

बांगला देशच्या राजकारणावर 30 वर्षे वर्चस्व राखलेल्या शेख हसीना आणि खालिदा झिया या दोन नेत्यांविना झालेल्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगला देश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या पक्षाने मोठा विजय मिळवला. त्यामुळे आता तरी या शेजारी देशातील परिस्थिती सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात आले. त्यामुळे हसीना यांना परागंदा होऊन भारताच्या आश्रयास यावे लागले. त्यास दीड वर्ष उलटले. तेव्हापासून तेथे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारच काम पाहत होते. आता जमाते इस्लामी या धर्मवादी पक्षाला नाकारताना बांगला देशी जनतेने बीएनपीच्या सुधारणावादी धोरणांच्या बाजूने मतदान केले असून, या पक्षाचे मुख्य नेते तारिक रहमान हे नवे पंतप्रधान होणार आहेत. दोनच वर्षांपूर्वी म्हणजे 2024 मध्ये तेथे झालेली संसदेची निवडणूक ही विरोधी पक्षांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे निरर्थकच ठरली. त्यामुळे हसीना सरकारला खर्याअर्थाने वैधता प्राप्त झालेलीच नव्हती. गेल्या काही वर्षांत त्यांच्या हुकूमशाहीवादी धोरणांचा अतिरेक झाला. विरोधातील आंदोलनात त्यांची राजवट कोसळली आणि अवामी लीग या हसीना यांच्या पक्षाची मान्यताही रद्द झाली. त्यामुळे या निवडणुकीत अवामी लीगला भाग घेता आला नाही.
300 सदस्यांच्या संसदेत बीएनपीने 209 जागा पटकावल्या. बांगाला देशी लोकांनी शेख हसीना यांचे सरकार पाडणार्या ‘नॅशनल सिटिझन्स पार्टी’ला साफ नाकारले. जमाते इस्लामी या पक्षास 68 जागांवर विजय मिळाला. बीएनपी हा भारताचा पारंपरिक मित्रपक्ष नाही. गेल्यावर्षी 30 डिसेंबर रोजी खालिदा झिया यांचा मृत्यू झाला. बांगला देशच्या स्वातंत्र्य आंदोलनात शेख हसीना यांचे वडील वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांचेच नेतृत्व होते. खालिदा झिया यांचाही स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध होता. त्यांचे पती झिया उर रहमान पाक लष्करात उठाव करून स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. मुजिबूर रहमान आणि बीएनपीचे संस्थापक झिया उर रहमान या दोघांनीही बंगाली भाषा आणि संस्कृतीला महत्त्व दिले. अवामी लीग हा बंगाली राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता पक्ष असला, तरी त्यात धर्मनिरपेक्षता, वंगभाषा आणि अस्मिता यांना महत्त्व आहे. बीएनपी हा पक्ष बांगला देशी राष्ट्रवादाला प्राधान्य देतानाच इस्लामी मूल्ये आणि सार्वभौमत्वाला महत्त्व देतो.
उलट जमाते इस्लामीने बांगला देश स्वातंत्र्य आंदोलनास विरोध करून, पाकिस्तानची बाजू घेतली होती. पाक लष्कराने जेव्हा पूर्व पाकिस्तानात नरसंहार आरंभला तेव्हा त्यास ‘जमात’ने मदतच केली होती. शेख हसीना यांनी या पाकिस्तानवादी धर्मांध ‘जमात’च्या काही नेत्यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे फाशी दिली. मोहम्मद युनूस यांचे सरकारही पाकिस्तानवादीच होते. 2012 नंतर पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युनूस यांच्या काळातच बांगला देशला भेट दिली होती. आता तारिक रहमान यांनी ‘बांगला देश फर्स्ट’ अशी घोषणा देत जाहीरनामा मांडला आहे. प्रशासन आणि न्यायव्यवस्थेत सुधारणा, लोककल्याणासाठी कुटुंब कार्ड व शेतकरी कार्ड, उत्पादन आधारित अर्थव्यवस्थेस चालना, कौशल्यविकास, जागतिक ई-कॉमर्स जोडणी, परकीय गुंतवणुकीला उत्तेजन आणि शासकीय खर्चात पारदर्शकता अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली आहेत. तारिक हे माजी राष्ट्रपती झिया उर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. बीएनपीच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांच्याकडेच जाते. 2008 मध्ये त्यांना देश सोडून पळावे लागले होते. 17 वर्षे निर्वासित राहिल्यानंतर 25 डिसेंबर 2025 रोजी ते लंडनहून बांगला देशला परतले. हसीना सरकारने त्यांच्या विरुद्ध 80 खटले दाखल केले होते. तारिक यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती; मात्र मायदेशात परतल्यानंतर त्यांचे एखाद्या नायकासारखे स्वागत झाले. देशाच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा एक रोडमॅपच त्यांनी सादर केला आहे.
खालिदा झिया यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती, अवामी लीगची अनुपस्थिती, ‘जमात’बद्दलचा राग आणि विद्यार्थी नेत्यांबद्दलची जनतेची निराशा या सर्व गोष्टी ‘बीएनपी’ला अनुकूल ठरल्या. ‘आम्ही मैत्री करू, गुलामी नाही’ असे तारिक यांनी परराष्ट्र धोरणाबाबत म्हटले आहे. याचा अर्थ, भारत, पाकिस्तान अथवा चीन, कोणीही असो, आम्ही सर्वांशी सलोख्याचे संबध ठेवू; पण कोणाचेही प्यादे बनणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. शेख हसीना यांच्या काळात भारत-बांगला देश संबंध अत्यंत चांगले होते, तरीही त्या भारताच्या दबावाखाली होत्या, अशी त्यांची प्रतिमा निर्माण केली गेली. हसीना यांना भारतात आश्रय देणे आणि त्यानंतर बांगला देशवर व्हिसा व व्यापारी निर्बंध लादणे, यामुळे उभय देशांतील संबंध अलीकडच्या काळात बिघडले; परंतु परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगला देशात जाऊन तारिक यांची भेट घेतली होती.
पंतप्रधान मोदींनीही त्यांच्याशी संवाद केला होता आणि आताच्या विजयाबद्दल तारिक यांचे अभिनंदन केले आहे. हसीना सरकार असताना ‘बीएनपी’च्या नेत्यांचा छळ सुरू होता. आता तारिक हे त्याचा बदला घेतात की अवामी लीगलाही राजकीय प्रक्रियेत सामावून घेतात, हे पाहावे लागेल. ढाका मतदारसंघातून गयेश्वरचंद्र रॉय या हिंदू नेत्याने विजय मिळवला आहे. बांगला देश भारतातून कापूस व सुताची मोठी खरेदी करतो. या आयातीवर शुल्क माफी असून, ती उठवून कर लादावे, अशी भूमिका ‘बीएनपी’ने मांडली होती. ते प्रत्यक्षात झाल्यास भारतीय वस्त्रोद्योगास फटका बसेल यात शंका नाही. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणीदेखील तारिक यांनी वारंवार केली आहे. या मुद्द्यावरून उभय देशांचे संबंध बिघडू नयेत, याची दक्षता मात्र भारत सरकारला घ्यावी लागणार आहे. हे सत्तांतर या देशासाठी महत्त्वाचे आहेच, त्याहून अधिक भारतासाठी. कारण, तेथील हिंदूंवरील अत्याचार वाढत असताना आणि त्या कारणाने उभय देशांतील संबंध ताणले असताना नव्या पंतप्रधानांच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष आहे.