

लोकसाहित्य-लोकसंस्कृती शास्त्रकाट्याच्या कसोटीवर घासूनपुसून घेऊन ती अधिक शास्त्रपूत करणार्या राजवाडे, केतकर, इरावतीबाई कर्वे, दुर्गाबाई भागवत यांच्या थोर परंपरेतील विद्यमान स्थितीतील मेरुमणी म्हणजे ताराबाई भवाळकर! त्यांनी जानपद गीते, लोकसंस्कृती आणि या लोकसंस्कृतीतील स्त्रीची स्पंदने व यातील बंडखोरी प्रतिभेने अधिक तेजोमान केली; मात्र ते करताना त्यांनी कधीही गहिवर संप्रदायाचा अंगीकार केला नाही. उलटपक्षी जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, कान्होपात्रा अशी पूर्वीची बंडखोर परंपरा सातत्यपूर्ण लेखनातून ताराबाईंनी नेमकी अधोरेखित केली.
देशाची राजधानी दिल्लीत होणार्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य-लोकसंस्कृती, नागर रंगभूमी आणि लोक रंगभूमी, तसेच स्त्रीमुक्ती चळवळ या संदर्भात सातत्याने मूलगामी संशोधन करणार्या ज्येष्ठ विदुषी डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. शारदीय नवरात्र उत्सव सुरू असताना आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असतानाच ताराबाईंची निवड झाल्यामुळे महाराष्ट्रच नव्हे, तर मराठी भाषेवर प्रेम करणार्या जगातील सर्वांसाठी हा क्षण जणू ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा आहे. 1978 पासून ताराबाईंचे आणि माझे स्नेहबंध जुळलेले आहेत. इंडियन नॅशनल थिएटर लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्र या संस्थेत लोककलांच्या संशोधनाचे काम ज्येष्ठ नाटककार, गीतकार आणि लोककलांचे अभ्यासक अशोक जी. परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असताना सांगलीला जाणे-येणे वाढले. कारण, परांजपे सांगलीच्या हरिपूरचे. त्यांच्यासोबतच्या भटकंतीमुळे या सांगली परिसरातील आनंदराव सूर्यवंशी, शाहीर बापुराव विभूते, काळू-बाळू, कादंबरीकार देवदत्त पाटील अशा अनेक कलावंत मंडळींचा सहवास लाभला. त्याच काळात ताराबाईंची ओळख झाली. जयसिंगपूर येथे कादंबरीकार देवदत्त पाटील यांनी लोकसाहित्य संमेलन आयोजित केले होते. यात व्याख्यान देण्याची संधी ताराबाईंमुळेच मला मिळाली आणि पुढे ‘लोकसाहित्य संशोधन मंडळा’च्या रूपाने आमचा एक परिवारच निर्माण झाला. औरंगाबादचे डॉ. प्रभाकर मांडे हे लोकसाहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. तसेच पुण्याचे रामचंद्र चिंतामण ढेरे आणि दुर्गाबाई भागवत या आदर्शांच्या मार्गदर्शनातून आणि पुढाकारातून जे ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ स्थापन झाले. त्यात ताराबाई आग्रणी होत्या, आजही आहेत.
या लोकसाहित्य संशोधन मंडळातर्फे झालेल्या सर्व लोकसाहित्य परिषदा एकत्र येऊन यशस्वी केल्या. एक मातृतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून अभिमानाने मिरवावे, असेच त्यांच्याशी कायम संबंध राहिले. लोकसंस्कृती ही पुरुषप्रधान नव्हतीच मुळी. लोकसंस्कृतीतील महामायेने निसर्ग आणि मानवावर सातत्याने चवरी ढाळत ठेवली. लोकसंस्कृतीतील विधिगीते, विधी नाट्ये हा मराठी लोकरंगभूमीचा पूर्वरंग होय. या पूर्वरंगाचे चिंतन ताराबाईंनी अनेक वेळा केले आणि त्यातूनच पुढे विष्णुदास भावेकालीन रंगभूमी, किर्लोस्कर खाडीलकरांची रंगभूमी, देवलांची रंगभूमी या संदर्भातील विचार ताराबाईंनी ‘लोकनागर रंगभूमी’ या ग्रंथामधून मांडला. रामाचे मोठेपण मानताना सीतेला गौणत्व येऊ नये. कारण, अग्निपरीक्षा सीतेने दिली होती हे पटवून देत रामायण-महाभारतातील अनेक स्वत्त्व आणि सत्त्व जपणार्या व्यक्तिरेखांचा चिंतनमय वेध ताराबाईंनी लेखनात घेतला आहे. जात्यावरील ओव्यांचा अभ्यास करताना त्या केवळ लयबद्ध गीते या अंगाने ओव्यांकडे पाहत नाहीत, त्यामागच्या सामाजिकतेचाही वेध घेतात. अशा या थोर विदुषीचे जुजबी भेटीतच नव्हे, तर आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर मार्गदर्शन लाभले. मग, औरंगाबाद, जुन्नर, सांगली, श्रीगोंदा, गोवा, अहमदनगर येथील लोकसाहित्य परिषदा असोत अथवा मुंबई विद्यापीठातील आमच्या लोककला अकादमीतील त्यांची व्याख्यानाची सत्रे असोत किंवा अगदी ‘लोकरंग मंच’ आणि ‘महाराष्ट्र कला संस्कृती मंच’ या संस्थेच्या लोककला संमेलनाचे त्यांनी भूषविलेले अध्यक्षपद असो. प्रत्येक वाटा आणि वळणांवर ताराबाई भेटल्या आणि त्यांनी वाटा उजळून टाकल्या. वाटेतले खाचखळगे जाई-जुईच्या फुलांनी सुगंधित केले. अलीकडेच त्यांचा ‘सीतायन’ नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. तसेच ‘महामाया’ या रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्यासह लिहिलेल्या ग्रंथाची दुसरी आवृत्तीही नुकतीच प्रकाशित झाली. या दोन्ही पुस्तकांतून स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर ठायी ठायी व्यक्त होतो. अलीकडेच लोकसंस्कृती विषयक विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या होत्या, आधुनिक काळातील अनेक विचारधारांची निर्मिती पाश्चिमात्य जगात झाली आणि नंतर त्या जगभरात पसरल्या. उर्वरित जगाने यथाशक्य त्याचा स्वीकार केला. विशेषतः भारतात इंग्रजोत्तर काळात या विचारधारा राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि सांस्कृतिक (कला-साहित्य आदी) क्षेत्रात प्रसृत होण्यास प्रारंभ झाला आणि आजतागायत तेच सुरू आहे. त्यात कधी इंग्लंडचा प्रभाव असेल, तर कधी अमेरिकेचा. हा तपशिलातला फरक सोडला, तर पाश्चिमात्य प्रभाव हे तत्त्व कायम आहे. लोकसाहित्य किंवा लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे आपल्याला जुने काही तरी असे सतत वाटत असते; पण लोकसाहित्य-लोकसंस्कृती जुनी नसते. ती कालप्रवाही असते. म्हणूनच ताराबाई म्हणतात, लोकसाहित्य किंवा लोकसंस्कृती विषयी अकारण भक्तिभाव किंवा लोकपरंपरेतले सर्व उच्च, उदात्त असा उमाळा असून चालत नाही. कोणत्याही संस्कृतीत-परंपरेत काही बरे, काही वाईट असते. त्याची चिकित्सा करणे हे अभ्यासकाचे काम असते आणि विचक्षण वाचकाला त्यात आनंद मिळतो. लोकसाहित्य किंवा लोकसंस्कृतीकडे केवळ पूर्वदिव्य म्हणून न पाहता, त्याकडे विवेकी द़ृष्टीने बघा आणि मगच त्याचा स्वीकार करा, अशा सांगणार्या डॉ. भवाळकर 98 व्या संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या, ही मराठी सारस्वतांसाठी खरोखरच गौरवाची बाब आहे.