
Updated on

डॉ. दीपक शिकारपूर

देशातील स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांमधील प्रश्नपत्रिका गळतीची समस्या आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुरक्षित डिजिटल प्रणालींच्या मदतीने प्रभावीपणे रोखून अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उभारण्याची गरज आहे.

अलीकडेच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेशी संबंधित प्रश्नपत्रिका गळतीच्या वादामुळे पुन्हा एकदा देशभरात संतापाची लाट निर्माण झाली. या घटनेने केवळ सुरक्षेतील त्रुटीच नव्हे तर व्यवस्थेतील जुनी आणि कमकुवत पद्धतीही उघड केल्या. आजच्या डिजिटल युगात ही समस्या थांबवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रभावी उपाय देऊ शकते. योग्य नियोजन, कठोर अंमलबजावणी आणि पारदर्शक तंत्रप्रणाली यांचा वापर केल्यास प्रश्नपत्रिका गळती जवळजवळ अशक्य बनवता येऊ शकते.

पूर्वी प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक आणि वितरण या टप्प्यांमध्ये मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असे. त्यामुळे माहिती बाहेर जाण्याची शक्यता वाढत असे. आता संगणकी कोडिंग तंत्रामुळे प्रश्नपत्रिका पूर्णपणे गुप्त स्वरूपात ठेवता येते. प्रश्नपत्रिका तयार होताच ती अत्यंत सुरक्षित संकेतांमध्ये रूपांतरित केली जाते. योग्य अधिकृत परवानगीशिवाय ती उघडता येत नाही. त्यामुळे मधल्या टप्प्यातील चोरी किंवा प्रतिकृती बनवणे थांबू शकते. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संशयास्पद हालचाली ओळखता येतात. कोणत्या अधिकार्‍याने कोणत्या वेळी प्रश्नपत्रिकेची फाईल उघडली, किती वेळ पाहिली किंवा ती इतरत्र पाठवण्याचा प्रयत्न केला यावर सतत नजर ठेवता येते. अचानक अनियमित हालचाल दिसल्यास प्रणाली त्वरित इशारा देते. त्यामुळे गुन्हा घडण्यापूर्वीच त्याला रोखण्याची संधी मिळते.

प्रश्नपत्रिका वितरणासाठी जैविक ओळख प्रणाली देखील महत्त्वाची ठरू शकते. केवळ अधिकृत व्यक्तीचा बोटांचा ठसा किंवा डोळ्यांची ओळख पटल्याशिवाय प्रश्नपत्रिका उघडली जाणार नाही, अशी व्यवस्था तयार करता येते. त्यामुळे बनावट ओळखपत्रे किंवा खोट्या अधिकार्‍यांच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार कमी होतील. अनेक तज्ज्ञांच्या मते, परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच प्रश्नपत्रिका केंद्रावर डिजिटल पद्धतीने पोहोचवण्याची प्रणाली अधिक सुरक्षित आहे. यामध्ये देशभरातील केंद्रांना एकाच वेळी प्रश्नपत्रिका पाठवली जाते. त्यामुळे वाहतूक, साठवणूक आणि वितरणातील धोके कमी होतात. प्रत्येक केंद्रावर विशेष संकेताशिवाय प्रश्नपत्रिका उघडताच येणार नाही अशी यंत्रणा असू शकते.

तंत्रज्ञानाबरोबरच नैतिकता आणि जबाबदारीदेखील महत्त्वाची आहे. केवळ संगणक प्रणाली बसवून समस्या सुटत नाही. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी यांना प्रामाणिकपणा आणि डिजिटल सुरक्षा यांचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कठोर कायदे, त्वरित शिक्षा आणि पारदर्शक चौकशी यामुळेही गुन्हेगारांना आळा बसेल.

भविष्यात परीक्षा व्यवस्थेमध्ये आणखी प्रगत तंत्रज्ञान वापरले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या क्रमाने प्रश्न तयार करणारी बुद्धिमान प्रणाली विकसित होऊ शकते. त्यामुळे एकाच प्रश्नपत्रिकेची चोरी करून संपूर्ण परीक्षा बिघडवणे कठीण होईल. आवाज, चेहरा आणि वर्तन ओळखणार्‍या प्रणालींद्वारे परीक्षा केंद्रांवरील संशयास्पद हालचाली त्वरित पकडल्या जातील. भविष्यात सुरक्षित राष्ट्रीय परीक्षा जाळे उभारले जाऊ शकते, जिथे सर्व परीक्षा केंद्रे थेट नियंत्रित केली जातील. शिक्षण व्यवस्थेला तंत्रज्ञानाची मजबूत जोड दिली तर प्रश्नपत्रिका गळतीसारखे प्रकार इतिहासजमा होतील आणि गुणवत्तेला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुरक्षित डिजिटल प्रणाली यांच्या सहाय्याने भारत अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि न्याय्य परीक्षा व्यवस्था निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांचा विश्वास जपणे हीच खरी शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी जबाबदारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news